---Advertisement---

आयसीसी टी 20 क्रमवारीत अभिषेक शर्माचे वर्चस्व संपुष्टात! संघसहकाऱ्यानेच पटकावले अव्वल स्थान

On: बुधवार, जुलै 1, 2026 5:50 PM
---Advertisement---

आज आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) क्रमवारी जाहीर केली. त्याप्रमाणे टी२० फलंदाजीच्या क्रमवारीमध्ये मोठा बदल दिसला आहे. आयसीसी पुरुष टी२० आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या क्रमवारीत आणखी एका भारतीय फलंदाजाने अव्वल स्थान पटकावले आहे. ईशान किशनने संघसहकारी अभिषेक शर्माला मागे टाकत पहिल्या क्रमांकावर कब्जा केला आहे.

आयर्लंड विरुद्ध भारत यांच्यात नुकतेच दोन सामन्यांची टी२० मालिका खेळली गेली, ज्यामध्ये आयर्लंडने २-० ने विजय मिळवला. या मालिकेनंतर आयसीसीने जाहीर केलेल्या क्रमवारीनुसार ईशानने त्याच्या कारकिर्दीतील सर्वोच्च रेटिंग मिळवून अभिषेकला मागे टाकले आहे.

ईशानची मागील काही महिन्यांमधील कामगिरी पाहिली तर त्याने देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांमध्ये जबरदस्त कामगिरी करत भारतीय संघात पुनरागमन केले. त्यानंतर त्याने आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६ मध्ये कामगिरीत सातत्य राखत स्पर्धेत जवळपास २०० च्या स्ट्राईक रेटने ३१७ धावा केल्या. त्यामधील कोलंबोमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्याने ४० चेंडूंत ७७ धावा करत सामनावीराचा पुरस्कार पटकावला होता.

अभिषेक जवळपास एक वर्ष अव्वल स्थानावर होता, तर आता ईशानने ते स्थान पटकावत अग्रस्थानी राहणाऱ्या भारतातील चार पुरुष खेळाडूंपैकी एक म्हणून विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव यांच्या विशेष गटात स्थान मिळवले आहे.

टी २० आंतरराष्ट्रीय फलंदाजांची क्रमवारी पाहिली तर अव्वल स्थानी असलेल्या दोन भारतीय खेळाडूंच्या रेटिंग पॉइंट्समध्ये केवळ ७ चा फरक आहे. ईशान ८७६ पॉइंट्ससह पहिल्या आणि अभिषेक ८६९ पॉइंट्ससह दुसऱ्या स्थानावर आहे. तिलक वर्मा सहाव्या स्थानावर कायम असून माजी भारतीय कर्णधार सूर्यकुमारला एका स्थानाचे नुकसान झाले आहे. तो फलंदाजांच्या क्रमवारीत आता आठव्या स्थानावर पोहोचला आहे.

तसेच अष्टपैलूंच्या क्रमवारीत शिवम दुबेला तीन स्थानांचा फायदा झाला आहे. तो सध्या सातव्या स्थानावर पोहोचला आहे. आयर्लंडच्या खेळाडूंना भारताविरुद्ध केलेल्या विशेष कामगिरीचा फायदा आयसीसी क्रमवारीत झाला आहे. त्यांचा वेगवान गोलंदाज मॅथ्यू हम्फ्रीजने मालिकेत चार विकेट्स घेत त्याच्या कारकिर्दीतील सर्वोच्च असे २५ वे स्थान पटकावले आहे. अष्टपैलूंमध्ये गॅरेथ डेलानी याला चार स्थानांचा फायदा झाला असून तो सध्या २४ व्या स्थानावर आणि हॅरी टेक्टर ३८ व्या स्थानावर (८ स्थानांचा फायदा) पोहोचला आहे.

त्याचबरोबर रशिद खान गोलंदाजी क्रमवारीत आणि झिम्बाब्वेचा सिंकदर रझा अष्टपैलू क्रमवारीत अव्वलस्थानी कायम आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---