टी२० क्रिकेटच्या अतिरेकामुळे कसोटी क्रिकेटची लोकप्रियता खालावल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) २०१९ मध्ये जागतिक कसोटी चॅम्पियनशिप सुरू करण्याचा निर्णय घेतला. जूलै २०१९ पासून सुरू झालेल्या या चॅम्पियनशिपचा समारोप २३ जून २०२१ रोजी साऊथम्पटन येथील रोज बाऊल मैदानावर झाला. भारत आणि न्यूझीलंड या स्पर्धेतील दोन सर्वोत्तम संघांमध्ये रंगलेला स्पर्धेचा अंतिम सामना न्यूझीलंडने आपल्या नावे करत ‘पहिला कसोटी विश्वविजेता’ होण्याचा मान मिळवला. या ऐतिहासिक सामन्यातील महत्त्वपूर्ण क्षणांचा आढावा आपण या लेखाच्या माध्यमातून घेऊया.
बदलावे लागले आयोजन स्थळ
जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना पूर्व नियोजनानुसार क्रिकेटची पंढरी म्हटल्या जाणाऱ्या लॉर्ड्स मैदानावर होणार होता. मात्र, कोरोना व्हायरसच्या कारणाने आयसीसीने हा सामना साऊथम्पटन येथील रोज बाऊल मैदानावर खेळण्याचे ठरविले. जेणेकरून मैदानाला लागून असलेल्या हिल्टन हॉटेलमूळे खेळाडूंना बायो-बबल तोडता येऊ नये.
पावसाने केला खेळ
कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात महत्त्वपूर्ण असलेला हा सामना १८ जून ते २२ जून या कालावधीत खेळण्याचे ठरवले गेले. इंग्लंडमधील वातावरणाचे रूप पाहता २३ जून हा राखीव दिवस देखील ठेवण्यात आला. १८ जून रोजी दोन्ही संघ व क्रिकेट चाहते या सामन्यासाठी सज्ज झाले. मात्र, पूर्व अंदाजानुसार सामन्याच्या पाचही दिवस पाऊस पडणार असा अंदाज वेधशाळेने वर्तविला होता. नेमके झालेही तसेच, पहिल्या दिवशी सकाळी साऊथम्पटन येथे मुसळधार पाऊस झाल्याने मैदान खेळण्या लायक बनू शकले नाही व नाणेफेक देखील न होता सामन्याचा पहिला दिवस रद्द करण्यात आला.
दुसऱ्या दिवशी झाला खेळ सुरू
पहिला दिवस पाण्यात गेल्याने दुसऱ्या दिवशी देखील खेळ सुरू होईल की नाही याबाबत साशंकता होती. परंतु, वरुण राजाची कृपा झाली व मैदान खेळण्यालायक बनले. न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सनने महत्त्वपूर्ण नाणेफेक जिंकत भारतीय संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले.
न्यूझीलंडने आपल्या संघात एकाही तज्ञ फिरकीपटूला स्थान दिले नाही. चार दर्जेदार वेगवान गोलंदाज व त्यांच्या जोडीला कॉलिन डी ग्रॅंडहोम या मध्यमगती वेगवान गोलंदाजी करणाऱ्या अष्टपैलूला संधी देण्यात आली. दुसरीकडे, भारतीय संघाने सामन्याच्या दोन दिवसापूर्वीच आपला अंतिम अकरा खेळाडूंचा संघ जाहीर केला होता. यामध्ये तीन वेगवान गोलंदाज व दोन फिरकीपटूंना स्थान देण्यात आले.
सलामीवीरांच्या सुरुवातीनंतर विराटची उत्कृष्ट खेळी
इंग्लंडच्या धर्तीवर प्रथमच सलामीला उतरलेल्या अनुभवी रोहित शर्मा व युवा शुबमन गिल यांनी भारताला ६२ धावांची सलामी दिली. न्यूझीलंड संघातील सर्वात तरुण खेळाडू असलेल्या वेगवान गोलंदाज कायले जेमिसनने जम बसलेल्या रोहित शर्माला वैयक्तिक ३४ धावांवर तिसऱ्या स्लीपमध्ये उभ्या असलेल्या टिम साऊदीच्या हाती झेल देण्यास भाग पाडले. संघाच्या धावसंख्येत आणखी एका धावांची भर घालून गिलदेखील तंबूत परतला.
भारताचा ‘टेस्ट स्पेशालिस्ट’ फलंदाज म्हणून ओळखला जाणारा चेतेश्वर पुजारा याने खाते उघडण्यासाठी तब्बल ३५ चेंडू घेतले. मात्र, तो संघाच्या खात्यात केवळ ८ धावा घालून माघारी गेला. भारताला आता सर्वाधिक अपेक्षा कर्णधार विराट कोहली व उपकर्णधार अजिंक्य रहाणे यांच्याकडून होत्या. दोघांनीही भारतीय संघाचा डाव ३ बाद ८८ धावांपासून पुढे नेण्यास सुरुवात केली. भारतीय संघ सुस्थितीत येत असताना अंधुक प्रकाशामुळे ६४.४ षटकांच्या खेळानंतर दिवसाचा खेळ थांबवण्यात आला. यावेळी भारतीय संघाची धावसंख्या ३ बाद १४६ अशी होती. विराट ४४ तर, रहाणे २६ धावांवर नाबाद होते.
जेमिसनने लावला भारताच्या डावाला जॅम
न्यूझीलंड संघ सामन्याच्या तिसऱ्या दिवशी वेगळ्याच आत्मविश्वासाने मैदानात उतरला. आयपीएलमध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वात खेळणाऱ्या कायले जेमिसनने त्याला कालच्याच ४४ धावांवर पायचीत पकडत न्यूझीलंडला दिवसातील पहिले यश मिळवून दिले. दोन महिन्यांपूर्वी आयपीएलदरम्यान विराटला नेट्समध्ये गोलंदाजी न करण्याचा जेमिसनचा निर्णय सार्थकी लागला होता.
भारतीय संघ व्यवस्थापन व चाहते ज्या रिषभ पंतच्या कामगिरीकडे नजरा लावून बसले होते, त्यांचा साफ हिरमोड झाला. जेमिसनने त्याला स्लीपमध्ये उभ्या असलेल्या टॉम लॅथमच्या हाती अवघ्या चार धावांवर झेल देण्यास भाग पाडले.
भारतीय संघाच्या सर्व अपेक्षा आता उपकर्णधार अजिंक्य रहाणेवर होत्या. तो ‘थेंबे थेंबे तळे साचे’ अशाप्रकारे एक-एक धाव काढत संघाचा डाव पुढे नेत होता. मात्र, नवीन चेंडू घेण्यास दिड षटके शिल्लक असताना तो नील वॅग्नरच्या ‘बाउन्सर ट्रॅप’ मध्ये अडकला. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमधील पहिला अर्धशतकवीर होण्याची त्याचे संधी अवघ्या एका धावेने हुकली. रविचंद्रन अश्विनने झटपट २२ धावांची खेळी केली. लंचसाठी खेळ थांबला त्यावेळी भारताची अवस्था ७ बाद २११ अशी होती. लंचनंतर अष्टपैलू रवींद्र जडेजा काहीतरी कमाल करेल असे सर्वांना वाटलेले. मात्र, जेमिसनने लागोपाठच्या चेंडूवर इशांत शर्मा व जसप्रीत बुमराह यांना बाद करत या ऐतिहासिक सामन्यातील पहिले बळींचे पंचक पूर्ण केले. ट्रेंट बोल्टने रवींद्र जडेजाला बाद करत लंचनंतर अवघ्या १९ चेंडूमध्ये ६ धावांची भर घातल्यानंतर भारताचा डाव २१७ धावांवर संपुष्टात आणला.
न्यूझीलंडची सावध मात्र आश्वासक सुरुवात
भारतीय संघाला या महत्त्वपूर्ण सामन्यात पहिल्या डावामध्ये अवघ्या २१७ धावांवर रोखल्यामुळे न्यूझीलंडचा आत्मविश्वास वाढला होता. त्याच आत्मविश्वासाने त्यांचे सलामीवीर टॉम लॅथम व डेवॉन कॉनवे मैदानावर आले. सर्वांची नजर खासकरून कॉनवेवर होती. आपल्या कारकीर्दीतील केवळ तिसरा कसोटी सामना खेळत असला तरी, त्याने अनेक विक्रमांना गवसणी घातली असल्याने, तो भारताविरूद्ध कसा खेळतोय व तो या अंतिम सामन्याचा दबाव झेलणार का? हे पाहण्यास सर्व उत्सुक होते.
लॅथम-कॉनवे जोडीने चहापानापर्यंत २१ षटके खेळून काढताना केवळ ३६ धावा बनविल्या. दोघांनी संघाला ७० धावांची सलामी दिली. भारतीय संघाचा सर्वात अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने लॅथमला कारकिर्दीत तिसर्यांदा बाद करत भारताला पहिले यश मिळवून दिले. दुसरीकडे, कॉनवेने अर्धशतक पूर्ण करत आपल्याकडून असलेल्या अपेक्षांची पहिली पायरी पार केली. परंतु, यानंतर तो फार काळ टिकला नाही व वैयक्तिक ५४ धावांवर ईशांत शर्माच्या गोलंदाजीवर मोहम्मद शमीकडे झेल देऊन परतला. कॉनवे बाद झाल्यानंतर आणखी दोन चेंडू खेळून काढल्यावर पंचांनी अंधुक प्रकाशामुळे दिवसाचा दिवसाचा खेळ थांबवत असल्याचे घोषित केले.
चौथा दिवस ही गेला पाण्यात
सामना नक्की कोणाच्या दिशेने झुकला आहे, हे तर्कवितर्क लावले जात असतानाच, चौथ्या दिवशी पुन्हा एकदा पावसाने आपला खेळ दाखवला. सामना आता सुरू होईल, नंतरच सुरू होईल असे अंदाज लावले जात असतानाच, आयोजकांनी पावसामुळे खेळ होणार नसल्याचे जाहीर केले. आयोजकांनी मैदानातील स्क्रीनवर तिकिटांचे पैसे परत करणार असल्याचे आश्वासन दिले.
पाचव्या दिवशी आली सामन्यात रंगत
निर्धारित पाचव्या दिवशी साऊथम्पटनमधील वातावरण क्रिकेटसाठी पोषक होते. पूर्ण नसला तरी सूर्य दर्शन देत होता. याच स्थितीत सामना सुरू झाला. पहिल्या एक तासात न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन व अनुभवी रॉस टेलर यांनी भारतीय गोलंदाजांना यश मिळवून दिले नाही. मात्र, ड्रिंक्सनंतर सामना सुरू होताच पहिल्या चेंडूवर शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरमध्ये शमीच्या गोलंदाजीवर शुबमन गिलने एक ‘फ्लाईंग कॅच’ टिपला.
इथूनच भारतीय संघाने सामन्यात पुनरागमन करायला सुरुवात केली. हेन्री निकोल्स (७) व आपला अखेरचा कसोटी सामना खेळत असलेला बीजे वॉटलींग (१) हे माघारी परतले. लंचसाठी खेळ थांबला तेव्हा न्यूझीलंडची स्थिती ५ बाद १३५ अशी होती. न्यूझीलंड या संपूर्ण सत्रामध्ये केवळ ३४ धावा बनविल्या होत्या. एका बाजूने सर्व प्रमुख फलंदाज बाद होत असताना कर्णधार केन विलियम्सन अत्यंत शांतचित्ताने खेळत होता.
न्यूझीलंडचे शेपूट वळवळले
लंचनंतर खेळ सुरू होताच ग्रॅंडहोम पायचीत होऊन माघारी परतला. आपले फलंदाज असे एकापाठोपाठ एक माघारी चालले असले तरी, विलियम्सनवर याचा काहीही परिणाम होत नव्हता. तो भक्कम बचाव करत खराब चेंडूंवर एकेरी दुहेरी धावा काढत होता. प्रमुख फलंदाज अपयशी ठरले असताना, नेहमीच न्यूझीलंडच्या डावात योगदान देणाऱ्या ‘टेलएंडर्स’ नी पुन्हा एकदा जबाबदारी घेतली. गोलंदाजीत सर्वोत्तम ठरलेल्या कायले जेमिसनने फलंदाजीत कमाल दाखवताना १६ चेंडूत २१ धावांचा तडाखा दिला. तो परतताच अनुभवी टिम साऊदी मैदानात उतरला व कर्णधाराला साथ देऊ लागला.
यादरम्यान न्यूझीलंडने भारताची धावसंख्या ओलांडत आघाडी घेण्यास सुरुवात केली. आघाडी चार धावांची झाली असतानाच, विलियम्सन ईशांत शर्माच्या गोलंदाजीवर कर्णधार विराट कोहलीच्या हाती झेल देत बाद झाला. तोदेखील भारतीय उपकर्णधार अजिंक्य रहाणेप्रमाणे अर्धशतक झळकावण्यात केवळ एका धावेने अपयशी ठरला. त्याने या ४९ धावांच्या खेळीसाठी तब्बल १७७ चेंडू खेळून काढले. टिम साऊदीने अखेरचा गडी म्हणून बाद होण्यापूर्वी ३० धावांचे अतिमहत्त्वाचे योगदान दिले. न्यूझीलंडचा संघ २४९ धावांवर सर्वबाद झाला. ३२ धावांची छोटी मात्र निर्णायक ठरणारी आघाडी त्यांना मिळाली होती. भारताकडून मोहम्मद शमीने ४ बळी घेऊन आघाडीवर राहत किल्ला लढविला. ईशांत शर्मा तीन तर, अश्विनला दोन बळी घेण्यात यश आले.
पाचव्या दिवशी अखेरच्या सत्रात साऊदीची कमाल
पाचव्या दिवशीच्या अखेरच्या सत्रात भारतीय संघ कशी फलंदाजी करतो याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते. पावसाची व अंधुक प्रकाशाची काहीही चिन्हे नसताना, भारतीय फलंदाज चांगल्या धावा काढतील अशी सर्वांना अपेक्षा होती. मात्र, न्यूझीलंडचा सर्वात अनुभवी गोलंदाज असलेल्या टिम साऊदीच्या मनात काहीतरी वेगळेच होते.
अकराव्या षटकात त्याने गिलला ८ धावांवर पायचीत केले. त्यानंतर, रोहित शर्मा व चेतेश्वर पुजारा निग्रहाने फलंदाजी करताना दिसले. चेंडू रोहितच्या बॅटवर चांगला लागत असल्याने तो मोठी खेळी करेल असे सर्वांना वाटले. मात्र, केन विलियम्सनने पुन्हा एकदा चेंडू साऊदीकडे सोपविला. भारताच्या डावातील २७ वे षटक रोहितसमोर टाकताना साऊदीने षटकातील पहिले चार चेंडू आउट स्विंग टाकले आणि पाचवा चेंडू इन स्विंग करत रोहितला ३० धावांवर तंबूत धाडले. रोहित सलग दुसऱ्या डावात चांगल्या सुरुवातीनंतर मोठी खेळी करू शकला नाही. उर्वरित दिवस कर्णधार विराट कोहली व चेतेश्वर पुजारा यांनी खेळून काढला व भारताला ६४ धावांपर्यंत पोहोचवले. भारताची आघाडी पाचव्या दिवशीअखेर ३२ धावांची होती.
सहावा निर्णायक दिवस
सामन्यातील दोन दिवस पावसामुळे वाया गेल्याने सामना राखीव दिवशी म्हणजेच सहाव्या दिवशी खेळवला जात होता. सूर्य या सहा दिवसात पहिल्यांदाच पूर्णपणे बाहेर डोकावत होता. पावसाची तीळमात्र शक्यता नव्हती. आधुनिक क्रिकेटमध्ये प्रथमच कसोटी सहाव्या दिवशी खेळली जात होती.
🔹 Kyle Jamieson’s five-for
🔹 Mohammad Shami leads India fightback
🔹 @BLACKCAPS quicks ignite
🔹 Williamson and Taylor finish the jobRelive the #WTC21 Final 🎥 pic.twitter.com/UDVSQDj695
— ICC (@ICC) June 23, 2021
पुन्हा एकदा चमकला जेमिसन
पाचव्या दिवशी नाबाद असलेल्या विराट कोहली व चेतेश्वर पुजाराने या ऐतिहासिक दिवशी खेळण्यास सुरुवात केली. संघाच्या धावसंख्येत ७ धावांचे भर पडलेली असताना दिवसातील सहाव्या षटकात जेमिसनने विराटला अक्षरशः स्वतःचा बळी देण्यास भाग पाडले. आधी इन स्विंग चेंडू टाकून विराटला हैराण केल्यानंतर एक अप्रतिम आउट स्विंग चेंडूडू विराटच्या बॅटची कड घेऊन वॉटलींगच्या हाती विसावला. त्याच्या पुढच्या षटकात जेमिसनने पुजारालाही अशाच प्रकारे स्लिपमध्ये बाद केले.
कसोटीमधील भारताचे दोन प्रमुख स्तंभ पडल्यानंतर सर्व आशाआकांक्षा पहिल्या डावात सर्वाधिक धावा करणारे अजिंक्य रहाणे व रिषभ पंतवर होत्या. पंतला ५ धावांवर एक जीवदान देखील मिळाले. दोघांनी पाचव्या गड्यासाठी ४२ धावा जोडल्यानंतर रहाणे वैयक्तिक १५ धावांवर अत्यंत साधारण फलंदाजाप्रमाणे ट्रेंट बोल्टच्या गोलंदाजीवर माघारी परतला. या निर्णायक दिवसाच्या लंचपर्यंत भारतीय संघाने ५ बाद १३० अशी मजल मारली होती.
विलियम्सनचे अफलातून नेतृत्व आणि गोलंदाजांची साथ
भारतीय संघाची स्थिती पाहता या सामन्यात भारत पछाडला गेला होता. लंचनंतर रिषभ पंत व रवींद्र जडेजा कसे खेळतात यावर सामन्याचा निकाल ठरणार, असे म्हटले गेले. मात्र, मैदानात उतरल्यानंतर न्यूझीलंडने ‘घेरून मारणे’ काय असते या वाक्यप्रचाराची प्रचिती करून दिली. एका बाजूने जेमिसन स्विंग गोलंदाजीचा अप्रतिम नजराणा सादर करू लागला तर, दुसऱ्या बाजूने डावखुरा नील वॅग्नर फक्त आणि फक्त बाउन्सर चेंडू टाकत पंत-जडेजा जोडीला बेजार करत होता. आठव्या षटकात न्यूझीलंडला यश मिळाले व जडेजा वॅग्नरच्या चेंडूवर बाद झाला. पंतने संपूर्ण खेळीदरम्यान खेळले, तसाच एक बेजबाबदार फटका मारून बाद होत भारताच्या उरल्यासुरल्या आशेला सुरूंग लावला. तो ४१ धावा काढून या डावात भारताचा सर्वाधिक धावा बनवणारा फलंदाज बनला.
पंत बाद झाल्यानंतर अवघ्या तेरा धावांमध्ये १७० धावसंख्येवर भारताचा दुसरा डाव संपुष्टात आला. टिम साऊदीने ४ बळी मिळवत भारतीय संघाचे कंबरडे मोडले. बोल्टच्या पदरीही तीन बळी पडले.
न्यूझीलंडसाठी फायनल फ्रंटियर
भारतीय संघ १७० धावांमध्ये सर्वबाद झाल्याने न्यूझीलंडला ‘विश्वविजेते’ बनण्यासाठी दिवसातील उर्वरित ५३ षटकांमध्ये १३९ धावा हव्या होत्या. चहापानापूर्वी न्यूझीलंडला आठ षटके खेळण्यास मिळणार होती. ही आठ षटके कॉनवे व लॅथम जोडीने सांभाळून खेळत १९ धावा बनविल्या. त्यानंतर, कसोटी क्रिकेटमधील सर्वात महत्वाच्या सत्राला सुरुवात झाली. हे सत्र सुरू झाल्यानंतर १० षटकात रविचंद्रन अश्विनने न्यूझीलंडचे दोन्ही सलामीवीर माघारी धाडत, चाहत्यांना जल्लोष करण्याची संधी दिली. अश्विनविरूद्ध विलियम्सनने एक स्विप मारण्याचा प्रयत्न केला मात्र तो फसला. भारतीय खेळाडूंनी जोरदार अपील केल्याने पंचांनी त्याला बाद ठरविले. मात्र, त्याने तात्काळ तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली आणि पंचांनी हा निर्णय बदलला.
हम खडे तो सबसे बडे
मोठ्या सामन्यांत हाराकिरी करणारा संघ अशी काहीशी ओळख न्यूझीलंड संघाची बनलेली आहे. दोन गडी एकापाठोपाठ बाद झाल्यानंतर पुन्हा न्यूझीलंड ढेपाळणार का? असा प्रश्न सर्वाना पडला. या प्रश्नाचे उत्तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सध्याचा सर्वात अनुभवी फलंदाज असलेल्या रॉस टेलर व कर्णधार केन विलियम्सन यांनी ‘नाही’ असे दिले.
तब्बल १८ चेंडू निर्धाव खेळल्यानंतर टेलरने खाते खोलले. दोन षटकांच्या अंतरात ४ चौकार वसूल करत, आता भारत या सामन्यात पुनरागमन करणार नाही, याची खबरदारी त्यांनी घेतली. ते भारतीय गोलंदाजांना एखाद्या क्लब गोलंदाजांप्रमाणे खेळू लागले. न्यूझीलंडच्या विश्वविजयाची घटीका जवळ येऊ लागली.
…आणि तो ऐतिहासिक क्षण आला
न्यूझीलंड या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा विजेता होणार हे नक्की झाले होते. फक्त तो ऐतिहासिक क्षण कसा असणार याची उत्सुकता लागली होती. विलियम्सनने आपले झुंजार अर्धशतक पूर्ण केले. टेलरने देखील चाळिशी पार केली होती. न्यूझीलंडच्या डावातील ४६ व्या षटकातील पाचव्या चेंडूवर मिड ऑनच्या दिशेने टेलरने आपल्या चिरपरिचित फ्लिकचा फटका मारत चौकार वसूल करून न्यूझीलंडला ‘विश्वविजेते’ असा बहुमान मिळवून दिला. टेलर-विलियम्सन जोडीने गळाभेट घेतली. तिकडे, ड्रेसिंग रूमच्या दरवाजातून सामना पाहणाऱ्या संपूर्ण संघाने जल्लोष करण्यास सुरुवात केली. मैदानावर उपस्थित असणारे न्यूझीलंडचे मोजकेच प्रेक्षक अक्षरशः शर्ट काढून आनंदोत्सव साजरा करत होते.
Who better to hit the winning runs than the @BLACKCAPS’ greatest ever Test run-scorer, Ross Taylor?
Inside the winning moment and trophy presentation 🎥 #WTC21 pic.twitter.com/mvu5Ed5MaC
— ICC (@ICC) June 23, 2021
कायमचा मिटला चोकर्सचा शिक्का
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये न्यूझीलंडचा संघ कधीही बलाढ्य म्हणून गणला गेला नाही. मात्र, आपल्या सांघिक कामगिरीच्या बळावर त्यांनी क्रिकेटविश्वात आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. मागील दशकभराच्या काळात सलग दोन विश्वचषकाच्या अंतिम फेरीपर्यंत त्यांनी मजल मारली. २०१५ वनडे विश्वचषकात एकतर्फी पराभव झाला असला तरी, २०१९ वनडे विश्वचषकात केवळ नशिबाने दगा दिल्याने त्यांचे विश्वविजेतेपद हुकले होते.
2019 ⏩ 2021
“Nice guys do finish first!”#CWC19 | #WTC21 pic.twitter.com/6xN0sYY3DZ
— ICC (@ICC) June 23, 2021
कसोटी क्रिकेटच्या १४४ वर्षांच्या इतिहासात, तब्बल २४२४ कसोटी सामन्यानंतर प्रथमच होत असलेल्या या सर्वात मोठ्या सामन्यात विजय संपादन करत त्यांनी ‘विश्वविजेते’ हा खिताब आपल्या नावे केला. विश्वविजेत्याला दिली जाणारी मानाची गदा ज्यावेळी केन विलियम्सनने उंचावली त्यावेळी खऱ्या क्रिकेटप्रेमींना अतीव आनंद झाला असेल, हे वेगळे सांगायला नको. जंटलमन्स गेमचा सध्याचा सर्वात मोठा जेंटलमन मानल्या जाणाऱ्या विलियम्सनने या आनंदाच्या काळात देखील अजिबात भारावून न जाता ही गदा या सामन्यानंतर निवृत्त होत असलेल्या बीजे वॉटलींगकडे अत्यंत सन्मानाने सुपूर्द केली.
ज्यावेळी न्यूझीलंडचा संघ इंग्लंडच्या भूमीवर विश्वविजेते बनत होता त्यावेळी न्यूझीलंडमध्ये पहाट झालेली. या पहाटेनंतर उगवणारा सूर्य हा न्यूझीलंड क्रिकेटसाठी कधीही मावळणारा नव्हता!
वाचा –
स्मिथची सावली मानल्या जाणाऱ्या लॅब्युशेनने गाजवली अख्खी ‘टेस्ट चॅम्पियनशिप’
अन् वॉटलींगच्या दैदिप्यमान कारकिर्दीवर WTC चा सुवर्णकलश चढला
चार दिवस दुखापतीसह खेळत वॅग्नरने न्यूझीलंड चाहत्यांना क्रिकेट इतिहासातील सर्वात मोठा दिवस दाखवला