जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा २०२१-२३ मध्ये भारतीय खेळाडूंची उत्कृष्ट कामगिरी कायम आहे. भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या चालू हंगामात सर्वात जास्त विकेट्स घेणारा गोलंदाज बनला आहे. तसेच रिषभ पंतने कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना मागे टाकले आहे. पंत आता पहिल्या पाच फलंदाजांमध्ये सहभागी झाला आहे.
जसप्रीत बुमराह बनला सर्वात सरस गोलंदाज
भारत आणि श्रीलंका यांच्यात बेंगलोरच्या एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे. सामन्याच्या पहिल्या डावात जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याने श्रीलंकेच्या पाच विकेट्स घेतल्या. तसेच दुसऱ्या डावातील श्रीलंकेची पहिली विकेटही बुमराहनेच घेतली. आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या चालू हंगामात बुमराहने खेळलेल्या ९ सामन्यांमध्ये ३८ विकेट्स घेतल्या आहेत आणि तो या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे.
यादरम्यान बुमराहने तीन वेळा एका डावात ५ विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे. एकदा त्याने अवघ्या २४ धावा खर्च करून ५ विकेट्स घेतल्या, जी त्याची सर्वोत्तम कामगिरी ठरली. पहिल्या पाच गोलंदाजांमध्ये भारताचा मोहम्मद शमीही सहभागी आहे, ज्याने ३० विकेट्स घेतल्या आहेत. इंग्लंडचा ओली रॉबिंसन ३२, पाकिस्तानचा शाहीन अफ्रिदी ३१ आणि दक्षिण अफ्रिकाचा कागिसो रबाडा ३० विकेट्सहा पहिल्या पाच गोलंदाजांमध्ये सहभागी आहेत.
हेही वाचा- रिषभ पंत ‘गुरू’ धोनीच्या वाटेवर! विशेष सल्ला देत अश्विनला मिळवून दिली विकेट, पाहा व्हिडिओ
पहिल्या पाच फलंदाजांमध्ये रिषभ पंतचा सहभाग
श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या डावात भारताचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत (Rishabh Pant) याने अवघ्या २८ चेंडूत स्वतःचे अर्धशतक पूर्ण केले. पंत भारतासाठी सर्वात वेगवान कसोटी अर्धशतक करणारा खेळाडू ठरला आहे. कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत सर्वोत्तम प्रदर्शन करणाऱ्या पाहिल्या पाच फलंदाजांमध्येही पंत सहभागी झाला आहे, तर दिग्गज रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) या यादीतून बाहेर पडले आहेत.
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या चालू हंगामात रिषभ पंतने आतापर्यंत ५१७ धावा केल्या आहेत आणि तो या यादीत चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. भारताचा सलामीवीर केएल राहुलने या हंगामात ५४१ धावा केल्या आहेत आणि या यादीत आधीपासूनच दुसऱ्या क्रमांकावर कायम आहे. इंग्लंडचा जो रुट १००८ धावांसह यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. पाकिस्तानविरुद्ध कराचीमध्ये शतक करणारा ऑस्ट्रेलियाचा उस्मान ख्वाजा ५१२ धावांसह पहिल्या पाच फलंदाजांमध्ये सहभागी आहे.