विश्वचषक 2023 स्पर्धेतील आपल्या पहिल्या सामन्यात भारताने 5 वेळच्या चॅम्पियन ऑस्ट्रेलिया संघाला पराभूत केले होते. त्यानंतर आता भारतीय संघ या कुंभमेळ्यातील आपल्या दुसऱ्या सामन्यासाठीही सज्ज आहे. भारतीय संघ सोमवारी (दि. 09 ऑक्टोबर) दिल्ली येथे पोहोचला आहे. येथील अरुण जेटली स्टेडिअमवर भारताला बुधवारी (दि. 11 ऑक्टोबर) अफगाणिस्तानचा सामना करायचा आहे. या सामन्यापूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टी जाणुून घेऊयात…
भारत-अफगाणिस्तान आमने-सामने
भारत विरुद्ध अफगाणिस्तान (India vs Afghanistan) संघ आतापर्यंत फक्त 3 वनडे सामन्यात आमने-सामने आले आहेत. यादरम्यान भारतीय संघाने दोन वेळा त्यांना पराभवाचं पाणी पाजलं होतं. आता पुन्हा एकदा हा संघ एकमेकांविरुद्ध उतरणार आहेत.
भारत विरुद्ध अफगाणिस्तान संघातील पहिला सामना मार्च 2014मध्ये खेळला गेला होता. मीरपूर येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारताने 8 विकेट्सने विजय साकारला होता. त्यानंतर दुसरा सामना सप्टेंबर 2018मध्ये खेळला गेला होता. मात्र, हा सामना बरोबरीत सुटलेला. पुढे उभय संघातील अखेरचा वनडे सामना जून 2019मध्ये खेळला गेला. हा सामना भारताने 11 धावांनी आपल्या नावावर केला होता. भारताने प्रथम फलंदाजी करताना 224 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना अफगाणिस्तान संघ 213 धावांवर सर्वबाद झाला होता.
विश्वचषकातील कामगिरी
दुसरीकडे, विश्वचषकातील उभय संघाची कामगिरी पाहायची झाली, तर भारताने पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा सामना केला होता. हा सामना भारताने 6 विकेट्सने जिंकला. विशेष म्हणजे, भारताचा स्टार सलामीवीर शुबमन गिल आजारी असल्याने त्याला या सामन्यात खेळता आले नव्हते. तसेच, तो अफगाणिस्तानविरुद्धही खेळताना दिसणार नाहीये. अशात इशान किशनला संधी मिळण्याची शकय्ता आहे. दुसरीकडे, अफगाणिस्तानने आपला पहिला सामना बांगलादेशविरुद्ध झाला होता. हा सामना बांगलादेशने 6 विकेट्सने जिंकला होता.
खेळपट्टी आणि हवामान
दिल्लीचे अरुण जेटली स्टेडिअम फलंदाजीसाठी अनुकूल खेळपट्टी, लहान सीमारेषा आणि फलंदाजांसाठी वेगवान आऊटफील्डसाठी प्रसिद्ध आहे. सुरुवातीला वेगवान गोलंदाजांना मदत मिळू शकते. तसेच, मधल्या षटकात फिरकीपटू वर्चस्व गाजवू शकतात. विश्वचषकातील मागील सामन्यात या मैदानावर दोन डावातील मिळून 700हून अधिक धावांचा पाऊस पडला होता. दक्षिण आफ्रिकेने 428 धावा केल्या होत्या, तर श्रीलंकेने 326 धावा केल्या होत्या. अशात या सामन्यातही मोठी धावसंख्या उभारली जाण्याची आशा आहे. दवांमुळे कर्णधार नाणेफेक जिंकत गोलंदाजी करण्याच्या निर्णयाला पसंती दर्शवतात.
हवामानाविषयी बोलायचं झालं, तर वेदरकॉमच्या रिपोर्टनुसार दिल्लीत बुधवारी कमाल तापमान 35 अंश सेल्सियस आणि किमान तापमान 22 अंश सेल्सियस असेल. संपूर्ण सामन्यादरम्यान पावसाची कोणतीही शक्यता नाहीये. मात्र, आकाशात ढग दाटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
विश्वचषकासाठी उभय संघ
भारत
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, सूर्यकुमार यादव, शार्दुल ठाकूर
अफगाणिस्तान
हशमतुल्लाह शाहिदी (कर्णधार), रहमानुल्लाह गुरबाज (यष्टीरक्षक), इब्राहिम जादरान, रियाझ हसन, रहमत शाह, नजीबुल्ला जादरान, मोहम्मद नबी, इकराम अलीखिल, अजमतुल्ला उमरझाई, राशिद खान, मुजीब उर रहमान, नूर अहमद, नवीन-उल-हक, फजलहक फारुकी (icc world cup 2023 ind vs afg team india is ready to face the challenge of afghanistan know details)
हेही वाचा-
CWC 2023: पाकिस्तान-श्रीलंकेत हैद्राबादमध्ये रंगणार ‘एशियन वॉर’, दोन्ही संघ विजयासाठी आतुर
CWC 2023: इंग्लंड पहिल्या विजयासाठी उत्सुक, बांगलादेशची उलटफेराची तयारी