महिला क्रिकेट विश्वचषक २०२२ साठी (Women’s World Cup 2022) भारतीय महिला क्रिकेट संघ सज्ज झाला आहे. भारतीय संघाला या स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात पाकिस्तानचा सामना करावा लागणार आहे. न्यूझीलंडमध्ये ४ मार्च ते ३ एप्रिल दरम्यान महिला क्रिकेट विश्वचषक खेळवला जाणार आहे. मिताली राजच्या (Mithali Raj) नेतृत्वाखाली भारतीय संघ पुन्हा एकदा हे विजेतेपद पटकावण्याचा प्रयत्न करणार आहे. या स्पर्धेत स्म्रीती मंधाना (Smriti Mandhana) सुद्धा खेळताना दिसणार आहे.
आयसीसी महिला विश्वचषक स्पर्धेचा हा हंगाम २०१७ च्या धरतीवरच खेळवला जाणार आहे. स्पर्धेत सहभागी होणारे सर्व ८ संघ सर्व संघांसोबत प्रत्येकी एक सामना खेळणार आहेत. यामधील अव्वल चार संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील. विजेत्या दोन संघांमध्ये ट्रॉफी मिळविण्यासाठी अंतिम सामना खेळवला जाणार आहे.
भारतीय महिला संघाचा पहिला सामना रविवारी ६ मार्च रोजी पाकिस्तानशी होणार आहे. यानंतर १० मार्चला भारतीय संघ यजमान न्यूझीलंडविरुद्ध खेळणार आहे. भरताचा सामना १२ मार्चला वेस्ट इंडिजशी होणार आहे. भारताचा चौथा सामना १६ मार्च रोजी इंग्लंड संघासोबत होणार आहे. १९ मार्चला भारतीय संघ ऑकलंडमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार आहे. भारत २२ मार्चला बांगलादेशविरुद्ध खेळणार आहे. भारताचा शेवटचा सामना २७ मार्च रोजी दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. हे सर्व सामने भारतीय प्रमाणवेळेनुसार, ६:३० वाजता पाहायला मिळणार आहेत.
न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज यांच्यातील ४ मार्च रोजी होणाऱ्या सामन्याने या स्पर्धेची सुरुवात होणार आहे. मंगळवारी विश्वचषकाचे वेळापत्रक आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने जाहीर केले. ३१ दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत एकूण ३१ सामने खेळवले जाणार असून त्यामध्ये आठ संघ सहभागी होणार आहेत.
पहिला उपांत्य सामना वेलिंग्टन येथे ३० मार्च रोजी होणार आहे. दुसरा उपांत्य सामना ३१ मार्चला, तर अंतिम सामना ३ एप्रिलला होणार आहे. ख्राईस्टचर्चच्या मैदानावर आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक २०२२ चा दुसरा उपांत्य आणि अंतिम सामना खेळवला जाईल. गुणतालिकेतील अव्वल चार संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील. जिथे पहिल्या क्रमांकाच्या संघाला तिसऱ्या क्रमांकाच्या संघाशी आणि दुसऱ्या क्रमांकाच्या संघाला चौथ्या क्रमांकाच्या संघाचा सामना करावा लागेल.
महत्त्वाच्या बातम्या-