भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी२० मालिकेचा दुसरा सामना शुक्रवारी(१९ नोव्हेंबर) खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाने न्यूझीलंडला ७ विकेट्स राखून पराभूत केले. टी२० विश्वचषकानंतर भारतीय संघाचे वरिष्ठ खेळाडू विश्रांतीवर आहेत आणि युवा खेळाडूंना संधी दिली गेली आहे. हर्षल पटेललाही शुक्रवारी पहिल्यांदाच भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. त्याने देखील या संधीचे सोने केले आणि टी२० आंतरराष्ट्रीय पदर्पणाच्या सामन्यात सामनावीर पुरस्कार मिळवला.
हर्षलने या सामन्यात न्यूझीलंडच्या डॅरील मिशेल आणि ग्लेन फिलिप्स या दोघांच्या महत्वाच्या विकेट्स घेतल्या. त्याने त्याच्या चार षटकांच्या स्पेलमध्ये २५ धावा दिल्या आणि संघासाठी किफायतशीर ठरला. दरम्यान, ही या वर्षभरातील दुसरी वेळ आहे, जेव्हा टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतासाठी पदार्पण करणाऱ्या खेळाडूंनी सामनावीर पुरस्कार जिंकला आहे.
हर्षलच्या आधी यावर्षी ईशान किशनने ही कामगिरी केली आहे. ईशानने इंग्लंडविरुद्ध यावर्षी खेळल्या गेलेल्या टी२० मालिकेत पदार्पण केले होते आणि पहिल्याच सामन्यात सामनावीर ठरला होता. ही पहिलीच वेळ आहे, जेव्हा एकाच वर्षात आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये दोन पदार्पण करणाऱ्या भारतीय खेळडूंना पहिल्याच सामन्यात सामनावीर निवडले गेले.
तसेच हर्षल भारतासाठी टी२० आंतरराष्ट्रीय पदार्पण सामन्यात सामनावीर ठरलेला आतापर्यंतचा तिसरा वेगवान गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी ही कामगिरी केलेल्या दोन वेगवान गोलंदाजांमध्ये बरिंदर स्त्रान आणि नवदीप सैनी यांचा समावेश आहे. या दोन वेगवान गोलंदाजांनीही यापूर्वी हर्षल प्रमाणेच आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण सामन्यात सामनावीर पुरस्कार जिंकला होता.
याशिवाय आतापर्यंत भारतासाठी आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पणात सामनावीर पुरस्कार मिळवणाऱ्या एकूण खेळाडूंचा विचार केला, तर ही कामगिरी करणारा हर्षल आठवा खेळाडू आहे. यापूर्वी हर्षलप्रमाणेच ही कामगिरी करणारे सात खेळाडू आहेत. यामध्ये दिनेश कार्तिक, प्रज्ञान ओझा, सुब्रमण्यम बद्रिनाथ, अक्षर पटेल, बरिंदर स्त्रान, नवदीप सैनी, ईशान किशन यांचा समावेश आहे. आता हर्षल पटेल या यादीत नव्याने सामील झाला आहे.
दरम्यान, या सामन्याचा विचार केला तर भारताने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करत भारतासमोर विजयासाठी १५४ धावांचे आव्हान ठेवेल. प्रत्युत्तरात भारतीय संघाने हे लक्ष्य १७.२ षटकत गाठले.
महत्त्वाच्या बातम्या –
पदार्पण करण्यापूर्वी द्रविडने काय दिला होता सल्ला? हर्षल पटेलने केला खुलासा
जरा विचित्रच! बांगलादेशविरुद्ध फलंदाजीवेळी दुर्लक्ष करणे शोएब मलिकला भोवले, ‘असा’ झाला रनआऊट