---Advertisement---

‘वेडेपणा’! आर अश्विनला चौथ्या कसोटीत संधी न दिल्याने दिग्गजांकडून भारतीय संघव्यवस्थापनेवर टीकास्त्र

On: गुरूवार, सप्टेंबर 2, 2021 7:15 PM
---Advertisement---

सध्या इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील चौथा कसोटी सामना ओव्हलच्या मैदानावर सुरू आहे. भारतीय संघाने तिसरा सामना गमावल्यानंतर चाहत्यांनी आणि अनेक दिग्गजांनी अश्विनला चौथ्या कसोटी सामन्यात खेळण्याची संधी मिळेल, अशी आशा व्यक्त केली होती. मात्र, कर्णधार विराट कोहली आणि संघ व्यवस्थापक यांनी मात्र वेगळीच रणनिती असलेली दिसते.

चौथ्या कसोटीसाठी भारतीय संघाने २ बदल केले. मात्र, या दोन्ही बदल करताना भारतीय संघाने वेगवान गोलंदाजांना संधी दिली. ज्यामध्ये शार्दुल ठाकूर आणि उमेश यादव यांचा अंतिम ११ जणांच्या संघात समावेश करण्यात आला. भारतीय संघात सध्या एकच फिरकीपटू गोलंदाज आहे तो म्हणजे रवींद्र जडेजा.

आतापर्यंत झालेल्या तीनही कसोटी सामन्यात अश्विनला संधी दिली गेली नव्हती. त्यामुळे चौथ्या कसोटी सामन्यात अश्विनला नक्कीच संधी मिळेल, अशी अनेकांनी आशा व्यक्त केली होती. मात्र अश्विनला आता आणखी वाट पहावी लागू शकते.

दरम्यान, भारतीय संघाच्या या निर्णयामुळे अनेक दिग्गज क्रिकेटपटूंसह मोठ्या हस्तींनी देखील भारतीय संघ व्यवस्थापकांवर ट्विटरद्वारे टीका केली आहे. ज्यामध्ये हर्षा भोगले, टॉम मूडी, मायकल वॉन यांसह शशी थरूर सारख्या मंडळींनी देखील टीका केली.

वॉन यांनी ट्विट करत म्हटले आहे की ‘आर अश्विनची निवड न होणे हे युकेमधील ४ कसोटींमध्ये आपण कधीही पाहिला नसलेला सर्वात मोठा निर्णय आहे. ४१३ कसोटी विकेट्स आणि ५ कसोटी शतकं. वेडेपणा.’

तसेच हर्षा भोगले यांनी म्हटले आहे की ‘मला खरोखर आशा आहे की हा निर्णय काम करेल; परंतु, मला आश्चर्य वाटले की भारत पुन्हा एकदा अश्विन शिवाय खेळत आहे.’

टॉम मूडी यांनी म्हटले आहे की ‘भारताच्या अंतिम ११ जणांच्या संघात अश्विनला संधी न मिळालेली पाहून आश्चर्य वाटले. मला वाटते की २ फिरकीपटू आणि ३ वेगवान गोलंदाज खेळवण्याची पुरेशी संधी होती. रुट या आक्रमणाविरुद्ध पुन्हा एकचा चांगली कामगिरी करेल.

याव्यतिरिक्तही अनेकांनी अश्विनबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.

मात्र या निर्णयावर बोलताना कोहली म्हणाला, “इंग्लंडमध्ये ४ डावखुरे फलंदाज आहे, त्यामुळे भारताचा वेगवान गोलंदाजांसह जडेजा हा उपयुक्त गोलंदाज ठरू शकतो. त्यामुळे, त्याला या सामन्यात संधी देण्यात आली आहे. तसेच तो ७ व्या क्रमांकावर फलंदाज म्हणून देखील संघात मजबुती आणू शकतो.”

यापूर्वी भारतीय संघाचे गोलंदाज प्रशिक्षक भारत अरुण यांनी अश्विनच्या खेळण्याबाबत वक्तव्य करताना म्हणाले होते की, “इंग्लंडचा संघ अश्विनच्या कौशल्याला जाणून आहेत, त्यामुळे ते अश्विनच्या खेळण्यावर चिंता व्यक्त करत आहे. मात्र, अश्विन चौथ्या कसोटी सामन्यात खेळणार की नाही, हे उद्या (२ सप्टेंबर) नाणेफेक होण्यापूर्वी खेळपट्टी पाहून ठरवले जाईल.”

“निश्चितच अश्विन हा महान फिरकीपटू गोलंदाजांपैकी एक आहे. मात्र दुर्भाग्यने त्याला आतापर्यंतच्या एकही कसोटी सामन्यात संधी मिळाली नाही. परंतु, जर परिस्थिती आणि खेळपट्टी पाहून अश्विनची संघात संधी बनत असेल, तर तो नक्कीच चौथ्या कसोटी सामन्यात रवींद्र जडेजा सोबत खेळू शकतो,” असेदेखील भरत अरुण म्हणाले होते.

दरम्यान दोन्ही संघ या मालिकेत १-१ ने बरोबरीत आहेत. त्यामुळे दोन्ही संघांसाठी चौथा सामना अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. चौथ्या कसोटी सामन्यात इंग्लंड संघाने देखील काही बदल केले आहेत. इंग्लंडचा यष्टिरक्षक फलंदाज जोस बटलर ऐवजी इंग्लंडने ओली पोपला संघात स्थान दिले. तर सॅम करनऐवजी क्रिस वोक्सला संधी मिळाली.

महत्वाच्या बातम्या –
एवढा भारी रेकाॅर्ड आता जेम्स अँडरसनच्या नावावर झालाय, आधी सचिनचं होतं ‘या’ विक्रमावर राज्य
ओव्हल कसोटीत भारतीय संघ उतरला दंडाला काळी पट्टी बांधून; ‘हे’ आहे कारण
विराट जिथे, विक्रम तिथे! कोहलीचा ओव्हल कसोटीदरम्यान मोठा विश्वविक्रम; सचिन, पाँटिगही पडले मागे

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---