आयसीसीने शनिवारी (१२ डिसेंबर) दक्षिण आफ्रिकामध्ये होणाऱ्या महिला टी२० विश्वचषक २०२३ साठीची पात्रता पद्धती आणि वेळापत्रक जाहीर केले आहे. २०२३ सालच्या महिला विश्वचषकात एकूण १० संघ सहभागी होतील. यजमान दक्षिण आफ्रिका संघासमवेत ८ देशांना थेट पात्रता मिळेल. तर भूतान, फ्रान्स आणि ब्राजीलसहित ३७ संघांना पात्रता फेरी पार करावी लागणार आहे.
२०२१मध्ये होणार होता विश्वचषक
सुरुवातीला २०२१ मध्ये महिला विश्वचषकाचे आयोजन करण्यात येणार होते. मात्र २०२१ मध्ये पुरुषांचा विश्वचषक आणि २०२२ मध्ये कॉमनवेल्थ गेम्ससह ३ मोठ्या क्रिडा स्पर्धा होणार आहेत. त्यामुळे महिला विश्वचषकाला २०२३ पर्यंत स्थगित करण्यात आले होते. आता ९ फेब्रुवारी ते २६ फेब्रुवारी २०२३ पर्यंत हा विश्वचषक होईल.
दक्षिण आफ्रिकाव्यतिरिक्त टॉप-७ संघ थेट ठरतील पात्र
दक्षिण आफ्रिका संघाकडे महिला विश्वचषक २०२३चे यजमानपद असल्यामुळे हा संघ थेट पात्र ठरेल. तर महिला विश्वचषक २०२०मध्ये सहभागी झालेल्या संघांना या विश्वचषकात पात्र ठरण्यासाठी मागील महिला विश्वचषकापासून ते ३० नोव्हेंबर २०२१ पर्यंत टॉप-७ मध्ये रहावे लागणार आहे. तर उर्वरित २ संघांना पात्रता फेरीद्वारे सहभागी करण्यात येईल.
हे संघ पहिल्यांदाच खेळतील पात्रता फेरी सामना
महिला विश्वचषक २०२३ साठीच्या २ स्थानांसाठी होणारी पात्रता फेरी ऑगस्ट २०२१ पासून सुरु होईल. या फेरीमध्ये ३७ संघ सहभागी होतील. त्यातील ८ संघ पहिल्यांदाच पात्रता फेरीचा भाग असतील. हे संघ म्हणजे भूतान, बोत्सवाना, कॅमरुन, फ्रान्स, मलावी, म्यानमार, फिलिपीन्स आणि तुर्की होय.
अर्जेंटिना आणि ब्राझील संघ करतील पुनरागमन
अर्जेंटिना आणि ब्राझील या महिला संघांनी २०१२ साली शेवटचे चषक खेळले होते. त्यामुळे आता महिला विश्वचषक २०१३द्वारे या दोन संघांचे विश्वचषकात पुनरागमन होईल.
पात्रता फेरीत ७ महिन्यांमध्ये होतील ११५ सामने
आयसीसी महिला क्रिकेट व्यवस्थापक हॉली कोल्विन यांनी सांगितले की, “आयसीसी महिला टी२० विश्वचषक २०२३ द्वारे महिला क्रिकेटचे पुनरागमन होत असल्याचा आम्हाला आनंद आहे. हा महिला क्रिकेटजगतासाठी आनंदाचा क्षण आहे. महिला टी२० विश्वचषक २०२०ने महिला क्रिकेटला नवी ओळख मिळवून दिली आहे. त्यामुळे पात्रता फेरीद्वारे क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याचा हा योग्य मार्ग आहे. पात्रता फेरीत ७ महिन्यांमध्ये एकूण ११५ टी२० सामने खेळले जातील.”
महत्त्वाच्या बातम्या-
“केएल राहुलची फलंदाजी पाहण्यासाठी मी पैसे खर्च करण्यासही तयार”, विंडीजच्या दिग्गजाने केली स्तुती
“…म्हणून भारताने ऍडलेडमध्ये प्रकाशझोतातील सामना खेळू नये”, आकाश चोप्राने सांगितले कारण
भारताविरुद्ध कुठल्याही स्थानावर फलंदाजी करण्यास तयार; ऑस्ट्रेलियाच्या प्रमुख फलंदाजाची प्रतिक्रिया