इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामात सोमवारी(११ ऑक्टोबर) एलिमिनेटर सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा कोलकाता नाईट रायडर्सकडून पराभव झाला. त्यामुळे या स्पर्धेतील आरसीबीचे आव्हान संपुष्टात आले. याबरोबरच विराट कोहलीचा आरसीबी कर्णधार म्हणून प्रवासही संपला. विराटने मागील महिन्यातच स्पष्ट केले होते की तो आयपीएल २०२१ हंगामात आरसीबीचे अखेरच्यावेळी नेतृत्व करत आहे, पण यापुढे तो केवळ खेळाडू म्हणून योगदान देत राहिल.
या सामन्यानंतर आरसीबीचा गोलंदाज हर्षल पटेल मीडियासमोर आला होता. जेव्हा त्याला विराट कोहलीबद्दल प्रश्न विचारण्यात आले, तेव्हा त्याने त्याच्या कर्णधाराचे खूप कौतुक केले. कर्णधारपद सोडल्यानंतरही तो त्यांचा लीडर(नेता) राहील, असे त्याने सांगितले. या हंगामात सर्वाधिक ३२ विकेट घेणाऱ्या हर्षलने डेथ ओव्हर्समध्ये गोलंदाजी करण्याची संधी दिल्याबद्दल कोहलीचे आभारही मानले.
हर्षल पटेल म्हणाला, ‘विराटने सुरुवातीपासून माझा खूप आत्मविश्वास वाढवला आहे. मी आज पर्यंत कधी डेथ ओव्हर्समध्ये गोलंदाजी केली नव्हती. मी फक्त हरियाणाकडून खेळताना डेथ ओव्हर्समध्ये गोलंदाजी केली होती. पण अचानकपने विराटने मला डेथ ओव्हर्समध्ये गोलंदाजी करण्यास सांगितले. नक्कीच त्याने माझ्यात काहीतरी पाहिले असावे. माझ्यावर विश्वास दाखवला म्हणून मी विराटचा ऋणी राहील.’
तो पुढे म्हणाला, ‘विराट ज्या पद्धतीने मैदानावर उत्साह घेऊन येतो ते खूप चांगली गोष्ट आहे. सगळ्यांना माहीत आहे, तो गोलंदाजांच्या पाठीशी उभा राहतो. गोलंदाजांना मोकळीक देतो. त्यांना त्यांच्या योजना अंमलात आणण्यासाठी मदत करतो. म्हणुन मी त्याचे आभार मानतो. मी त्याच्याकडून खूप शिकलो आहे.’
हर्षल पुढे म्हणाला, ‘मी २०१२ पासून विराट सोबत खेळत आलो आहे. या खेळात कर्णधार असतात किंवा लीडर असतात आणि नक्कीच तो एक महान लीडर आहे. विराटकडे कर्णधारपद नसले, तर याचा अर्थ असा नाही की तो एखाद्या लीडरपेक्षा कमी आहे. मला त्याचे आभार यासाठी मानायचे आहेत की त्याने संघासाठी खूप मेहनत घेतली होती. संघाच्या प्रगतीसाठी माझ्या विकासासाठी त्याने खूप मदत केली आहे. जेव्हा मी लयीत नसायचो तेव्हा तो खंबीरपणे माझ्या मागे उभा राहिला. म्हणून मी विराटचा कायम ऋणी असेन.’
हर्षल हा आयपीएलमध्ये एका हंगामात सर्वाधिक विकेट्स घेणारा भारतीय गोलंदाजही ठरला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
टी२० क्रिकेटमध्ये ४०० हून अधिक षटकार मारणारे ७ क्रिकेटर, यादीत रोहित शर्मा एकमेव भारतीय
दिल्लीविरुद्ध ‘अशी’ असेल केकेआरची रणनिती, सलामीवीर शुबमन गिलचा खुलासा