नवीन वर्ष सुरू होऊन आता एक महिना उलटला आहे. यावर्षी क्रिकेट प्रेमींसाठी अक्षरश: स्पर्धांचा पाऊसच पडणार आहे. वर्षाची सुरुवात श्रीलंका आणि त्यानंतर न्यूझीलंडविरुद्ध झाली. आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेलाही सुरुवात होणार आहे. याव्यतिरिक्त येत्या 10 फेब्रुवारीपासून आयसीसी महिला टी20 विश्वचषक 2023 स्पर्धेलाही केपटाऊन येथे सुरुवात होणार आहे. ही स्पर्धा 10 ते 26 फेब्रुवारीदरम्यान पार पडणार असून यात 10 संघ विजेतेपद मिळवण्यासाठी आपापसात भिडतील. हा महिला टी20 विश्वचषक स्पर्धेचा आठवा हंगाम आहे. या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान संघ आमने-सामने येणार आहेत.
नुकत्याच पार पडलेल्या 19 वर्षांखालील महिला टी20 विश्वचषक 2023 (U19 Womens T20 World Cup) स्पर्धेचे विजेतेपद भारतीय महिला संघाने पटकावले आहे. या विजयासोबत भारतीय संघाचा आत्मविश्वास वाढला आहे. आता आयसीसी महिला टी20 विश्वचषक 2023 (ICC Womens T20 World Cup 2023) स्पर्धेत भारतीय महिला संघ विजय मिळवण्याच्या इराद्याने उतरतील. विश्वचषकात भारतीय संघाचे नेतृत्व हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) हिच्याकडे आहे. तिच्या नेतृत्वाखाली दीप्ती शर्मा, रेणुका सिंग, राधा यादव, शेफाली वर्मा आणि स्म्रीती मंधाना यांसारख्या दिग्गज महिला खेळाडू पहिल्यांदा विजेतेपद पटकावण्याचा प्रयत्न करतील.
भारत आणि पाकिस्तान आमने-सामने
आयसीसी महिला टी20 विश्वचषक स्पर्धेला 10 फेब्रुवारीपासून दक्षिण आफ्रिका विरुद्ध श्रीलंका संघातील सामन्याने सुरुवात होत आहे. मात्र, भारतीय महिला संघ विश्वचषकातील अभियानाची सुरुवात 12 फेब्रुवारीपासून करेल. भारताचा पहिला सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध होईल. आयसीसी महिला टी20 विश्वचषक 2023 स्पर्धेची लाईव्ह स्ट्रीमिंग हॉटस्टार ऍपवर होईल. यासोबतच याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर होईल.
स्पर्धेविषयी थोडक्यात
आयसीसी महिला टी20 विश्वचषक स्पर्धेचा पहिला हंगाम 2009मध्ये इंग्लंड येथे खेळला गेला होता. पहिल्या तीन स्पर्धांमध्ये 8 संघ सहभागी झाले होते. त्यानंतर 2014व्या हंगामात ही संख्या वाढून 10 करण्यात आली. आयसीसीने जुलै 2022मध्ये घोषणा केली होती की, 2024 स्पर्धेचे आयोजन बांगलादेश आणि 2026 स्पर्धेचे आयोजन इंग्लंड करेल. 2026पासून स्पर्धेत भाग घेणाऱ्या संघांची संख्या वाढून 12 केली जाईल.
या स्पर्धेचा किताब सर्वाधिक वेळा नावावर करण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या नावावर आहे. त्यांनी 5 वेळा हा किताब पटकावला आहे. तसेच, इंग्लंड आणि वेस्ट इंडिजने प्रत्येकी 1 वेळा हा किताब पटकावला आहे. भारतीय महिला संघ मागील 2020च्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झाला होता.
आयसीसी महिला टी20 विश्वचषक 2023साठी भारतीय संघ
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्म्रीती मंधाना, शफाली वर्मा, यास्तिका भाटिया, ऋचा घोष, जेमिमा रॉड्रिग्ज, हरलीन देओल, दीप्ती शर्मा, देविका वैद्य, राधा यादव, रेणुका ठाकूर, अंजली सरवानी, पूजा वस्त्राकार, राजेश्वरी गायकवाड, शिखा पांडे. (icc womens t20 world cup 2023 india vs pakistan live streaming know here)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
गजबच! फलंदाजाला चकवत स्टंपला लागला चेंडू, तरीही पठ्ठ्या नॉटआऊट; बीबीएलमध्ये चाललंय तरी काय?
‘त्या’ चार चेंडूंनी बदलले पानटपरीवाल्याच्या मुलाचे नशीब, विश्वचषक तर जिंकून दिलाच; शिवाय अशाप्रकारे केली देशाची सेवा






