मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहनं एक धक्कादायक खुलासा केला आहे. आयपीएलमध्ये येण्यापूर्वी बुमराहला कॅनडाला जायचं होतं. मात्र मुंबई इंडियन्समध्ये सामील झाल्यानंतर परिस्थिती बदलली. बुमराहनं सांगितलं की, त्यानं कॅनडामध्ये खेळण्याचा विचार केला होता.
जसप्रीत बुमराहनं त्याच्या आयपीएल करिअरची सुरुवात मुंबई इंडियन्सकडून खेळत केली. तेव्हापासून त्यानं मागे वळून पाहिलेलं नाही. मुंबईसाठी चमकदार कामगिरी करत त्यानं भारतीय संघातही स्थान मिळवलं. आज तो संघाचा नंबर वन वेगवान गोलंदाज आहे. आता जसप्रीत बुमराहनं खुलासा केला आहे की, तो त्याच्या सुरुवातीच्या काळात कॅनडाला जाण्याचा विचार करत होता. जिओ सिनेमावर पत्नीशी झालेल्या संवादादरम्यान त्यानं हे सांगितलं.
“आमच्या कुटुंबात पूर्वी असंच होत असे. प्रत्येक मुलाला उच्च स्तरावर क्रिकेट खेळायचं असतं. भारतातील प्रत्येक गल्लीत तुम्हाला 25 खेळाडू सापडतील जे भारताकडून खेळण्यासाठी इच्छूक असतात. म्हणूनच तुमच्याकडे बॅकअप योजना असावी. आमचे नातेवाईक कॅनडामध्ये राहतात. माझे काका तिथेच राहत असल्यानं मी माझा अभ्यास तिथेच करेन असं मला वाटलं. सुरुवातीला आम्हाला वाटलं की आमचे संपूर्ण कुटुंब तिथे जाईल, पण माझी आई तयार नव्हती. कारण तिथली संस्कृती वेगळी आहे”, असं बुमराहनं सांगितलं.
जसप्रीत बुमराह पुढे बोलताना म्हणाला की, “सध्या मी खूप आनंदी आहे. मी नशीबवान आहे की इथे माझ्यासाठी चांगल्या गोष्टी झाल्या. आता मी भारतीय संघ आणि मुंबई इंडियन्सकडून खेळत आहे. अन्यथा मला माहीत नाही, कदाचित मी कॅनडाच्या संघाकडून खेळण्याचा प्रयत्न केला असता.”
जसप्रीत बुमराहनं 2016 मध्ये भारतीय संघात पदार्पण केलं. तेव्हापासून खेळलेल्या 89 एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याच्या नावे 149 बळी आहेत. याशिवाय त्यानं 62 टी 20 सामन्यांमध्ये 74 आणि 36 कसोटी सामन्यांमध्ये 159 विकेट घेतल्या आहेत. आयपीएलमध्ये बुमराहनं 125 सामन्यांमध्ये 155 विकेट घेतल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
आरसीबीविरुद्ध 5 विकेट घेणारा पहिला गोलंदाज, जसप्रीत बुमराहनं मोडला 9 वर्ष जुना विक्रम
नाव मोठं, लक्षण खोटं! ‘बिग शो’ मॅक्सवेलचा आयपीएलमधील फ्लॉप शो जारीच