आगामी टी२० विश्वचषक २०२२च्या दृष्टीने भारतीय संघासाठी तत्पूर्वी होणारा प्रत्येक टी२० सामना महत्त्वपूर्ण असणार आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धची ५ सामन्यांची टी२० मालिका संपल्यानंतर आता भारतीय संघ आयर्लंड दौऱ्यावर २ सामन्यांची टी२० मालिका खेळणार आहे. ही मालिका भारतीय संघासाठी खेळाडूंना आजमावण्यासाठी चांगला मंच उपलब्ध करून देईल. या मालिकेसाठी अष्टपैलू हार्दिक पंड्या याच्यावर कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पंड्या आयर्लंडविरुद्ध भारतीय टी२० संघाचे नेतृत्त्व करणारा तिसराच कर्णधार असेल.
पंड्यापूर्वी २ खेळाडूंनी आयर्लंडविरुद्ध केलंय भारतीय संघाचे नेतृत्त्व
यापूर्वी भारतीय संघ (Team India) २ वेळा आयर्लंडशी भिडला (Ireland vs India) आहे. सर्वप्रथम २००९ मध्ये आयसीसी वर्ल्ड ट्वेंटी ट्वेंटी स्पर्धेदरम्यान भारत आणि आयर्लंड संघ भिडले होते. या सामन्यात एमएस धोनी भारतीय संघाचा कर्णधार होता. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना आयर्लंडने भारतीय संघाला विजयासाठी ११३ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताकडून सलामीवीर रोहित शर्माने अर्धशतक करत संघाला ८ विकेट्सने सामना जिंकून दिला होता.
याखेरीज २०१८ मध्ये भारतीय संघाने विराट कोहलीच्या नेतृत्त्वात २०१८ मध्ये आयर्लंडचा दौरा केला होता. या दौऱ्यात उभय संघांनी २ टी२० सामने खेळले होते. ही मालिका भारतीय संघाने २-० च्या फरकाने जिंकली होती. यातील पहिला टी२० सामना ७६ धावांनी तर दुसरा टी२० सामना १४३ धावांनी जिंकण्यात भारतीय संघाला यश आले होते.
खेळाडू म्हणून हार्दिकने केला होता मागील दौरा
मागील आयर्लंड दौऱ्यावर हार्दिक पंड्या (Hardik Pandya) खेळाडू म्हणून गेला होता. मात्र यंदा तो या दौऱ्यात कर्णधाराच्या भूमिकेत असणार आहे. मागील दौऱ्यात खेळाडू म्हणून हार्दिकला विशेष कामगिरी करता आली नव्हती. तो पहिल्या टी२० सामन्यात ६ तर दुसऱ्या टी२० सामन्यात ३२ धावा करू शकला होता. त्यावेळी तो भारतीय संघाकडून फिनिशरची भूमिका निभावत होता. अशात आता त्याच्यासाठी हा दौरा कसा राहिल, हे पाहावे लागणार आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
VIDEO। बटलरचा ‘हा’ सिक्स पाहून तुम्हीपण म्हणाल ‘नादच खुळा!’
टी२० विश्वचषकासाठी महान कर्णधाराने निवडली भारताची सलामी जोडी, रोहितसह ‘या’ फलंदाजाचं घेतलं नाव
अरेरे! फक्त एका धावेने हुकले डेविड वॉर्नरचे शतक, ९९ वर यष्टीचीत होत लाजिरवाणा विक्रमही नावावर