टी -२० विश्वचषक स्पर्धेचे आयोजन येत्या १७ ऑक्टोबर पासून युएई आणि ओमानमध्ये केले जाणार आहे. टी-२० विश्वचषक स्पर्धेचे हे सातवे पर्व आहे. या स्पर्धेतील गेल्या ६ पर्वात अनेक मोठ-मोठे विक्रम झाले आहेत. तसेच हे विक्रम मोडण्यातही आले आहे. दरम्यान, सर्वाधिक सरासरी असलेले फलंदाजही खूप चर्चेत असतात. चला तर जाणून घेऊया टी -२० विश्वचषकात आतापर्यंत कोणत्या ५ फलंदाजांची (कमीतकमी १० सामने खेळलेल्या) सरासरी सर्वात जास्त आहे.
१)विराट कोहली :
टी -२० विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक सरासरीने धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराट कोहली सर्वोच स्थानी आहे. याबाबतीत कोणीही त्याच्या आसपास देखील नाहीये. विराट कोहलीच्या टी -२० विश्वचषक स्पर्धेतील कामगिरीबाबत बोलायचं झालं तर, त्याने १६ सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने ८६.३३ च्या सरासरीने ७७७ धावा केल्या आहेत. यादरम्यान ८९ धावा ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे.
२) मायकल हसी :
विराट कोहलीनंतर सर्वाधिक सरासरीने धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानी मायकल हसी आहे. मायकल हसीने २१ सामन्यातील १६ डावात ५४.६२ च्या सरासरीने ४३७ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने दोन अर्धशतक झळकावले होते.
३)केविन पीटरसन :
इंग्लंड संघाचा माजी विस्फोटक फलंदाज केविन पीटरसन या यादीत तिसऱ्या स्थानी आहे. पीटरसन आगळे वेगळे शॉट खेळण्यासाठी प्रसिद्ध होता. तो टी-२० विश्वचषकात सर्वाधिक सरासरीने धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने १५ सामन्यात ४४.६१ च्या सरासरीने एकूण ५८० धावा केल्या होत्या. दरम्यान ७९ धावा ही त्याची सर्वोत्तम खेळी होती.
४)जेपी ड्युमिनी :
दक्षिण आफ्रिकेचा डाव्या हाताचा विस्फोटक फलंदाज जेपी ड्युमिनी हा आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जायचा. त्याने दक्षिण आफ्रिका संघासाठी टी -२० विश्वचषक स्पर्धेत अनेक महत्वाच्या खेळ्या खेळल्या आहेत. ड्युमिनीने या स्पर्धेतील २५ सामन्यात ४०.५७ च्या सरासरीने ५६८ धावा केल्या आहेत. यादरम्यान नाबाद ८६ धावा ही त्याची सर्वोत्तम खेळी होती.(Highest batting average in T20 world cup from Virat Kohli to Chris Gayle)
५)ख्रिस गेल :
वेस्ट इंडिज संघाचा विस्फोटक फलंदाज ख्रिस गेलच्या नावे टी -२० क्रिकेटमध्ये अनेक मोठ मोठ्या विक्रमांची नोंद आहे. परंतु, सर्वाधिक सरासरीने धावा करण्याच्या बाबतीत ख्रिस गेल पाचव्या स्थानी आहे. ख्रिस गेलने या स्पर्धेतील २८ सामन्यात ४० च्या सरासरीने ९२० धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने २ शतक आणि ७ अर्धशतक झळकावले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
हेडन बनला पाकिस्तानचा मुख्य प्रशिक्षक तर, गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून लागली ‘या’ दिग्गजाची वर्णी
भारीच! आयसीसीने ‘त्या’ कुत्र्याला दिला खास ‘डॉग ऑफ द मंथ’ पुरस्कार, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
जो रुट ठरला बुमराह, आफ्रिदीला भारी; जिंकला ऑगस्ट महिन्यातील ‘प्लेअर ऑफ द मंथ’ पुरस्कार