मेलबर्न। आज(८ मार्च) जागतिक महिला दिनाच्या दिवशी महिला टी२० विश्वचषकाचा अंतिम सामना भारतीय महिला संघ विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला संघात पार पडला. हा सामना ऑस्ट्रेलियाने ८५ धावांनी जिंकला आणि ५ व्यांदा टी२० विश्वचषकावर नाव कोरले.
ऑस्ट्रेलियाच्या या विजयात सलामीला फलंदाजीला आलेल्या एलिसा हिली आणि बेथ मूनी यांनी अर्धशतकी खेळी करत महत्त्वाचा वाटा उचलला. हिलीने ३९ चेंडूत ७५ धावा केल्या. या खेळीत तिने ७ चौकार आणि ५ षटकार मारले. तर मूनीने ५४ चेंडूत १० चौकारांसह नाबाद ७८ धावांची खेळी केली.
त्यामुळे त्यांनी एक खास विक्रम केला आहे. महिला टी२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात सर्वोच्च धावा करण्याच्या यादीत या दोघीही अव्वल दोन क्रमांकावर आल्या आहेत. या यादीत मूनी ७८ धावांवर अव्वल क्रमांकावर तर हिली ७५ धावांसह दुसऱ्या क्रमांकावर आली आहे.
यापूर्वी महिला टी२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात सर्वोच्च वैयक्तिक धावा करण्याचा विक्रम विंडीजची सलामीवीर फलंदाज हेले मॅथ्यूजच्या नावावर होता. २०१६मध्ये हेलेने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ६६ धावांची अर्धशतकी खेळी केली होती. तर याच सामन्यात वेस्ट इंडिजच्या स्टेफनी टेलरनेच ५९ धावांची अर्धशतकी खेळी केली होती.
महिला टी२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात सर्वोच्च वैयक्तिक धावांची खेळी करणाऱ्या क्रिकेटपटू –
७८ धावा – बेथ मूनी (ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत, २०२०)
७५ धावा – एलिसा हेली (ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत, २०२०)
६६ धावा – हेले मॅथ्यूज (वेस्ट इंडिज विरुद्ध ऑस्ट्रेलिया, २०१६)
५९ धावा – स्टेफनी टेलर (वेस्ट इंडिज विरुद्ध ऑस्ट्रेलिया, २०१६)
महत्त्वाच्या बातम्या-
–भारत दौऱ्यासाठी ‘हा’ खेळाडू दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यात सामील…
–संपुर्ण यादी- या खेळाडू ठरल्या विश्वचषकातील आजपर्यंतच्या सर्वोत्तम खेळाडू…
-१५ विश्वचषकात मिळून कुणालाही जमले नाही ते आज ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूने करुन दाखवले






