भारतात कसोटी मॅच सुरु होती. गांगुली सचिन चेंडूचा सामना करत होते. भारतासारख्या स्पिनला हेल्पफुल ठऱणाऱ्या पीचवर फिरकीचा जादुगर शेन वॉर्न बॉलिंग करत होता. गांगुली फुल टिच्चून फलंदाजी करत होता. विकेट सोडा त्याने वॉर्नला लिटरली रडवायचं ठरवलं होतं. परंतू तो वॉर्न होता. त्याने गांगुलीची शिकार करायला एक युक्ती लढवली. गांगुलीला डिवचताना वॉर्न म्हणाला, भावा इथं सगळे तेंडुलकरची फटकेबाजी पाहायला आलेत, तु प्लेड प्लेड खेळून लोकांना बोअर का करतोय? गांगुली लगेच वैतागला व पुढे जाऊन वॉर्नला फटका मारायला गेला अन् स्टंपिंग झाला.शेन वॉर्न हे इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये एक वेगळंच रसायन. ज्याच्या मैदानावर येण्यामुळे भले भले बॅट्समन लोडमध्ये यायचे. तो अशी काही गोलंदाजी करायचा की कुणी विचारही केला नसायचा. असाच कुणी विचार केलेला नसताना या फिरकीच्या जादुगराने थायलंड देशात जगाचा निरोप घेतला तो देखील अतिशय संशयास्पद. आजच्या व्हिडीओत वॉर्नचा मृत्यू नक्की कसा झाला हेच आपण पाहाणार आहोत.
13 सप्टेंबर 1969 याच दिवशी शेन वॉर्न (Shane Warne ) याचा जन्म ऑस्ट्रेलियातील व्हिक्टोरीया राज्यात झाला. सुरुवातीला त्याला ऑस्ट्रेलिया देशातील फूटबॉल लीगमधून खेळायचं होतं आणि एक दिग्गज फूटबॉलपटू बनायचं होतं. सोबतीला त्याला टेनीस खेळण्यातही रुची होती. क्रिकेट त्याचं थेट तिसरं प्रेम होतं. जन्म झाला तेव्हा वॉर्नला एक आजार असल्याचे समजले. त्या आजाराचे नाव हेटरोक्रोमिया. हा आजार झालेल्या व्यक्तीचा एक डोळा हिरवा तर दुसरा निळा दिसतो. तर असा हा मुलगा ऑस्ट्रेलियाकडून अव्वल दर्जाचं फूटबॉल खेळण्याचं स्वप्न पाहात होता. एका क्रिकेट क्बलकडून त्याने अंडर 19 फूटबॉल खेळायला सुरुवातही केली. परंतू त्याच क्लबचं त्याला एक दिवस पत्र आलं की क्लबला यापुढे तुझी गरज नाही. त्यामुळे तुला क्लबकडून खेळता येणार नाही. लहानग्या वॉर्नचं स्वप्न भंगलं होतं. डिप्रेस होऊन घरात बसणं किंवा यातून मार्ग काढणं यातील दुसरा मार्ग त्याने निवडला. त्याला लहानपणापासून माहित होतं की तो फिरकी गोलंदाजी चांगली करु शकतो. अखेर त्याने फिरकीपटू होण्याचा मार्ग निवडला. हाताला रुमाल लावून व मैदानावर नाणे ठेवून वॉर्न तासन् तास सराव करु लागला. याच कठिण काळात त्याला एक गुरु भेटला. त्याच नाव टेरी जेनर. जेनरने अनेक नोकऱ्या बदलल्या होत्या. शिवाय तो एका फ्रॉड केसमध्ये 18 महिने तुरुंगाची हवा खाऊन आला होता. त्याने वॉर्नच्या गोलंदाजीला पैलू पाडण्याचं ठरवलं. हळू हळू वॉर्न यात तयार होत गेला अन् 1991 साली त्याला व्हिक्टोरियाकडून फर्स्ट क्लास क्रिकेट खेळण्याचा कॉल आला. त्याच्याच पुढच्या हंगामात त्याला थेट ऑस्ट्रेलियात संघात घेण्यात आले. भारतीय संघ ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियात गेला होता. मोहम्मद अझरुद्दीन तेव्हा कर्णधार होता. पहिल्या दोन सामन्यात ऑस्ट्रेलियन स्पीनर पीटर टेलरला चांगली कामगिरी करता आली नाही आणि संधी मिळाली ती वॉर्नला. त्याने पहिल्याच सामन्यात भारताचा तेव्हाचा दिग्गज ऑलराऊंडर रवी शास्त्रीची विकेट घेतली परंतू मनासारखी कामगिरी करता आली नाही. त्यानंतर वॉर्नची कामगिरी समाधानकारक नव्हती. अशातच ९२ किलो वजन आणि ६ फुट उंची असलेल्या वॉर्नला वेस्ट इंडिज आणि लंकेविरुद्ध खेळायची संधी मिळाली व वॉर्न युगाची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. वॉर्नची मीडियाने दखल घ्यायला सुरुवात केली. जगभरात त्याच्या नावाचा डंका गाजू लागला. अशातच 1993 साली ऑस्ट्रेलिया संघ ॲशेस सिरीजसाठी इंग्लंडमध्ये दाखल झाला. याच कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात वॉर्नने माईक गेटिंगला असं काही बाद केलं की विचारु नका. त्या चेंडूला पुढे बॉल ऑफ द सेंच्युरी म्हणून ओळखलं गेलं.
2003चा विश्वचषक क्रिकेटप्रेमी कधीही विसरु शकणार नाही असाच. वर्ल्डकपचा माहोल बनविण्यासाठी टेलीव्हिजनवर जबरदस्त जाहीरात बाजी करण्यात आली होती. शीतपेयांच्या जाहीराती जोरदार सुरु होत्या, त्यात वॉर्न, लारा व सचिननेही एक जाहिरात केली होती. शेन वॉर्नही ऑस्ट्रेलिया टीमबरोबर दक्षिण आफ्रिकेत पोहचला होता. दोन तीन सराव सामनेही झाले होते. 11 फेब्रुवारी 2003 रोजी पाकिस्तान व ऑस्ट्रेलिया संघात जोहान्सबर्गला मॅच होणार होती. मॅचच्या काही वेळ आधीच ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने प्रेस कॉन्फरन्स बोलवली व वॉर्न ड्रग्ज टेस्टमध्ये पॉझिटिव्ह असल्याचे सांगितले. तिथूनच वॉर्नला ऑस्ट्रेलियाला परत पाठवण्यात आले. वॉर्नचे स्वप्न पुन्हा एकदा भंगले होते. लोकं नाव ठेवत होती. परंतू गप्प बसेल तो वॉर्न कोणता. त्याने पुन्हा कमबॅक केले. टिकाकारांना चोख प्रत्योत्तर दिले. त्यानंतरच्या कसोटी मालिकांत त्याने लिटरली राडा कामगिरी केली होती. टिकाकारांना जास्त संधी न देता 2007 साली त्याने ॲशेस मालिकेत सिडनी शहरातच क्रिकेटला अलविदाही केलं. 708 कसोटी विकेट, 293 विकेट घेऊनही वॉर्नला कधीच ऑस्ट्रेलियाचं कर्णधार होण्याची संधी मिळाली नाही. अशीच काहीशी गत त्याचा प्रतिस्पर्धी मुथय्या मुरलीधरन व भारताच्या युवराज सिंगचीही. परंतू त्याला ही संधी मिळाली ती भारतात. आयपीएलच्या पहिल्याच पर्वात वॉर्न राजस्थान रॉयल्स संघाचा कर्णधार व कोच राहिला. त्याच्याच नेतृत्त्वाखाली पहिल्याच आयपीएलचे राजस्थान विजेते बनले. 15 वर्षांच्या करियरमध्ये वॉर्नने 1 हजाराहून अधिक विकेट्स घेतल्या. ॲशेस मालिकेत सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज होण्याचा मान मिळवला. क्रिकेटला टाटा बाय बाय केल्यावर एक उत्तम समालोचक, कोच देखील बनला. तरी वॉर्नच्या नाण्याची दुसरी बाजू मात्र वेगळीच होती. तो कायम एक वादग्रस्त व्यक्ती राहिला. अफेअर, ड्रग्ज व मॅच फिक्सिंग अशा गोष्टीत त्याच नाव कायम येत राहिलं. 1995 साली वॉर्नने सिमोन चलहनबरोबर पहिल्यांदा संसार थाटला, वॉर्नच्या अफेअरला वैतागून तीने 2005 साली डिवोर्स घेतला. परंतू ते पुन्हा एकत्र आले. वॉर्नला सिमोनपासून तीन मुले. 2010 साली ते पुन्हा वेगळे झाले. त्यानंतर वॉर्नचे नाव एलिझाबेथ हर्लेबरोबर घेतले जाऊ लागले. एलिजाबेथ वॉर्नपेक्षा 5 वर्षांनी मोठी. ती एक इंग्लिश ॲक्ट्रेस. हे नातंही तीन वर्षांनी तुटलं. परंतू त्या दोघांचे परिवार आजही एकमेकांच्या संपर्कात आहेत. 2000 साली एका ब्रिटीश नर्सने वॉर्नवर हॅरॅशमेंटचे आरोपही केले होते. त्यामुळे वॉर्नला ऑस्ट्रेलियाचे उपकर्णधारपद सोडावे लागले. 2005 साली इंग्लंड दौऱ्यात वॉर्नची दोन दोन अफेअर सुरु असल्याच्या चर्चा होत्या. 2014 साली तो ऑस्ट्रेलियन क्रिकेटर एमिली स्कॉटबरोबरी दिसला होता. त्यानंतर ऑस्ट्रेलियन ग्लॅमर गर्ल एमिली सेअर्सबरोबरही त्याचे नाते राहिले. 2018 मध्ये तो ऑस्ट्रेलियन मॉडेल व ॲक्ट्रेस सोफि मॉंकबरोबर दिसला.
सोशल मीडियाचा अतिशय प्रभावी वापर करण्यासाठी वॉर्नला ओळखले जात होते. तो आपले सडेतोड विचार यातून मांडत असे. तसेच तो जगभरात बिझनेसच्या कारणामुळेही फिरत असे. असाच एकदा थायलंडला आपल्या मित्रांबरोबर आलेला असतानाच त्याने अखेरचा श्वास घेतला. कोसामोई या आयलॅंडवर त्याने एक व्हिला बुक केली होती. दिवस होता ४ मार्च २०२२. याच दिवशी येथील व्हिलामध्ये त्याने अखेरचा श्वास घेतला. थाई पोलीसांनी ही नॅचरल डेथ असल्याचे सांगितले. वॉर्नच्या बेडच्या आसपास सिगरेट, बिअरची बाटली किंवा ड्र्ग्ज असं काहीही सापडलं नाही. सकाळी 5 वाजता जेव्हा त्याचे मित्र येथे आले तेव्हा त्याचं डोकं बेडच्या खाली होतं. रुममधल्या टिव्हीवर पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना सुरु होता. वॉर्न मित्रांना कोणताही रिसपॉन्स देत नव्हता. अखेर त्यांनी थाई पोलीसांना फोन केला. तेव्हा नॅचरल ॲटॅकने त्याची डेथ झाल्याचे समजले. वॉर्न आयुष्याच्या उत्तरार्धात ड्रग्ज घेत नव्हता. तसेच दारु देखील फारच कधीतरी पीत होता. तो स्मोकिंग मात्र रेग्युलर करत असे. अगदी क्रिकेट खेळत होता तेव्हाही तो स्मोक करत असे. त्याने मृत्यूच्या आधी ट्विटरवर एक जुना फोटो पोस्ट केला होता व पुन्हा अशाच एका शेपमध्ये येण्याचे सांगितले होते. त्यासाठी त्याने तयारीही सुरु केली होती. तो लिक्विड डायटवर होता. तो सॉलीड फुड घेत नव्हता. थायलंडला येण्यापुर्वी त्याला चेस्ट पेन होत असल्याने तो डॉक्टरांकडेही जाऊन आला होता. परंतू नक्की थायलंडमध्ये काय घडलं कुणालाच समजलं नाही व फिरकीच्या जादुगराने जगाचा निरोप घेतला. वॉर्नच्या जाण्याने जगभरातील क्रिकेटपटूंसह चाहत्यांनी हळहळ व्यक्त केली. वॉर्न हा कायमच भारतीयांचा लाडका क्रिकेटर राहिला. तो वेगळाच होता व त्याने क्रिकेट खेळाला कायम एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले.
(How did Shane Warne die)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
“आता त्याला विसरा” विश्वविजेत्या खेळाडूने बुमराहच्या कारकिर्दीवरच लावले प्रश्नचिन्ह
“धोनीचे सर्वांवर बारकाईने लक्ष असते”, कार्तिकने ‘त्या’ गोष्टीचा केला गौप्यस्फोट