आयपीएलच्या मैदानात मंगळवारी नवख्या साई सुदर्शन याने अर्धशतक ठोकत गुजरात टायटन्सला विजय मिळवून दिला. आयपीएल 2023 मधील गुजरातचा हा सलग दुसरा विजय ठरला. गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्या याने या विजयानंतर नाबाद अर्धशतकी खेळी करणाऱ्या साई सुदर्शन याचे विशेष कौतुक केले. तो लवकरच भारतीय संघातही दिसू शकतो असे भाकीतही त्याने वर्तवले.
गुजरात संघाला या सामन्यात विजयासाठी 163 धावांची आवश्यकता होती. संघाचे आघाडीचे तीन फलंदाज केवळ 54 धावांवर तंबूत परतले होते. अशावेळी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या साई सुदर्शन याने संयमी खेळ दाखवला. त्याने विजय शंकरसह अर्धशतकी भागीदारी रचली. त्यानंतर डेव्हिड मिलरसह नाबाद भागीदारी करत संघाला विजय मिळवून दिला.
सुदर्शन याने या सामन्यात 48 चेंडूवर 62 धावा काढल्या. यामध्ये 4 चौकार व 2 षटकारांचा समावेश होता. या खेळीसाठी त्याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. तसेच हंगामातील पहिल्या सामन्यातही त्याची बॅट बोलली होती. केन विलियम्सनच्या जागी इम्पॅक्ट प्लेयर म्हणून आल्यानंतर त्याने गिलसह 53 धावांची भागीदारी करत गुजरातला सामन्यात मजबूत स्थितीत नेले होते.
त्याच्या यात सातत्यपूर्ण खेळानंतर बोलताना संघाचा कर्णधार हार्दिक पंड्या म्हणाला,
“जेव्हापासून आम्ही या हंगामात एकत्रित आलो आहोत तेव्हापासून त्याचा फॉर्म दिसून येतोय. त्याची खासियत म्हणजे तो कोणत्याही क्रमांकावर फलंदाजी करण्यास सक्षम आहे. त्याचे तंत्र चांगले असून, फिरकी गोलंदाज आणि वेगवान गोलंदाज यांच्याविरुद्ध तो तितक्याच सक्षमतेने फलंदाजी करतो. मला विचारलं तर तो पुढील दोन वर्षात भारतीय संघातही खेळताना दिसेल.”
मागील वर्षी आयपीएल लिलावात गुजरातने त्याला केवळ 20 लाखात आपल्या संघात सामील करून घेतले होते. त्याने आतापर्यंत आयपीएलमध्ये 7 सामने खेळताना 45 पेक्षा जास्तच्या सरासरीने 229 धावा केल्या आहेत. तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये तामिळनाडूचे प्रतिनिधित्व करतो.
(Hardik Pandya Said Sai Sudarshan Will Play For Team India In Next Two Years)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पंच नितीन मेननचं स्वप्न खरं होणार! पहिल्यांदाच करणार ‘या’ महत्वाच्या मालिकेत अंपायरिंग
दुखापतग्रस्त राज बावाच्या जागी पंजाब किंग्जमध्ये दमदार खेळाडूची एन्ट्री, फ्रँचायझीने मोजली एवढी किंमत