हैद्राबाद एफसीने हिरो इंडियन सुपर लीग २०२२-२३ (आयएसएल) मध्ये गुरूवारी (29 डिसेंबर) नॉर्थ ईस्ट युनायटेड वर दणदणीत विजय मिळवला. १० सामन्यानंतर पहिला विजय मिळवणारा नॉर्थ ईस्ट युनायटेडचा संघ आज चांगला खेळ करेल असे वाटले होते. पण, त्यांच्या बचावफळीच्या हैद्राबादच्या आक्रमणपटूंनी चिंधड्या उडविल्या. ८व्या मिनिटाला हैद्राबादने पहिला गोल केला अन् त्यानंतर गोलधडाका लावला. झेव्हियर सिव्हेरियोचे दोन गोल, बोर्हा हरेरा, ओडेई ऑनाइंडिया, जोएल चिनेझी यांचे प्रत्येकी एक गोल आणि गौरव बोराच्या स्वयंगोलने हैद्राबादचा ६-१ असा मोठा विजय पक्का केला. नॉर्थ ईस्ट युनायटेडकडून आरोन इव्हान्सने एकमेव गोल केला. या विजयानंतर हैद्राबादने २८ गुणांसह पुन्हा अव्वल स्थान पटकावले. हैद्राबादने २०२२ वर्षाचा विजयाने शेवट केला.
हैद्राबाद एफसीने यंदाच्या पर्वातील पहिल्या टप्प्यात नॉर्थ ईस्टवर ३-० असा विजय मिळवला होता. पण, नॉर्थ ईस्ट युनायटेडचा संघ आव्हान देण्यासाठी सज्ज होता. ७व्या मिनिटाला यजमान हैद्राबादने दमदार आक्रमण केले. आकाश मिश्राच्या पासवर बार्थोलोमेव ऑग्बेचेने केलेला प्रयत्न नॉर्थ ईस्टचा गोलरक्षक मिर्शाद मिचूने रोखला, परंतु हैद्राबादला कॉर्नर मिळाला. त्यावर झेव्हियर सिव्हेरियोने भन्नाट व्हॉलीद्वारे गोल केला. ८व्या मिनिटाला हैद्राबादने आघाडी घेतली. १०व्या मिनिटाला हालिचरण नार्झरीच्या क्रॉसवर बोर्हा हरेराला हेडरद्वारे गोल करून आघाडी दुप्पट करण्याची संधी होती. पण, यावेळी हैद्राबादला गोल करता आला नाही.
हैद्राबादकडून सातत्याने आक्रमण झाले आणि १२व्या मिनिटाला हरेराचा आणखी एक प्रयत्न मिर्शाद मिचूने रोखला. २४व्या मिनिटाला हरेराला अखेर गोल करण्यात यश मिळाले. बॉक्सबाहेरून त्याने मारलेला चेंडू मिर्शादच्या हाताला लागून गोलजाळीत सहज विसावला अन् हैद्राबादने २-० अशी आघाडी घेतली. सहा मिनिटांनी हैद्राबादने आणखी एक गोल केला. ओडेई ऑनाइंडियाने हा गोल केला. ३५व्या मिनिटाला हैद्राबादचा गोलरक्षक गुरमीत सिंगने रोखला. कर्णधार विलमार गिलचा हेडरद्वारे आलेला चेंडू रोखून नॉर्थ ईस्टचा गोल होऊ दिला नाही. पण, ३६व्या मिनिटाला आरोन इव्हान्सने नॉर्थ ईस्टचे खाते उघडले. यजमानांनी पहिल्या ४५ मिनिटांत निर्विवाद वर्चस्व गाजवले.
✨️ The Sensational Six!
A fitting way to cap off an unforgettable year 🔥
On to 2023 now 👊#HFCNEU #WeAreHFC #మనహైదరాబాద్ #HyderabadFC pic.twitter.com/DV84NCRtb4
— Hyderabad FC (@HydFCOfficial) December 29, 2022
मध्यंतरानंतर हैद्राबाद एफसीचे आक्रमण सुरूच राहिले. ५६व्या मिनिटाला सिव्हेरियोचा प्रयत्न थोडक्यात हुकला. ६३व्या मिनिटाला नॉर्थ ईस्टकडून अयशस्वी प्रयत्न झाला. ६४व्या मिनिटाला विलमर गिलचा हेडरद्वारे गोलचा प्रयत्न गोलरक्षक गुरमीत सिंगने रोखला. ७१व्या मिनिटाला हरेराला बॉक्समध्ये नॉर्थ ईस्टच्या खेळाडूकडून पाडले गेले, परंतु रेफरीने फाऊल न दिल्याने हैदराबादचा खेळाडू प्रचंड संतापला. ७३व्या मिनिटाला सिव्हेरियोने गोल करून ही चिडचिड कमी केली अन् हैद्राबादला ४-१ अशी आघाडी मिळवून दिली. हालिचरण नर्झरीच्या क्रॉस पासवर जोएल चिनेझीने ७७व्या मिनिटाला हैद्राबादसाठी आणखी एक गोल केला. बचावफळीच्या चिंधड्या उडत असताना नॉर्थ ईस्टच्या गौरव बोराकडून चूक झाली. चिनेझीचा हेडरद्वारे आलेला गोल गोलरक्षक मिर्शादने रोखला, परंतु चेंडू बोराच्या डोक्याला लागून पुन्हा गोलजाळीत विसावला.
९०+१ मिनिटाला नॉर्थ ईस्टचा गोल अडवण्याच्या प्रयत्नात गुरमीत सिंगचे डोकं पोस्टवर आदळले. ९०+२ मिनिटाला रोमैन फिलिपोर्तुक्सने गोल केला, परंतु रेफरीने ऑफ साईडचा फ्लॅग उंचावला अन् नॉर्थ ईस्टचा दुसरा गोल ग्राह्य धरला गेला नाही. हैद्राबादने ६-१ असा विजय मिळवला.
निकाल : हैद्राबाद एफसी ६ ( झेव्हियर सिव्हेरियो ८ मि. व ७३ मि., बोर्हा हरेरा २४ मि., ओडेई ऑनाइंडिया ३० मि., जोएल चिनेझी ७७ मि., गौरव बोरा ८० मि. ( स्वयंगोल) ) विजयी वि. नॉर्थ ईस्ट युनायटेड १ ( आरोन इव्हान्स ३६ मि. )