नुकताच इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलच्या १५व्या हंगामाची सांगता झाली. ही स्पर्धा संपल्यानंतर अनेक माजी खेळाडू आणि क्रिकेट जाणकारांनी आयपीएलमध्ये प्रभावित केलेल्या खेळाडूंचा एक संघ बनवला आहे. त्याला आयपीएल सर्वोत्तम प्लेइंग ११ असे सांगितले जाते. आकाश चोप्रा, सचिन तेंडुलकर यांच्यानंतर आता भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंग यानेही आपली सर्वोत्तम प्लेइंग ११ बनवली आहे.
हरभजन सिंगने (Harbhajan Singh) आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) आणि मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघातील एकही खेळाडू निवडलेला नाही. आयपीएलच्या इतिहासात चेन्नई आणि मुंबई यांनी मिळून ९ विजेतेपदे पटकावली आहेत. मात्र, यावेळी दोन्ही संघांना प्लेऑफमध्ये स्थान मिळवता आले नाही. विशेष म्हणजे हरभजनने आयपीएल निवृत्त होण्याआधी हरभजन चेन्नई आणि मुंबई या दोन्ही संघांकडून खेळला आहे.
हरभजनने त्याच्या संघात सलामीवीर म्हणून जोस बटलर (Jos Buttler) आणि केएल राहुल (KL Rahul) यांची निवड केली आहे. या दोन्ही फलंदाजांनी आयपीएल २०२२मध्ये फलंदाजीत अप्रतिम कामगिरी केली. बटलरने १७ सामन्यात ८६३ धावा केल्या, तर राहुलने १५ सामन्यात ६१६ धावा केल्या. त्यानंतर हैदराबादचा फलंदाज राहुल त्रिपाठीला तिसऱ्या क्रमांकावर ठेवले आहे. त्याच वेळी, हरभजनने मधल्या फळीत चौथ्या क्रमांकासाठी आयपीएल २०२२मधील सर्वात लांब षटकार मारणाऱ्या लियाम लिविंगस्टोनचा समावेश केला आहे. पाचव्या क्रमांकासाठी हार्दिक पंड्याला संघात घेतले असून त्याला कर्णधारही करण्यात आले आहे.
पुढे हरभजनने यष्टीरक्षकाची जबाबदारी दिनेश कार्तिकच्या हाती दिली आहे. त्याच्याशिवाय कोलकाता नाईट रायडर्सचा फलंदाज आंद्रे रसेलचाही हरभजनने त्याच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश केला आहे. गोलंदाजीत त्याने राशिद खान, युझवेंद्र चहल यांना फिरकीपटू म्हणून, तर वेगवान गोलंदाजीची जबाबदारी उमरान मलिक आणि जोश हेजलवूड यांच्या खांद्यावर टाकली आहे. अशातच आता हरभजनने संघात रोहित शर्मा, विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी यांना स्थान न दिल्याने चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
हरभजनची प्लेइंग इलेव्हन
जोस बटलर, केएल राहुल, हार्दिक पंड्या (कर्णधार), राहुल त्रिपाठी, लियाम लिविंगस्टोन, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), आंद्रे रसेल, राशिद खान, युझवेंद्र चहल, उमरान मलिक, जोश हेजलवूड.
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
पहिल्या राउंडमध्ये अनसोल्ड राहिलेला डेविड मिलर सगळ्यांनाच पुरून उरला
इंग्लंडच्या युवा गोलंदाजाने फेकला ‘हेल्मेट तोड’ खतरनाक बाऊंसर, व्हिडिओ पाहून तुमचाही उडेल थरकाप
जसप्रीत बुमराहच्या पत्नीमुळे रोहित शर्माचे चाहते नाराज? धक्कादायक कारण आले समोर