जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा 2023 चा अंतिम सामना अवघ्या काही तासांवर आला आहे. या सामन्यात भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघ एकमेकांसमोर असणार आहेत. या अति महत्त्वाच्या सामन्याच्या अगदी काही तासांपूर्वीच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसीने एक मोठा खुलासा केला आहे. या सामन्यासाठी एक नव्हे तर दोन खेळपट्ट्या तयार करण्यात आल्याचे सांगण्यात येतेय.
सध्या इंग्लंडमध्ये ‘जस्ट स्टॉप ऑइल’ मोहिम सुरू आहे. सरकारने तेल, गॅस, कोळसा कंपन्यांना दिलेले परवाने बंद करावेत, अशी मागणी आंदोलक करतायेत. या आंदोलकांनी काही दिवसांपूर्वी इंग्लंड क्रिकेट संघाची बस देखील अडवली होती. या सर्व पार्श्वभूमीवर या आंदोलकांनी मैदानात येत काही अनपेक्षित कृत्य केल्यास त्याचा परिणाम सामन्यावर नको म्हणून दोन खेळपट्ट्या तयार करण्यात आल्याचे सांगण्यात येते. 1975 ऍशेस मालिकेतील अखेरच्या सामन्याच्या शेवटच्या दिवशी अशाच प्रकारच्या आंदोलनात आंदोलकांनी, रात्रीच्या वेळी खेळपट्टीवर तेल टाकल्याने सामना रद्द करावा लागला होता.
तरच दुसऱ्या खेळपट्टीवर होणार सामना
आयसीसीच्या नियम 6.4 या खेळपट्टी बदलाच्या नियमानुसार, सामन्यासाठीची मुख्य खेळपट्टी अशा काही बाह्य कारणांमुळे खराब झाल्यास ती बदलण्यात येते. मात्र, यासाठी दोन्ही कर्णधारांची अनुमती आवश्यक असेल. सध्या मैदानाभोवती सुरक्षा मोठी असल्याने अशा प्रकारची घटना होण्याची शक्यता कमी आहे. तरीदेखील सतर्कतेचा भाग म्हणून आयसीसीने हा निर्णय घेतला आहे.
लंडन येथील केनिंग्टन ओव्हल मैदानावर हा सामना रंगेल. 7 ते 11 जून दरम्यान होणाऱ्या या सामन्यात पावसाचा मोठा काळ व्यत्यय राहिल्यास राखीव दिवशी देखील खेळ होईल. हा सामना जिंकून प्रथमच जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा जिंकण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न असेल.
(ICC Prepares Two Pitches At The Oval For WTC Final As Precautionary Measure Over Oil Protest)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
महाराष्ट्र इंटरनॅशनल चेस फेस्टीव्हलमध्ये चॅलेंज लढतीत विदित गुजराथी, रौनक साधवानी यांना विजेतेपद
WTC FINAL: यंदाही पाऊस ठरणार विलन? असे असणार लंडनमधील वातावरण, टीम इंडियासाठी…