आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेचा प्रारंभ व्हायला अवघे ३ महिने शिल्लक राहिले आहेत. भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात पार पाडलेली टी-२० मालिका ही टी-२० विश्वचषक स्पर्धेपूर्वीची भारताची शेवटची मर्यादित षटकांची मालिका होती. यानंतर आता हे खेळाडू सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या आयपीएल स्पर्धेत खेळताना दिसून येणार आहेत. ही स्पर्धा संपल्यानंतर टी-२० विश्वचषक स्पर्धा खेळली जाणार आहे. अशातच प्रसिद्ध समालोचक हर्षा भोगले यांनी टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी संभावित खेळाडूंचा संघ निवडला आहे.
हर्षा भोगले यांनी क्रिकबजवर बोलताना, आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी संभावित भारतीय खेळाडूंचा संघ निवडला आहे. त्यांनी आपल्या संघात ५ फलंदाजांना संधी दिली आहे. यामध्ये रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल आणि सूर्यकुमार यादवला संधी दिली आहे. तर पाचव्या क्रमांकासाठी इशान किशन आणि श्रेयस अय्यर यांच्यात स्पर्धा असेल. हर्षा भोगले यांचे म्हणणे आहे की, पाचव्या क्रमांकावर डाव्या हाताचा फलंदाज असल्याने संघाला फायदा होतो.
हर्षा भोगले यांनी डाव्या हाताचा सलामीवीर फलंदाज शिखर धवनला या संघात स्थान दिले नाही. तर यष्टिरक्षक फलंदाज म्हणून त्यांनी रिषभ पंतला या संघात स्थान दिले आहे.(Harsha Bhogle picks his Indian squad for upcoming T-20 world cup 2021)
तसेच हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदरला त्यांनी अष्टपैलू खेळाडू म्हणून संघात जागा दिली आहे. तर गोलंदाजांबद्दल बोलायचं झालं तर फिरकी गोलंदाज म्हणून त्यांनी युजवेंद्र चहल आणि वरून चक्रवर्ती यांना आपल्या संघात स्थान दिले आहे. तर वेगवान गोलंदाज म्हणून त्यांनी जसप्रीत बुमराह, दीपक चाहर आणि भुवनेश्वर कुमार यांना संधी दिली आहे. तसेच त्यांचे असे म्हणणे आहे की, टी नटराजन किंवा मोहम्मद शमी यांपैकी एक गोलंदाज संघात असू शकतो.
असा आहे हर्षा भोगले यांनी निवडलेला भारतीय खेळाडूंचा संभावित संघ:
रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली (कर्णधार), सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर/ ईशान किशन, रिषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, वरुण चक्रवर्ती, वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, दीपक चाहर, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी/टी नटराजन, युजवेंद्र चहल
महत्त्वाच्या बातम्या-
निकोलस पुरनची चिवट झुंज व्यर्थ, दुसऱ्या टी२०त पाकिस्तानचा वेस्ट इंडिजवर ७ धावांनी विजय
चला जरा फिरूया! मायदेशी परतताच ‘या’ खास ठिकाणाला धवनने दिली भेट; चाहत्यांसोबत फोटोही काढले