इंडियन प्रीमियर लीगची (आयपीएल) लोकप्रियता पाहता विविध देशांतील खेळाडूंना या स्पर्धेत खेळण्याचा मोह आवरता येत नाही. तसेच देशातील खेळाडूंचीही यात चढाओढ सुरू असते. त्यातच दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधारानेही आयपीएलमध्ये खेळण्याचा विचार मांडला आहे. मर्यादित षटकात दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्व करणारा टेम्बा बावुमा (Temba Bavuma) याने आयपीएलमध्ये खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तसेच त्याला या स्पर्धेत नुसतेच खेळायचे नसून संघाचे नेतृत्व करायचे आहे.
क्रिकेट मंथलीशी चर्चा करताना बावुमाने म्हटले, “मला आयपीएलमध्ये खेळायचे आहे. यामध्ये माझी कामगिरी जितकी चांगली होईल तितक्या अधिक संधी मला मिळतील. मला आयपीएलच्या संघाचे नेतृत्वही करायचे आहे. हे कधी शक्य होईल ते सांगता येणार नाही. पण त्यासाठी आधी मला आयपीएलच्या संघात सहभागी होणे आवश्यक आहे.”
क्विंटन डी कॉकने २०२१ मध्ये कर्णधारपद सोडल्यानंतर बावुमाने संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी सांभाळली. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात पाच सामन्यांची टी२० मालिका खेळली जाणार आहे. यातील पहिला सामना ९ जूनला दिल्लीच्या अरूण जेठली स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या मालिकेतही तो संघाचे नेतृत्व करणार आहे.
बावुमा सध्या दक्षिण आफ्रिकेचा तिन्ही प्रकाराचा नियमित खेळाडू आहे. त्याने ५१ कसोटी सामने खेळताना २६१२ धावा, १९ वनडे सामन्यात ४५.१२च्या सरासरीने ७२२ धावा काढल्या आहेत. तर २१ टी२० सामन्यात ५०१ धावा केल्या आहेत.
आयपीएल पंधराव्या हंगामात डी कॉक आणि डेविड मिलर यांनी उत्तम कामगिरी केली आहे आणि हे दोघेही भारता विरूद्धच्या सामन्यात खेळणार आहेत. तर कगिसो रबाडा, एडन मार्करम, एन्रीच नॉर्किया आणि मार्को जेनसन यांनाही आयपीएलच्या मागील हंगामात खेळताना चांगले प्रदर्शन करत राष्ट्रीय संघात स्थान मिळवले होते. यावरून आयपीएलमधील कामगिरी भारताच्याच नाही तर इतर देशाच्या संघ निवडीसाठी उत्तम ठरत आहे.
आयसीसी क्रमवारीत टी२० प्रकारामध्ये अव्वल स्थानावर असणाऱ्या दक्षिण आफ्रिका (South Africa) संघ भारताविरुद्ध उत्तम कामगिरी करण्यास आतूर आहे. त्यांनी मागील वर्षी दौऱ्यावर आलेल्या भारतीय संघाला कसोटीमध्ये २-१ आणि वनडे सामन्यात ३-० असे पराभूत केले आहे.
महा स्पोर्ट्चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पाकिस्तानला हरवत बक्षीस म्हणून मिळालेली ‘ऑडी १००’ पाहून शास्त्री भावूक, ३७ वर्षांनंतर पाहिली कार
आयपीएलच्या महासंग्रामानंतर पुन्हा सुरू होणार मानांकित रणजी ट्रॉफी, नॉकआउट राउंडचे वेळापत्रक