टी-२० विश्वचषक स्पर्धेत हार्दिक पांड्याचे प्रदर्शन सुमार राहिले. पांड्याने विश्वचषकात केवळ दोन सामन्यांत गोलंदाजी केली. भारत या स्पर्धेत सुपर-१२ फेरीतूनच बाद झाला. पांड्या त्याच्या फिटनेसशी संबंधित अनेक गोष्टी उघड करत नसल्याचीही टीका होत आहे. त्याला न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी संघात स्थान मिळाले नव्हते. भारताने ही मालिका ३-० ने जिंकली होती. यानंतर आता हार्दिक पांड्या जर गोलंदाजी करत नाही तरी त्याला अष्टपैलू म्हणता येईल का? असा प्रश्न भारताचा माजी कर्णधार कपिल देव यांनी उपस्थित केला आहे.
कपिल देव म्हणाले, ‘हार्दिकला अष्टपैलू म्हणायचे असेल तर त्याला गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्ही करावी लागेल. तो गोलंदाजी करत नसेल तर त्याला अष्टपैलू म्हणायचे का? तो दुखापतीतून सावरला आहे, त्यामुळे त्याला प्रथम गोलंदाजी करू द्या. तो भारतीय संघासाठी खूप महत्त्वाचा फलंदाज आहे. गोलंदाजीसाठी त्याला भरपूर खेळावे लागेल आणि चांगली कामगिरी करावी लागेल. तरच त्याला अष्टपैलू म्हणता येईल.’
यावेळी कपिल देव यांनी राहुल द्रविडवर भाष्य करत म्हटले की क्रिकेटपटू म्हणून मिळालेल्या यशापेक्षा प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविडला अधिक यश मिळेल. कपिल देव म्हणाले, ‘तो एक चांगला माणूस आहे आणि एक चांगला क्रिकेटरही आहे. क्रिकेटपटूपेक्षा प्रशिक्षक म्हणून तो अधिक यशस्वी ठरेल.’ न्यूझीलंड मालिकेपूर्वी रवी शास्त्री यांच्यानंतर द्रविडला भारतीय संघाचा नवा प्रशिक्षक बनवण्यात आले आहे.
कपिल देव यांना त्यांच्या आवडत्या अष्टपैलू खेळाडूबद्दल विचारले असता त्यांनी रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा यांचे नाव घेतले. ते म्हणाले, ‘आजकाल मी फक्त क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी जातो. सध्या तेच तर माझे काम आहे.’ कपिल देव आपल्या आवडत्या अष्टपैलू खेळाडूबद्दल म्हणाले, ‘मी अश्विनचे नाव घेईन. तो परिपूर्ण असा अष्टपैलू आहे. जडेजा सुद्धा महान क्रिकेटपटू आहे. त्याची फलंदाजी सुधारली आहे, पण गोलंदाजी खराब झाली आहे. पण भारतीय संघाला त्याच्यासारख्या क्रिकेटपटूंची गरज आहे.’
महत्त्वाच्या बातम्या-
ऍशेस मालिकेसाठी सज्ज होतोय बेन स्टोक्स, गाबामध्ये इंग्लिश गोलंदाजांची केली जोरदार धुलाई- Video
चढले तेज हळदीचे! राजस्थान रॉयल्सचा राहुल तेवतिया चढणार बोहल्यावर, हळदी समारंभाचे फोटो केले शेअर