भारतात सध्या इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगाम कोरोना व्हायरलच्या पार्श्वभूमीवर खेळवला जात आहे. त्यामुळे सर्व संघ बायो-बबलमध्ये असून सामनेही प्रेक्षकांविना होत आहेत. असे असतानाच काही ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी भारतातील कोरोनाची परिस्थिती पाहून या आयपीएल हंगामातून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. यात राजस्थान रॉयल्सचा भाग असलेल्या अँड्र्यू टायचाही समावेश आहे.
टाय रविवारी (२५ एप्रिल) सकाळी ऑस्ट्रेलियाला रवाना झाला होता. त्याच्या माघार घेण्याचे कारण वैयक्तिक असल्याचे सांगण्यात आले होते. पण आता त्यानेच स्पष्ट केले आहे की भारतातील कोरोनाची परिस्थिती पाहून त्याने हा निर्णय घेतला आहे.
क्रिकेट डॉट कॉम एयू (Cricket.com.au) या वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार टायने म्हटले आहे की ‘एक खेळाडू म्हणून आम्ही आत्ता सुरक्षित आहोत. पण पुढेही हे सुरक्षित राहाणार आहे का? परंतु भारतीय दृष्टीकोनातून पाहता, लोकांना रुग्णालयातही भरती होता येत नसताना या कंपन्या आणि फ्रँचायझी आयपीएलवर इतका पैसा कसा खर्च करतात?’
त्याने पुढे म्हटले की ‘जर खेळामुळे लोकांच्या जीवनातील तणाव दूर होत असेल आणि त्यांना यामुळे जगात सर्वकाही ठिक असल्याची आशा देत असेल आणि अंधाऱ्या बोगद्यातही शेवटी प्रकाश दिसत असेल, तर मला वाटते आयपीएल चालू राहू दे. पण मला माहित आहे की सर्वांच्या भावना सारख्या नाहीत आणि मी प्रत्येकाच्या विचारांचा आणि दृष्टीकोनाचा आदर करतो.’
आयपीएलच्या १४ व्या हंगामातून बाहेर होणारा टाय राजस्थानचा चौथा परदेशी खेळाडू
राजस्थानला यंदा सुरुवातीपासूनच मोठे धक्के बसले आहेत. टाय हा आयपीएल २०२१ मधून बाहेर पडणारा राजस्थान रॉयल्सचा चौथा परदेशी खेळाडू आहे. यापूर्वीच राजस्थान संघाचा भाग असलेले बेन स्टोक्स आणि जोफ्रा आर्चर हे खेळाडू दुखापतीमुळे तर लियाम लिव्हिंगस्टोन बायो बबलमध्ये मानसिक त्रास होत असल्याच्या कारणाने या हंगामातून बाहेर झाले आहेत.
आर्चर दुखापतीमुळे या हंगामासाठी भारतात आलेलाच नाही, तर बेन स्टोक्स या हंगामातील पहिलाच सामना खेळताना दुखापतग्रस्त झाला होता. तसेच काही दिवसांपूर्वी लिव्हिंगस्टोनने बायो-बबलचा त्रास झाल्याने माघार घेतली होती. त्यामुळे आता राजस्थानच्या ताफ्यात जोस बटलर, ख्रिस मॉरिस, डेव्हिड मिलर आणि मुस्तफिजूर रेहमान हे चारच परदेशी खेळाडू उरले आहेत.
कोरोनाची परिस्थितीपासून या खेळाडूंनीही घेतली माघार
अँड्र्यू टाय ऑस्ट्रेलियाला परत गेल्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघातील केन रिचर्डसन आणि ऍडम झम्पा यांनीही भारतातील कोरोना परिस्थिती पाहून मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला. तसेच भारताचा आणि दिल्ली कॅपिटल्सचा फिरकीपटू आर अश्विननेही या आयपीएल हंगामातून विश्रांती घेत असल्याचे सांगितले आहे. त्याने या काळात कुटुंबाला साथ देण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे म्हटले आहे.
अँड्र्यू टायची आयपीएलमधील कामगिरी
अँड्र्यू टायला २०२१ हंगामात एकही सामना खेळण्याची संधी जरी मिळाली नसली तरी त्याची एकूण आयपीएलमधील कामगिरी चांगली आहे. त्याने आत्तापर्यंत आयपीएलमध्ये २७ सामने खेळले असून २१.८० च्या सरासरीने त्याने ४० विकेट्स घेतल्या आहेत. तो २०१८ साली आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज होता. त्याने २०१८ च्या हंगामात पंजाब किंग्सकडून खेळताना १४ सामन्यांत २४ विकेट्स घेतल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या –
अरेरे! सुनील नारायण शुन्यावर बाद तर झालाच पण गौतम गंभीरच्या या नकोशा विक्रमाची बरोबरीही केली






