रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2025 Final) अंतिम फेरीत पोहोचला आहे. हा सामना (3 जून) रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाईल. बंगळुरूचा संघ याआधी तीन वेळा आयपीएलच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे, परंतु आरसीबीचा संघ एकदाही ही ट्रॉफी जिंकू शकलेला नाही.
बंगळुरूचा संघ तीन वेळा आयपीएलच्या अंतिम फेरीत पोहोचलेला आहे. 2009 मध्ये आरसीबी संघ पहिल्यांदा आयपीएलच्या अंतिम फेरीत पोहोचला होता, तेव्हा संघाचा डेक्कन चार्जर्सकडून 6 धावांनी पराभव झाला होता. त्यानंतर 2011 मध्येही बंगळुरूचा संघ अंतिम फेरीत पोहोचला होता, पण यावेळी चेन्नई सुपर किंग्ज जिंकले आणि आरसीबी संघाला 58 धावांनी पराभव स्वीकारावा लागला.
2016 मध्येही रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू अंतिम फेरीत पोहोचला होता. यावेळी आरसीबीचा सामना सनरायझर्स हैदराबादविरुद्ध होता, पण पुन्हा एकदा नशिबाने आरसीबीला साथ दिली नाही आणि बेंगळुरूचा अंतिम सामना 8 विकेट्सने हरला आणि आयपीएल ट्रॉफी जिंकण्यापासून वंचित राहिले.
यावेळी रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली बंगळुरूचा संघ चौथ्यांदा आयपीएलच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. बंगळुरूने क्वालिफायर-1 मध्ये पंजाब किंग्जचा पराभव करून थेट अंतिम फेरीचे तिकीट मिळवले. पण पंजाब किंग्जकडे अजूनही एक संधी शिल्लक आहे आणि हा संघ क्वालिफायर-2 मध्ये पोहोचला आहे. एलिमिनेटर सामन्यात गुजरात टायटन्सचा पराभव करून मुंबई इंडियन्स क्वालिफायर-2 मध्ये पोहोचला आहे. आता, पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्समधील क्वालिफायर-2 जिंकणारा संघ अंतिम फेरीत आरसीबीविरुद्ध खेळेल
आयपीएलच्या 18 व्या हंगामात आरसीबीने एकदाही आयपीएल ट्रॉफी जिंकलेली नाही. पंजाब किंग्जनेही अद्याप एकही आयपीएल स्पर्धा जिंकलेली नाही. त्याच वेळी, मुंबई इंडियन्सने पाच वेळा ट्रॉफी जिंकलेली नाही. यावेळी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आयपीएल ट्रॉफी जिंकेल का हे पाहणे बाकी आहे.






