हिरो इंडियन सुपर लीग २०२२-२३ (आयएसएल) मधील १७वा आठवडा रोमहर्षक लढतींची मेजवानी देणारा ठरला. पाच सामन्यांत १५ गोल झालेले पाहायला मिळाले. मुंबई सिटी एफसीने त्यांची अपराजित मालिका कायम राखताना ऐतिहासिक कामगिरी केली. प्ले ऑफचे गणित अधिक चुरशीचे होताना दिसले.
मुंबई सिटी एफसी कडून आयएसएलमध्ये दोन विक्रमाची नोंद
मुंबई सिटी एफसी (Mumbai City FC) संघाने १७व्या आठवड्यात विक्रमाची नोंद करूनच प्रवेश केला होता. त्यांनी हिरो आयएसएलच्या एका पर्वात सलग १५ अपराजित निकालाच्या विक्रमाशी बरोबरी केली होती आणि १७व्या आठवड्यात त्यांना नवा विक्रम खुणावत होता. त्यांनी या आठवड्यात जमशेदपूर एफसी (Jamshedpur FC) संघावर २-१ असा विजय मिळवून हिरो आयएसएलमध्ये सर्वाधिक १६ सामन्यांत अपराजित राहण्याचा नवा विक्रम नोंदवला. जमशेदपूरविरुद्धच्या लढतीतील दोन गोलमुळे यंदाच्या पर्वातील त्यांची एकूण गोलसंख्या ही ४७ एवढी झाली आणि एका पर्वातील ही सर्वाधिक गोलसंख्या आहे.
बंगळुरू एफसीने सलग चौथ्या विजयाची नोंद करताना प्ले ऑफच्या शर्यतीत आगेकूच केली, तेच दुसरीकडे ओडिशा एफसीला सातव्या स्थानी ढकलले. बंगळुरूने मागील आठवड्यात चेन्नईयन एफसीवर ३-१ असा विजय मिळवताना सलग चौथ्या विजयाची नोंद केली. बंगळुरूने या सामन्यात पहिल्या हाफमध्ये ३-० अशी मजबूत आघाडी घेतली होती. मॅच विक २ नंतर प्रथमच बंगळुरूने अव्वल सहा संघांमध्ये स्थान पटकावले.
बंगळुरूच्या कामगिरीचा ओडिशा एफसीला फटका बसला अन् त्यांची सातव्या क्रमांकावर घसरण झाली आहे. बंगळुरूने ज्या दिवशी विजय मिळवला त्याच दिवशी काही तासांच्या फरकाने ओडिशा एफसीला एटीके मोहन बागानकडून २-० अशी हार मानावी लागली. एटीकेने ओडिशाविरुद्धची अपराजित मालिका कायम राखताना तिसऱ्या स्थानी कूच केली होती, परंतु केरळा ब्लास्टर्सने रविवारी नॉर्थ ईस्ट युनायटेडवर २-० असा विजय मिळवून पुन्हा तिसरे स्थान पटकावले. एटीके मोहन बागानला चौथ्या स्थानावर सरकावे लागले. केरळा ब्लास्टर्सचा हा यंदाच्या पर्वातील नववा विजय ठरला आणि मागच्या पर्वातील सर्वाधिक विजयाच्या विक्रमाशी त्यांनी बरोबरी केली.
इकर गौरोत्क्सेनाची १२ मिनिटांत हॅट्रिक अन् एफसी गोवाचा आवश्यक विजय
एफसी गोवा (FC Goa) संघाने मागील आठवड्यात ईस्ट बंगाल एफसीवर ४-२ असा विजय मिळवला आणि संघ पाचव्या स्थानावर आला. इकर गौरोत्क्सेनाने या सामन्यात हॅटट्रिक नोंदवली होती. (Historic win for Mumbai City FC in Matchweek 17, Bangalore FC stay in play-off race)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
दिमित्रिऑस डिएमांटाकोस हिरो ठरला, केरळा ब्लास्टर्सने विजयासह तिसरा क्रमांक पुन्हा पटकावला
सेव्हन अ साईड फुटबॉल स्पर्धा: कॉन्स्टलेशन चिताज, मॅट्रिक मार्व्हल्स अंतिम फेरीत