युवा भारतीय फलंदाज सूर्यकुमार यादवने देशांतर्गत क्रिकेटमध्ये आणि इंडियन प्रीमियर लीगमध्ये सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. पण असे असतानाही त्याला अजूनही भारतीय संघात स्थान मिळालेले नाही. त्याला नोव्हेंबर २०२० ते जानेवारी २०२१ दरम्यान होणाऱ्या भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी संधी मिळेल, असे अनेकांनी अंदाज बांधले होते. पण ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील कोणत्याच मालिकेसाठी त्याची भारतीय संघात झाली नाही. याबद्दल आता सुर्यकुमारने मौन सोडले आहे.
हिंदूस्थान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत त्याने सांगितले की त्याला यावेळी भारतीय संघात स्थान मिळेल याची अपेक्षा होती. तसेच तो संघात निवड न झाल्याचे पाहून नाराजही झाला होता.
सुर्यकुमार म्हणाला की ‘खरंतर, यावेळी मला अपेक्षा होती की माझी भारतीय संघात निवड होईल. पण माझे नाव नसल्याचे पाहून मी थोडा निराश झालो. मी त्यादिवशी सरावही करु शकलो नाही. माझे मन त्या निर्णयापासून हटवणे कठीण होते. अगदी रोहित शर्मानेही मला विचारले होते की मी नाराज आहे का आणि मी त्याला हो, असे सांगितले होते. पण त्याने फरक पडत नाही.’
तो पुढे म्हणाला, ‘मी माझ्या संधीची वाट पाहिल. माझ्याकडे माझ्यातील क्रिकेटचे कौशल्य दाखवण्यासाठी आणि भारतीय संघातील निवडीसाठी प्रबळ दावेदारी सिद्ध करण्यासाठी खूप वेळ आहे. मला आशा आहे की मी देशांतर्गत क्रिकेटमध्ये भरपूर धावा करेल आणि पुढील आयपीएलमध्येही चांगली कामगिरी करुन निवड समीतीचे लक्ष वेधेल.
सचिन तेंडुलकरने पाठवला खास संदेश
याबरोबरच त्याला विचारण्यात आले की तूझी निवड भारतीय संघात व्हायला हवी होती, असे जेव्हा लोकं म्हणतात, तेव्हा तू काय विचार करतो? या प्रश्नावर सुर्यकुमार म्हणाला, ‘निवड करणे माझ्या हातात नव्हते. त्यामुळे मी फार जास्त विचार करत नाही. अगदी सचिन तेंडुलकर यांनीही मला एक संदेश पाठवला होता की धावा करत राहा आणि मलाही माझ्या मिळणाऱ्या संधींचा उपयोग करायचा आहे आणि चांगली कामगिरी बजावायची आहे. मी टी२० विश्वचषकासाठी संघात स्थान मिळवण्याच्या दृष्टीने माझे सर्वोत्तम देत राहिल.’
सुर्यकुमारची कारकिर्द –
सुर्यकुमारने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ७७ सामन्यात ४४च्या सरासरीने ५३२६ धावा केल्या आहेत. अ दर्जाच्या ९३ सामन्यात त्याने ३५.४६च्या सरासरीने २४४७ धावा केल्या आहेत तर ट्वेंटी ट्वेंटी प्रकारात त्याने १६५ सामन्यात ३२.३३ च्या सरासरीने ३४९२ धावा केल्या आहेत. तर आयपीएलमध्ये १०१ सामने खेळलेल्या सुर्यकुमारने ३०.२० च्या सरासरीने २०२४ धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
सामना संपल्यावर विराट थेट सुर्यकुमारकडे गेला अन् म्हणाला…
-मुंबईच्या लढवय्या खेळाडूची ११ वर्षांची प्रतिक्षा काही संपेना, पुन्हा नाकारली टीम इंडियात जागा
-…म्हणून सूर्यकुमारची ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी झाली नाही निवड, भारतीय संघाच्या प्रशिक्षकाचा खुलासा