आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा नवा हंगाम नुकताच सुरू झाला आहे. इंग्लंड आणि भारत यांच्यातील कसोटी मालिकेला सुरुवात झाल्यानंतर, वेस्ट इंडीज आणि पाकिस्तान यांच्यातही दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. इंग्लंड आणि भारत यांच्यातील दुसऱ्या सामन्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) कसोटी खेळाडूंची नवी वैयक्तिक क्रमवारी जाहीर केली आहे.
रूट आणि बाबरला झाला फायदा
आयसीसीने जाहीर केलेल्या नव्या कसोटी क्रमवारीत दोन कर्णधारांना फायदा झाला. लॉर्ड्स कसोटीत इंग्लंडला पराभव पत्करावा लागला असला तरी इंग्लंडचा कर्णधार जो रूटला फलंदाजी क्रमवारीत दोन स्थानांचा फायदा होऊन तो दुसऱ्या स्थानावर आला आहे. त्याने ऑस्ट्रेलियाच्या स्टीव स्मिथ व मार्नस लॅब्युशेन यांना मागे टाकत दुसरा क्रमांक पटकावला.
वेस्ट इंडीजविरूद्ध पाकिस्तानला रंगतदार सामन्यात पराभव पत्करावा असला तरी, पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याला दोन स्थानाचा फायदा होऊन तो आठव्या स्थानी आला. भारताचे विराट कोहली, रोहित शर्मा व रिषभ पंत अनुक्रमे पाचव्या, सहाव्या आणि सातव्या क्रमांकावर काबीज आहेत. दुसऱ्या डावात अर्धशतक झळकवणारा अजिंक्य रहाणे एका स्थानाच्या नुकसानीसह १५ व्या क्रमांकावर घसरला. तर, शतकवीर केएल राहुल ३७ व्या स्थानी आला आहे.
गोलंदाजी क्रमवारीत अँडरसनची मजल
लॉर्ड्स कसोटीच्या पहिल्या डावात पाच बळी मिळवणारा इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन एका स्थानाच्या फायद्यासह सहाव्या क्रमांकावर आला. वेस्ट इंडिजचा जेसन होल्डर दोन स्थानांच्या प्रगतीसह पहिल्या दहामध्ये सामील झाला. जसप्रीत बुमराह याला एका स्थानाचे नुकसान झाल्याने तो दहाव्या क्रमांकावर घसरला. अनुभवी इशांत शर्मा सोळाव्या तर, लॉर्ड्स कसोटीत ८ बळी मिळवणारा मोहम्मद सिराज आतापर्यंतच्या सर्वात्तम ३८ व्या स्थानावर आला. भारताचा अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विन हा दुसऱ्या स्थानी कायम आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
लॉर्ड्सवरील दारुण पराभवानंतर स्टोक्स तिसऱ्या कसोटीत खेळणार? इंग्लंडच्या हेड कोचने दिले उत्तर
राहुल नव्हे तर सिराज होता ‘सामनावीर’ पुरस्काराचा खरा मानकरी; माजी क्रिकेटरने मांडले मत
काही लोक तुम्हाला ते भारतीय क्रिकेटपटू असल्याचे सांगतील, त्यांना विना ओळखपत्र आत सोडू नका