संयुक्त अरब अमिराती येथे होणाऱ्या आशिया चषकासाठीची पात्रता फेरी ओमान येथे खेळली गेली. चार संघांच्या या पात्रता फेरीतून एक संघ मुख्य स्पर्धेत दाखल होणार होता. अखेरच्या सामन्यापर्यंत चुरशीच्या झालेल्या या पात्रता फेरीत हॉंगकॉंगने सातत्यपूर्ण कामगिरी करत मुख्य स्पर्धेत धडक मारली. युएई विरूद्ध आपला तिसरा सामना ८ गड्यांनी खिशात घालत त्यांनी मुख्य स्पर्धेचे तिकीट मिळवले.
Joy for Hong Kong as they book their place at the Asia Cup with an emphatic victory over UAE.
SCORECARD: https://t.co/79Lgww95Sp pic.twitter.com/oZxFjBkAt9
— ICC (@ICC) August 24, 2022
मुख्य स्पर्धेतील एका जागेसाठी ओमान येथे युएई, हॉंगकॉंग, कुवेत व सिंगापूर यांच्या दरम्यान पात्रता फेरी खेळली गेली. अखेरच्या दिवशी दोन सामने झाले. पहिल्या सामन्यात कुवेतने १०४ धावांचे आव्हान केवळ ७.५ षटकात पूर्ण करत गुणतालिकेत पहिले स्थान पटकावले. त्यांचा हा दुसरा विजय होता. त्यानंतर अखेरच्या सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. हॉंगकॉंगला सलग तिसरा विजय मिळवून मुख्य फेरीत जाण्याची सुवर्णसंधी होती. त्यांनी ही संधी साधली.
प्रथम फलंदाजीची संधी मिळालेल्या युएईला आपल्या डावाला आकार देता आलाच नाही. सातत्याने त्यांचे फलंदाज बाद होत राहिले. कर्णधार रिझवानने ४९ धावा करत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, १९.३ षटकात १४७ धावा करून त्यांचा संघ सर्वबाद झाला. अनुभवी एहसान खानने चार तर, युवा आयुष शुक्लाने तीन बळी मिळवले.
युएईकडून मिळालेल्या १४८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हॉंगकॉंगने कोणताही दबाव घेतला नाही. निझाखत खान व यासिम मुर्तजा यांनी ८५ धावांची सलामी देत संघाला विजयाच्या दिशेने नेले. बाबर हयातने नाबाद ३८ धावा करत हॉंगकॉंगचा विजय निश्चित केला. चार बळी येणाऱ्या एहसान खानला सामनावीर म्हणून निवडले गेले.
आता हाँगकाँगचा सामना मुख्य स्पर्धेतील अ गटात भारत व पाकिस्तान यांच्यासोबत होणार आहे. दुसरीकडे ब गटात बांगलादेश, श्रीलंका व अफगाणिस्तान दोन हात करतील. ही स्पर्धा २७ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर या कालावधीत पार पडणार आहे.