आयसीसी वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेतील 25वा सामना इंग्लंड विरुद्ध श्रीलंका संघात गुरुवारी (दि. 26 ऑक्टोबर) खेळला जाणार आहे. बंगळुरू येथील एम चिन्नास्वामी स्टेडिअमवर रंगणारा हा सामना दोन्ही संघांसाठी खूपच महत्त्वाचा आहे. या सामन्यावर दोन्ही संघांचं पुढील गणित अवलंबून आहे. चला तर, या सामन्याविषयी सर्व माहिती जाणून घेऊयात…
स्पर्धेत कसं आहे प्रदर्शन?
वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेतील इंग्लंड आणि श्रीलंका संघाचे प्रदर्शन पाहिलं, तर त्यांनी आतापर्यंत 4 सामने खेळले आहेत. त्यात त्यांना फक्त 1 विजय, तर 3 पराभव पत्करावे लागले आहेत. मात्र, या सामन्यात इंग्लंडवर जास्त दबाव असेल. कारण, गतविजेत्या इंग्लंडने आपल्या मागील दोन्ही सामन्यात अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभव पत्करला आहे. तसेच, श्रीलंका संघाने मागील सामना जिंकून स्पर्धेत पुनरागमन केले आहे.
विश्वचषकातील दोन्ही संघांची आमने-सामने कामगिरी पाहिली, तर दोघांमध्ये आतापर्यंत 11 सामने खेळले गेले आहेत. यामध्ये इंग्लंडने 6 आणि श्रीलंकेने 5 विजय मिळवले आहेत. मागील 4 विश्वचषकात श्रीलंकेने इंग्लंडविरुद्ध विजय मिळवले आहेत. तसेच, इंग्लंडला 24 वर्षांपासून श्रीलंकेविरुद्ध विश्वचषकातील विजयाची प्रतीक्षा आहे.
संघातील दुखापती
इंग्लंड संघातील वेगवान गोलंदाज रीस टोप्ली दुखापतीमुळे बाहेर पडला आहे. तसेच, श्रीलंकेचा युवा वेगवान गोलंदाज मथीशा पथिराना हादेखील दुखापतीमुळे बाहेर पडला आहे. अशात त्याच्या जागी अनुभवी अँजेलो मॅथ्यूज याला ताफ्यात सामील केले गेले आहे.
खेळपट्टी
बंगळुरू येथील खेळपट्टी फलंदाजांसाठी फायदेशीर असते. तसेच, मैदान लहान असल्यामुळे इथे जास्त धावसंख्येचे सामनेही पाहायला मिळतात. विश्वचषकात या मैदानावर पार पडलेल्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान संघाने मिळून 650हून अधिक धावा केल्या होत्या.
सामन्याचे प्रक्षेपण
भारतीय प्रमाणवेळेनुसार हा सामना दुपारी 2 वाजता सुरू होईल. नाणेफेकीची वेळ 1.30 वाजता आहे. हा सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्सवर पाहता येईल. तसेच, सामन्याची लाईव्ह स्ट्रीमिंग डिझ्नी प्लस हॉटस्टार ऍपवर पाहता येईल. (icc world cup 2023 eng vs sl 25th match preview predicted eleven weather and live stream read)
संभावित प्लेइंग इलेव्हन
इंग्लंड
जोस बटलर (कर्णधार/यष्टीरक्षक), जॉनी बेअरस्टो, डेविड मलान, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स, सॅम करन, डेविड विली, आदिल रशीद, मार्क वूड, गस एटकिन्सन
श्रीलंका
कुसल मेंडिस (कर्णधार), पथुम निसांका, कुसल परेरा, सदीरा समरविक्रमा, चरिथ असलंका, धनंजय डी सिल्वा, अँजेलो मॅथ्यूज, दुनिथ वेललागे, महीश तीक्षणा, लाहिरू कुमारा, दिलशान मधुशंका
हेही वाचा-
वर्ल्डकप इतिहासातील वेगवान शतक ठोकल्यानंतर मॅक्सवेलचे चकित करणारे विधान; म्हणाला, ‘मी तर असं…’
ऑस्ट्रेलियाच्या विक्रमी विजयानंतर कमिन्सचे मोठे विधान; म्हणाला, ‘आम्ही आमची क्षमता…’