शिखर धवननं शनिवारी (24 ऑगस्ट) अचानक निवृत्ती जाहीर करून सर्वांना आश्चर्यचकित केलं. ‘गब्बर’ नावानं ओळखल्या जाणऱ्या धवननं आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्यानं पहाटे एक भावनिक व्हिडिओ शेअर करत आपला निर्णय जाहीर केला.
शिखर धवननं भारतासाठी 269 आंतरराष्ट्रीय सामने खेळले. तो मैदानावर त्याच्या बेधडक फलंदाजीसोबतच अनोख्या सेलिब्रेशनसाठी देखील ओळखला जातो. धवन चाहत्यांमध्ये ‘गब्बर’ या नावानं लोकप्रिय आहे. मात्र त्याला हे टोपणनाव कसं पडलं, हे तुम्हाला माहित आहे का? नसेल माहित तर आता जाणून घेऊया.
शिखर धवनची अनेक टोपणनावं आहेत. ‘शिक्की भाई’, ‘जट्ट जी’ या व्यतिरिक्त त्याला ‘मिस्टर आयसीसी’ देखील म्हटलं जातं. मात्र, ‘गब्बर’ हे नाव खास आहे. वास्तविक, धवन ‘स्लेजिंग मास्टर’ मधून ‘गब्बर’ झाला आहे. देशांतर्गत क्रिकेटपासून त्याच्या नावाची रंजक कहाणी सुरू झाली. रणजी संघाचे प्रशिक्षक विजय दहिया यांनी धवनला हे नाव दिलं होतं.
धवन दिल्लीकडून देशांतर्गत क्रिकेट खेळायचा. तो सिली पॉइंटवर क्षेत्ररक्षण करताना भरपूर स्लेजिंग करायचा. आपल्या संघातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी तो अनेकदा विरोधी फलंदाजांना टोमणे मारायचा. त्या काळात तो ‘शोले’ या सुपरहिट चित्रपटातील ‘बहुत याराना लगता है’ हा डायलॉग सारखा मारायचा. फलंदाजांचं लक्ष विचलित करण्यासाठी तो असं म्हणत असे. ‘शोले’ चित्रपटातील हा डायलॉग ‘गब्बर’ नावाच्या खलनायकाची भूमिका साकारणाऱ्या अमजद खानचा आहे. त्यामुळे टीम इंडियात आल्यानंतरही देशांतर्गत क्रिकेटमधील धवनचं ‘गब्बर’ हे नाव कायम राहिलं.
हेही वाचा –
शिखर धवनच्या कारकिर्दीत भर घालणारे हे 5 अभेद्य विक्रम, याबाबतीत सचिन-कोहलीही खूप लांब
शिखर धवन ‘मिस्टर आयसीसी’ म्हणून का प्रसिद्ध, या तीन स्पर्धा देतात प्रत्यक्षात साक्ष!
ब्रेकिंग बातमी! भारतीय संघाच्या ‘गब्बरची’ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती