१९७३ साली इंग्लंड देशात पहिला वाहिला विश्वचषक खेळवला गेला. वाचून आश्चर्य वाटेल पण पुरूष विश्वचषकाच्या २ वर्षाआधी पहिला महिला विश्वचषक खेळला गेला. यजमान इंग्लंडचा महिला संघ यात विजयी झाला.
येत्या २४ तारखेपासून ११वा महिला विश्वचषक चालू होत आहे. या आधीच्या १० स्पर्धेमध्ये ऑस्ट्रेलिया संघ हा सर्वात यशस्वी झालेला असून ६ वेळा तो संघ विजयी ठरला आहे. इंग्लंड ३ वेळा तर न्यूझिलँड एकदा विश्वचषक जिंकले आहेत.
मागचा विश्वचषक, २०१३ मध्ये भारतात पार पडला होता. यात ब्रेबॉर्न स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडीसवर ११४ धावांनी सहज विजय मिळवित ६व्यांदा चषकावर नाव कोरले.
या वेळी ८ संघ या स्पर्धेत खेळतील. ऑस्ट्रेलिया, न्यूझिलँड, इंग्लंड व वेस्ट इंडीस हे संघ आपल्या क्रमवारीवर थेट स्पर्धेत दाखल झाले. तर श्रीलंकेत झालेल्या पात्रता परीक्षेत भारत, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका व पाकिस्तान या संघानी स्पर्धेत प्रवेश मिळवला. स्पर्धेत ८ही संघ एकमेकांविरुद्ध एक एक सामना खेळतील. २८ सामन्यानंतर पहिले ४ संघ उत्पांत्य फेरीत दाखल होतील व विजयी संघात २३ जुलैला लॉर्ड्सवर अंतिम सामना खेळला जाईल.
मेग लेनिंगच्या नेतृत्वाखाली खेळणारा ऑस्ट्रेलियन संघ विश्वचषकाचा प्रमुख दावेदार आहे. ऑस्ट्रेलियाच्या विश्वचषक विजयी २०१३ च्या संघातील ७ खेळाडू या संघात आहेत म्हणजेच विजय कसा मिळवावा हे या संघाला शिकवायची गरज नाही. एलिस पेरी नुकतीच दुखापतीतून सावरलेली असून ऑस्ट्रेलिया संघासाठी एक मोठा आधारस्तंभ आहे. युवा आणि अनुभवी अशा खेळाडूंचा भरणा असलेला ऑस्ट्रेलियन संघ नक्कीच लक्ष ठेवण्यासारखा आहे.
यजमान इंग्लंडची कर्णधार हिदर नाइट व सारा टेलर ह्या दोघी आपला अनुभव पणाला लावतील. परिस्थितीला अनुकूल असा वेगवान गोलंदाजांचा भरणा इंग्लंडकडे आहे. ब्रंट आणि श्रबसोल ह्या नवीन चेंडू व मार्श – हॅज़ल फिरकी गोलंदाजी सांभळतील. आपला ४था विश्वचषक जिंकण्यास त्या आतुर असतील.
२०-२०विश्वचषकाचे विजेते वेस्ट इंडीस एक दिवसीय सामन्याचा विश्वचषक जिंकू शकले नाहीत. मागच्या वेळी अंतिम फेरी गाठून पराभव स्वीकारा लागला होता. या वेळी मात्र अनेक आक्रमक फलंदाज त्यांच्याकडे आहेत. स्टेफनी टेलरच्या नेतृत्वाखाली एक युवा संघ खेळेल. १६ वर्षीय क्वियाना जोसेफ त्यांच्या संघात आहे.
न्युझीलँडकडे मात्र खूप चांगल्या खेळांडूचा भरणा आहे. ऑस्ट्रेलियन बिग बॅशमध्ये शतक काढणारी सोफी डेवाइन, लागोपाठ ४ शतके काढणारी एमी सॅटारथवेट, कर्णधार सूज़ी बेट्स , १६ वर्षीय लेगस्पिनर अमीलियाकेर्र आणि इतर खेळाडू नक्कीच आपली छाप सोडण्यास उत्सुक असतील.
एक दिवसीय सामन्यात सर्वाधिक धावांचा विक्रम करणाऱ्यासाठी भारतीय कर्णधार मिताली राज केवळ २०९ धावांची गरज आहे. शार्लट एड्वर्ड्सच्या नावावर हा विक्रम आहे. या विश्वचषकात तो विक्रम मोडण्याची मितालीला चांगली संधी आहे. भारतीय फलंदाजी दीप्ती वर्मा, राज, हर्मन्प्रीत व कृष्णामूर्तीवर निर्भर असेल तर गोलंदाजीची धुरा झुलन,राजश्री,मानसी जोशी आणि एकता बिस्त असेल.
दक्षिण आफ्रिकाची कर्णधार निकर्क दुखापतीतून सावरली आहे. त्यांच्याकडे चांगली गोलंदाजी आहे. अयाबॉंगा खाका, माझारिना काप, शब्नीम इस्लाम ह्या वेगवान गोलंदाज व सेन लुउस ही फिरकी गोलंदाज. फलंदाजीत लिझेल्ल ली, मिग्नन दु प्रीझ आणि वूलवर्ट ही भक्कम साखळी आहे.
पाकिस्तानने आपल्या संघात बरेच बदल घडवून आणले आहेत. अनेक युवा खेळाडू त्यांच्याकडे आहेत. साना मीर ही १२ वर्ष अनुभव असलेली कर्णधार त्यांच्या संघात आहे. तीने एक दिवसीय सामन्यात १००० धावा व १०० बळी घेतले आहेत. बिस्माह मारूफ. सिद्रा नवाझ, जवेरिया खान यांकडून पाकिस्तानला अपेक्षा असतील.
श्रीलंकन संघ सध्या ८व्या क्रमांकावर आहे त्यामुळे त्यांच्याकडून फार कमी अपेक्षा आहे. त्यांची सध्याची कामगिरी सुद्धा लक्षणीय नाही. मागच्या विश्वचषकातील ९ खेळाडू या संघात आहेत. याचा फायदा त्यांना होऊ शकतो.
पुढच्या ३० दिवसात ११वा महिला क्रिकेट विश्वचषक कोण जिंकेल याचा निर्णय होईल. स्पर्धा नक्कीच उत्कंठावर्धक असेल कारण सर्व संघ चांगल्या खेळाडूनिशी आणि तयारीनिशी उतरत आहेत. इंग्लंडमध्ये होणारा हा ३रा विश्वचषक कोण जिंकेल याच भाकीत वर्तवणे तसं कठीणचं!
– ओमकार मानकामे