ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील भारतीय संघाच्या दुसऱ्या कसोटी सामन्याला आज (२६ डिसेंबर) मेलबर्नच्या मैदानावर सुरुवात झाली. या सामन्यातून वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने कसोटी पदार्पण केले. अतिशय खडतर परिस्थतीतून वर आलेल्या सिराजचे भारतीय संघाकडून कसोटी सामना खेळण्याच स्वप्न आज प्रत्यक्षात उतरले. सिराजने या सामन्यातील पहिल्या डावात दोन बळी पटकावत झोकात पदार्पण साजरे केले. या सामन्यात सिराजच्या बाबतीत एक विशेष घटना घडली. क्रीडा पत्रकार भरत सुंदरेशन यांनी ट्विट करत ही घटना निदर्शनास आणून दिली.
मोहम्मद सिराजने आपले प्रथमश्रेणी पदार्पण हैद्राबादच्या संघाकडून केले होते. त्यावेळी हैद्राबादचा कर्णधार हनुमा विहारी होता. त्यानंतर सिराजने प्रगती करत भारत अ संघातही स्थान मिळविले. तिथेही अनेकदा सिराज हनुमा विहारीच्या नेतृत्वाखाली खेळला होता. आणि आज जेव्हा सिराजने भारताच्या कसोटी संघात पदार्पण केले तेव्हा विहारीदेखील संघाचा भाग आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात ज्यावेळी सिराज गोलंदाजी करायला आला त्यावेळी हनुमा विहारी त्याच्याशी चर्चा करून त्याचा आत्मविश्वास वाढवताना दिसला. अनेक वर्ष एकत्र खेळल्यामुळे विहारीला सिराजच्या मानसिकतेचा नक्कीच अंदाज आला होता. त्यामुळे सिराजला पाठबळ देत त्याचा उत्साह वाढविण्याचे काम विहारी चोखपणे करत असल्याचे दिसून आले.
https://twitter.com/beastieboy07/status/1342698736900685824
पहिल्या दिवसावर भारताचे वर्चस्व
बॉक्सिंग डे कसोटीच्या पहिल्या दिवसावर भारताचे वर्चस्व असल्याचे दिसून आले. कर्णधार अजिंक्य रहाणेने नाणेफेक गमावली असली तरी भारतीय गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी करत ऑस्ट्रेलियन फलंदाजी अवघ्या १९५ धावांत गुंडाळली. भारताकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक ४ बळी पटकाविले. तर आर अश्विनने ३ आणि पदार्पणवीर मोहम्मद सिराजने २ बळी घेत त्याला सुयोग्य साथ दिली. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने १ बाद ३६ धावा केल्या होत्या. दिवसाखेर युवा शुबमन गिल २८ तर चेतेश्वर पुजारा ७ धावांवर नाबाद आहेत.
महत्वाच्या बातम्या:
– IND vs AUS : पहिल्या दिवसाखेर भारताच्या १ बाद ३६ धावा, पदार्पण करणाऱ्या शुबमन गिलची शानदार सुरुवात
– IND vs AUS: पदार्पणातच सिराजची हवा; लॅब्यूशानेनंतर या ऑसी फलंदाजाला धाडलं तंबूत
–बॉक्सिंग डे कसोटी : पहिल्या दिवसाअखेर न्यूझीलंडच्या ३ बाद २२२ धावा, केन विलियम्सन शतकाच्या जवळ






