विजय हजारे ट्रॉफीच्या तिसऱ्या उपांत्यपूर्व सामन्यात मुंबईने आज सौराष्ट्र संघाचा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. दिल्लीच्या पालम मैदानावर रंगलेल्या या सामन्यात मुंबईने सौराष्ट्रने दिलेले २८५ धावांचे लक्ष्य अगदी सहज पार केले. मुंबईचा कर्णधार पृथ्वी शाॅची तुफानी खेळी या सामन्याचे वैशिष्ट्य ठरले.
या सामन्यात पृथ्वीने नाबाद १८५ धावांची आक्रमक खेळी उभारताना सौराष्ट्रच्या गोलंदाजांवर चौफेर हल्ला चढवला. त्याच्या या हल्ल्यात सौराष्ट्रच्या गोलंदाजांची पुरती वाताहत झाली. पृथ्वीच्या या खेळीने मुंबईला उपांत्य फेरीचे तिकीट तर मिळालेच, पण पृथ्वी शाॅने एक खास वैयक्तिक विक्रम देखील या खेळीद्वारे आपल्या नावे केला.
धोनी-कोहलीला टाकले मागे
पृथ्वी शाॅने आजच्या सामन्यात उभारलेली १२३ चेंडूतील १८५ धावांची खेळी ही धावांचा पाठलाग करतांना उभारलेली खेळी होती. त्यामुळे एका खास विक्रमाची नोंद त्याच्या नावे झाली. कोणत्याही भारतीय खेळाडूने ‘अ’ दर्जाच्या सामन्यांमध्ये धावांचा पाठलाग करताना उभारलेली ही सर्वोच्च धावसंख्या ठरली. याआधी हा विक्रम भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीच्या नावे होता.
धोनीने २००५ साली श्रीलंकेविरुद्ध धावांचा पाठलाग करताना नाबाद १८३ धावांची खेळी केली होती. या यादीत धोनीनंतर भारताचा विद्यमान कर्णधार विराट कोहलीचा क्रमांक लागतो. कोहलीने २०१२ साली आशिया कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध १८३ धावांची खेळी केली होती. मात्र आता पृथ्वीने आजच्या खेळीने या दोन्ही दिग्गजांना पछाडत या यादीत अव्वल स्थान मिळवले आहे.
धावांचा पाठलाग करताना भारतीय खेळाडूची ‘अ’ दर्जाच्या सामन्यात सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या –
पृथ्वी शाॅ – १८५* (१२३) वि. सौराष्ट्र, आज* एमएस धोनी – १८३* (१४५) वि. श्रीलंका, २००५ विराट कोहली – १८३ (१४८) वि. पाकिस्तान, २०१२ वसिम जाफर – १७८* (१३२) वि. बडोदा, २००८
दरम्यान, पृथ्वीच्या ‘कॅप्टन्स इंनिंग्ज’ने मुंबईने सौराष्ट्रवर ९ गडी राखून सहज विजय मिळवला. पृथ्वीची आक्रमक खेळी आणि त्याला युवा यशस्वी जयस्वालने दिलेली साथ यामुळे ४१.५ षटकातच मुंबईने २८५ धावांचे निर्धारित लक्ष्य गाठले. आणि विजयावर शिक्कामोर्तब करत उपांत्य फेरीचे तिकीट देखील बुक केले. लाजवाब शतक साकारणाऱ्या मुंबईच्या कर्णधार पृथ्वी शाॅलाच सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
महत्वाच्या बातम्या:
पृथ्वी वादळापुढे सौराष्ट्र नेस्तनाबूत! मुंबईचा उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश
चेसमास्टर स्मृती! धावांचा पाठलाग करतांना कुठल्याही क्रिकेटपटूला न जमलेला विक्रम केला आपल्या नावे
अनुभवी शिलेदारांची दमदार कामगिरी! दुसर्या वनडे सामन्यात भारताचा आफ्रिकेवर सफाईदार विजय