यंदाच्या आयसीसी टी20 विश्वचषकातील (ICC T20 World Cup) सेमीफायनल सामन्यांचा थरार गुरुवारी (27 जून) रोजी रंगणार आहे. त्यामध्ये सेमीफायनल 1 मध्ये अफगाणिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका आमने-सामने असणार आहेत. तर सेमीफायनल 2 मध्ये भारत इंग्लंडशी भिडणार आहे. भारतीय संघाची धुरा रोहित शर्माच्या (Rohit Sharma) हाती आहे. तर इंग्लंड जोस बटलरच्या (Jos Buttler) नेतृत्वाखाली मैदानात उतरणार आहे. तत्पूर्वी या सामन्यात कोणत्या संघाचं पारडं जड असणार आहे. हे आपण या बातमीद्वारे जाणून घेऊया.
टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड 23 वेळा भिडले आहेत. त्यामध्ये भारताचं वर्चस्व राहिलं आहे. भारतानं 12 सामन्यांमध्ये बाजी मारली आहे. तर इंग्लंडनं 11 सामने जिंकले आहेत. परंतू आयसीसी टी20 विश्वचषकाच्या (ICC T20 World Cup) इतिहासात भारत आणि इंग्लंड 4 वेळा आमने-सामने आले आहेत. त्यामध्ये दोन्ही संघांनी 2-2 सामने जिंकले आहेत. त्यामुळे टी20 विश्वचषकात दोन्ही संघांची कामगिरी समान आहे.
या विश्वचषक स्पर्धेत भारताची कामगिरी इंग्लंडपेक्षा दमदार राहिली आहे. भारतानं यंदाच्या टी20 विश्वचषकात 7 सामन्यांपैकी 6 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर 1 सामना पावसामुळे अनिर्णित राहिला आहे. भारताची फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीमध्ये यावेळी धार दिसून आली आहे. त्यामुळे इंग्लंडविरुद्धच्या लढतीत भारत बाजी मारणार का? हे पाहणंदेखील महत्त्वाचं ठरेल.
इंग्लंडबद्दल बोलायचं झालं तर इंग्लंडनं या टी20 विश्वचषकात 7 सामन्यांपैकी 4 सामने जिंकले आहेत. तर 2 सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झाला आणि 1 सामना पावसामुळे अनिर्णित राहिला आहे. साखळी सामन्यात ऑस्ट्रेलियानं इंग्लंडला 36 धावांनी धूळ चारली होती. परंतू भारतानं सुपर 8 सामन्यात 24 धावांनी ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवला.
दोन्ही संघांच्या हेड टू हेड रेकाॅर्डमध्ये टी20 विश्वचषकात भारत आणि इंग्लंडची कामगिरी समान राहिली आहे. तर टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारत इंग्लंडपेक्षा 1 सामना जास्त जिंकलं आहे. त्यामुळे सेमीफायनल 2 मध्ये दोन्ही संघांमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
मागील आकडेवारी दक्षिण आफ्रिकेच्या बाजूनं; पण प्रत्यक्षात अफगाणिस्तानचं पारडं जड
“यावेळी भारत हरणार नाही…” इंग्लंडच्या माजी कर्णधारानं केलं वक्तव्य!
हिटमॅननं रचला इतिहास, याबाबतीत धोनीला मागे टाकत ठरला पहिला भारतीय कर्णधार






