मुंबई । ‘टर्बनेटर’ हरभजन सिंग भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी गोलंदाजापैकी एक आहे. त्याने आपल्या जादुई फिरकी गोलंदाजीनी विरोधी संघाच्या फलंदाजांची भंबेरी उडविण्याचे काम केले. कसोटी क्रिकेटमध्ये भारताकडून पहिली हॅटट्रिक घेण्याचा पराक्रमही त्याने केला.
त्याच्या फिरकीच्या जोरावर कोलकाता कसोटीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या कसोटी सामन्यात भारताने ऐतिहासिक विजय मिळवला. एकाच मालिकेत तब्बल 32 गडी बाद केल्याने सिकंदराच्या आविर्भावात आलेल्या ऑस्ट्रेलियाच्या संघाला भारतीय संघाने पाणी पाजले.
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेत दमदार कामगिरी केल्यानंतर हरभजन सिंगने परत कधीच पाठीमागे वळून पाहिले नाही. पण त्यांच्या कारकीर्दीत अशी वेळ आली होती की, त्याला त्याची कारकिर्द संपली, असे वाटत होते. काळाची पावले ओळखत हरभजन सिंगने आपल्या गोलंदाजाच्या शैलीत आणि प्रकारात बदल केला. गोलंदाजीत कात टाकत नवे बदल केल्याने तो क्रिकेटमध्ये आपले अस्तित्व टिकवून ठेवू शकला, असा खुलासा खुद्द हरभजन सिंगने आकाश चोप्राशी बोलताना केला.
हरभजन सिंग म्हणाला की, ” मी मोहाली येथील मैदानावर गोलंदाजीचा सराव करत होतो. त्याचवेळी भारतीय संघाचा शेवटचा ‘नेट्स सेशन’ सुरू होता. त्यावेळी त्यांनी मला नेट्सवर बोलावले. ते म्हणाले, तु ये आणि आम्हाला गोलंदाजी दाखव करून दाखव. मी खूपच घाबरलो. त्यावेळी नेट्समध्ये देबाशिष मोहंती फलंदाजी करत होता. अझर आणि सचिन यांनी अगोदरच फलंदाजीचा सराव केला होता. मी त्या ठिकाणी पोहचलो त्यावेळी अझर लंच करत होते. अझर म्हणाले, याला गोलंदाजी करू द्या.”
“मी गोलंदाजी करण्यास सुरुवात केली. तेव्हा 8 चेंडूत तब्बल 5 वेळा देबाशिष मोहंतीला बाद केले. सचिन माझ्या बाजूला थांबला होता. त्यानंतर अजय जडेजाने मला पाहिले आणि अझरला म्हणाले की, या मुलाला पाहा. माझी गोलंदाजी पाहून सचिन मला म्हणाला की, तू तुझ्या खेळावर लक्ष केंद्रीत कर. लवकरच तू भारतीय संघात खेळताना दिसशील.”
“या नेट्स सेशनमध्ये मी ‘दुसरा’ चेंडू फेकला होता. या चेंडूमुळेच माझी भारतीय संघात ‘एंट्री’ झाली. सचिन तेंडुलकर, अजय जडेजा, आणि त्यावेळचे कर्णधार मोहम्मद अजरुद्दीन हे माझ्या गोलंदाजीने प्रभावीत झाले. या घटनेनंतर तब्बल एक वर्षाने म्हणजे 1998 साली माझी भारतीय संघात एंट्री झाली.”
“या चेंडूला मी लेग कटर म्हणायचो. पुढे मोईन खान ने या चेंडूचे नामकरण ‘दुसरा’असे केले. सकलेन मुश्ताक गोलंदाजी करताना तो त्याला सारखे दुसरा टाक, असे म्हणायचा. त्यावरून त्या चेंडूचे नाव दुसरा सापडले.”
भारताकडून हरभजन सिंगने 103 कसोटी सामने खेळताना 417 बळी घेतले. 236 वनडे सामन्यात 269 बळी घेतल्याची नोंद त्याच्या नावावर आहे. हरभजन सिंगने 2007 सालचा टी-20 विश्वचषक आणि 2011 चा विश्वचषक जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
ट्रेंडिंग घडामोडी –
भारतातील सर्वात वयस्कर क्रिकेटपटूचे आज निधन
अबब! वयाच्या ३६व्या वर्षी हा पाकिस्तानचा खेळाडू करतोय संघात चौथ्यांदा कमबॅक
मुक्या प्राण्यांची सेवा करतानाचा शिखर धवनचा व्हिडीओ सोशल मीडियावर होतोय व्हायरल