स्टार अष्टपैलू हार्दिक पंड्याने त्याच्या उर्वरित क्रिकेट कारकिर्दीबाबत एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. तो मुंबई सोडून बंगळुरूला कायमस्वरूपी स्थायिक झाला आहे. त्याने शहराच्या बाहेरील भागात, ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ (CoE) च्या जवळ एक घर भाड्याने घेतले आहे. त्यामुळे जेव्हा तो भारतीय संघ, आयपीएल किंवा इतर देशांतर्गत क्रिकेटमध्ये व्यस्त नसेल तेव्हा तो बीसीसीआयच्या सीओईमध्ये असेल.
हार्दिक मागील काही वर्षांपासून दुखापतींचा सामना करत आहे. त्याने सध्या उचलेले पाऊल हे त्याची संपूर्ण क्रिकेट रणनीती बदलणारे आहे. त्याने भारतासाठी अनेक महत्त्वाच्या सामन्यांमध्ये उल्लेखनीय खेळी आहे, मात्र तेवढाच तो त्याच्या दुखापतींमुळेही चर्चेत राहिला आहे. पाठीचा त्रास, मांडीच्या स्नायूंची दुखापत आणि घोट्याची दुखापत या वारंवार होणाऱ्या दुखापतींमुळे त्याला अनेक मोठ्या मालिकांना मुकावे लागले आहे. त्यामुळे त्याने आता त्याच्या कारकिर्दीची उर्वरित वर्षे पूर्णपणे फिटनेसनुसार आखण्याचा निर्णय घेतला आहे.
आपल्या उर्वरित कारकिर्दीसाठी बीसीसीआयचे ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ हेच आपले कायमस्वरूपी प्रशिक्षण केंद्र बनवणारा हार्दिक पहिला भारतीय क्रिकेटपटू ठरेल. २०२७ चा वनडे विश्वचषक आणि २०२८ च्या ऑलिम्पिक स्पर्धेच्या दृष्टीने तो सर्वतोपरी प्रयत्न करत आहे; त्याला आणखी ५ ते ६ वर्षे खेळण्याची इच्छा आहे. यामुळेच त्याने बंगळुरूला स्थायिक होण्याचा निर्णय घेतला आहे.
हार्दिक मुळचा बडोद्याचा आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून तो मुंबईत राहत असून तेथे तो प्रामुख्याने मुंबई इंडियन्सच्या सेंटरमध्ये प्रशिक्षक घेतो. मिळालेल्या माहितीनुसार, घरापासून रोजचा लांब प्रवास हे त्याच्यासाठी एक आव्हान बनले होते. दुसरीकडे बंगळुरूमध्ये कायमस्वरुपी राहिल्याने त्याला सीओईमध्ये जाण्यास फायदेशीर आहे, जिथे त्याला जागतिक दर्जाच्या वैद्यकीय सुविधा, पुनर्वसन, फिटनेस आणि कौशल्या सुविधा मिळेल.
हार्दिक सध्या दुखापतीतून सावरत असून तो भारतीय संघाबाहेर आहे. यामुळे तो युके दौऱ्याला मुकला आहे. वैयक्तिक कारणांमुळे त्याने काही दिवसांची विश्रांती घेतली असून एक-दोन दिवसांत तो बंगळुरूला परतणार आहे.
भारत इंग्लंड दौऱ्यानंतर झिम्बाब्वेच्या दौऱ्यावर जाणार आहे. यामध्ये तीन सामन्यांची टी२० मालिका खेळली जाणार आहे. त्यामध्ये हार्दिक पुनरागमन करणार की नाही हे निश्चित नाही. त्याला वैद्यकिय पथकाने पूर्णपणे फिट घोषित केले तेव्हाच त्याचा झिम्बाब्वेच्या मालिकेसाठी विचार केला जाणार आहे. सध्या मात्र त्याने घेतलेल्या निर्णयामुळे त्याने आपल्या फिटनेसला प्राधान्या देण्याचे ठरवले आहे.






