भारतीय संघासाठी आशिया चषक 2022 हंगामाची सुरुवात गोड झाली. भारतीय संघाने या हंगामातील पहिला सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान संघासोबत खेळला आणि जिंकला देखील. या सामन्यात भारताने प्रथम गोलंदाजी आणि नंतर फलंदाजीत मोलाचे योगदान दिले. भारताचा युवा खेळाडू रिषभ पंत ऐवजी अनुभवी दिनेश कार्तिक या सामन्यात यष्टीरक्षकाची भूमिका पार पाडताना दिसला. माजी दिग्गज हरभन सिंग याच्या मते पंतला बाहेर बसवण्याचा संघ व्यवस्थापनाचा निर्णय अगदी योग्य होता.
पाकिस्तानविरुद्धच्या या सामन्यात नेहमीप्रमाणे रिषभ पंत (Rishabh Pant) यष्टीरक्षकाच्या भूमिकेत दिसेल, अशी सर्वांचीच अपेक्षा होती. परंतु काही कारणास्तव पंतला प्लेइंग इलेव्हनमधून वगळले गेले. संघ व्यवस्थापनाच्या या निर्णयामुळे चाहत्यांमध्ये चांगलीच नाराजी पाहिली गेली. परंतु माजी दिग्गज हरभजन सिंग (Harbhajan Singh) याच्या मते पंत ऐवजी दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देणे, हा अगदी योग्य निर्णय होता.
हरभजन सिंग म्हणाला की, “खरोखर पंतने कसोटी क्रिकेटमध्ये कमाल केली आहे आणि भारताला अनेक सामने जिंकवून दिले आहेत. पण आपण जर छोट्या (टी-२०) फॉरमॅटचा विचार केला, तर पंत तितकासा यशस्वी झाला नाहीये. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात पंतच्या जागी कार्तिकला खेळवणे हा माझ्या हिशोबाने योग्य निर्णय आहे. तुम्ही कार्तिकचा ग्राफ (आकडेवारी) पाहा, त्याने अलिकडच्या काळात जी कमाल केली आहे, ती अद्भुत आहे. माझ्या दृष्टीने हा एक योग्य निर्णय होता.”
हरभजनच्या मते पंत अजुन युवा आहे आणि त्याला भविष्यात अजून खूप क्रिकेट खेळायचे आहे. परंतु कार्तिककडे मात्र जास्त वेळ नाही. कार्तिक कसाबसा अजून एक किंवा दोन वर्ष क्रिकेट खेळेल, अशी शक्यता आहे. त्याच्या मते कार्तिक सध्या ज्या फॉर्ममध्ये आहे, त्याचा संघाने फायदा करून घेतला पाहिजे. तो भारताला खूप सामने जिंकवून देऊ शकतो. हार्दिक पंड्या (Hardik Pandya) आणि कार्तिक मिळून संघासाठी ही कामगिरी करू शकतात. मला वाटते की, विरोधी गोलंदाजांसाठी ही चिंतेची बाब असेल, असेही हरभजन पुढे म्हणाला. दरम्यान, पाकिस्तानविरुद्ध कार्तिकला फलंदाजी करताना जास्त चेंडू खेळता आले नाहीत, पण यष्टीरक्षकाच्या भूमिकेत त्याने तीन झेल पकडले. भाराताला पुढचा सामना बुधवारी (3 ऑगस्ट) खेळायचा आहे. संघ व्यवस्थापन या सामन्यात पंतला संधी देते की नाही, याविषयी चाहत्यांमध्ये उत्सुकता असेल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
एका सामन्यामुळे हार्दिकची कमाई थेट ‘इतक्या’ टक्क्यांनी वाढली! वाचा सविस्तर
आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात गोलंदाजाचा कहर! केवळ 9 धावा देताना ‘इतके’ बळी घेत रचलाय विक्रम
टी-20 विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलियाची चिंता वाढली, दुखापतीमुळे महत्वाचा अष्टपैलू संघातून बाहेर