भारतीय महिला क्रिकेट संघासाठी स्मृती मंधाना आणि प्रतीका रावल या सलामी जोडीची अद्भुत कामगिरी सुरूच आहे. प्रतिकाने भारतासाठी पदार्पण केल्यापासून सलामीची भागीदारी उत्कृष्ट कामगिरी करत आहे. फक्त सहा डावांमध्ये, प्रतीका आणि मंधाना यांनी मिळून 700 पेक्षा जास्त धावांची सलामी भागीदारी केली आहे. या दरम्यान दोघांनीही चार वेळा शतकी भागीदारी केली आहे. आयर्लंडविरुद्ध सुरू असलेल्या एकदिवसीय मालिकेतील शेवटच्या सामन्यात या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 200 पेक्षा जास्त धावांची भागीदारी केली. यासह, त्यांनी भारतासाठी देशांतर्गत एकदिवसीय सामन्यात सर्वात मोठी भागीदारी करण्याचा विक्रमही केला. घरच्या मैदानावर महिलांच्या एकदिवसीय सामन्यांमध्ये भारतासाठी झालेल्या तीन सर्वोत्तम भागीदारी कोणत्या आहेत हे या बातमीद्वारे जाणून घेऊया.
3. अंजुम चोप्रा आणि अरुंधती किरकिरे
फेब्रुवारी 2004 मध्ये वेस्ट इंडिज महिला क्रिकेट संघाच्या भारत दौऱ्यादरम्यान खेळल्या गेलेल्या शेवटच्या एकदिवसीय सामन्यात अंजुम चोप्रा आणि अरुंधती किरकिरे यांनी शानदार फलंदाजी केली. 54 धावांवर दोन विकेट पडल्यानंतर, या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 178 धावांची भागीदारी केली. किरकिरेने 106 धावांची आणि अंजुमने 90 धावांची शानदार खेळी केली. भारतात खेळल्या जाणाऱ्या महिला एकदिवसीय सामन्यांमध्ये कोणत्याही विकेटसाठी ही भारताची तिसरी सर्वोच्च भागीदारी आहे.
2 हरलीन देओल आणि जेमिमा रॉड्रिग्ज
राजकोटमध्ये आयर्लंडविरुद्ध सुरू असलेल्या एकदिवसीय मालिकेतील दुसऱ्या सामन्यात हरलीन देओल आणि जेमिमा रॉड्रिग्जने चमकदार कामगिरी केली. 156 धावांच्या सलामी भागीदारीनंतर, या जोडीने इतिहास रचत तिसऱ्या विकेटसाठी 183 धावांची भागीदारी केली. त्याच सामन्यात, जेमिमाने तिच्या एकदिवसीय कारकिर्दीतील पहिले शतकही झळकावले आणि ते भारतासाठी संयुक्त तिसरे सर्वात जलद महिला एकदिवसीय शतक देखील होते. 89 धावा करणाऱ्या हरलीनचे शतक मात्र हुकले.
1. स्मृती मंधाना आणि प्रतीका रावल
आयर्लंडविरुद्धच्या मालिकेतील शेवटच्या सामन्यात, मंधाना आणि प्रतीकाने पहिल्या विकेटसाठी 233 धावांची भागीदारी केली. ही भागीदारी भारतीय महिला क्रिकेट संघासाठी भारतात खेळल्या गेलेल्या एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वात मोठी भागीदारी ठरली आहे. देशांतर्गत एकदिवसीय सामन्यात भारतीय महिला संघासाठी कोणत्याही विकेटसाठी 200 किंवा त्याहून अधिक धावांची भागीदारी होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
हेही वाचा-
अश्विनला निवृत्तीनंतरही क्रिकेट खेळायचं आहे, भविष्यातील प्लॅन जाणून घ्या
रेकाॅर्डब्रेक..! भारतीय महिला संघाची ऐतिहासिक कामगिरी, वनडेतील सर्वोच्च धावसंख्या उभारली
“150 किलोपेक्षा जास्त सामानाची गरज…”, भारतीय खेळाडूंवर आकाश चोप्राची बोचरी टीका