भारतीय क्रिकेट संघाने नुकतीच इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका आपल्या नावे केली. याच बरोबर, भारताने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. या अंतिम सामन्यात भारताचा मुकाबला न्यूझीलंडसोबत होईल. मात्र, लॉर्ड्सवर हा अंतिम सामना खेळविण्यात येणार की नाही, याबाबतची शंका बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी दूर केली.
भारत-न्यूझीलंडची अंतिम फेरीत धडक
ऑगस्ट २०१९ मध्ये आयसीसीने सुरू केलेल्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत भारत आणि न्यूझीलंड यांनी स्थान मिळवले आहे. उभय संघांमध्ये १८ ते २२ जूनदरम्यान लॉर्डसवर स्पर्धेचा अंतिम सामना खेळण्याचे ठरले होते. मात्र, कोविड-१९ च्या प्रभावाने अंतिम फेरीचे आयोजन इतरत्र करण्याविषयी चर्चा रंगली होती.
या ठिकाणी होणार अंतिम सामना
जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना लॉर्ड्सवर खेळवला जाणार की नाही, या चर्चेला बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी पूर्णविराम दिला आहे. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत गांगुली म्हणाले, “जागतिक कसोटी चॅम्पियनशीपचा अंतिम सामना साऊथहॅम्पटन येथे खेळला जाणार आहे. याबाबत काही दिवसांपूर्वीच निर्णय झाला होता. कोविड-१९ मुळे हा निर्णय घेण्यात आला होता. मैदानापासून हॉटेल जवळ असल्याने बायो-बबलचे नियमन करणे सोपे जाईल.” तसेच, हा सामना पाहण्यासाठी जाण्याबाबत देखील नियोजन असल्याचे गांगुलीने सांगितले.
टी२० मालिकेबाबत केले विधान
काही दिवसांपूर्वी हृदयाची शस्त्रक्रिया झाल्याने इंग्लंड विरुद्ध होणाऱ्या टी२० मालिका पाहण्यासाठी आपण जाणार का? या प्रश्नाविषयी बोलताना ते म्हणाले, “सध्या मी पूर्णपणे तंदुरुस्त आहे. काही दिवसांपूर्वीच मी कामावर रुजू झालो आहे. टी२० मालिकेतील सामने पाहण्यासाठी जाण्याचे माझे प्रयोजन आहे. दुसरा किंवा तिसरा सामना पाहण्यासाठी मी अहमदाबादला जाईल.”
गांगुली यांनी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचलेल्या भारतीय संघाचे अभिनंदन केले. सोबतच, ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर मिळविलेल्या विजयाबद्दल अजिंक्य रहाणेचे देखील त्यांनी कौतुक केले. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत उत्तम कामगिरी करणारा युवा यष्टीरक्षक रिषभ पंतचे त्यांनी विशेष अभिनंदन केले.
महत्वाच्या बातम्या:
विराटसेना पहिल्याच सामन्यात मुंबईकरांशी करणार दोन हात, जाणून घ्या आरसीबीचे संपूर्ण वेळापत्रक
WI vs SL : निर्णायक सामन्यात विजय मिळवत वेस्ट इंडिजने टी२० मालिकेवरही केला कब्जा
जेव्हा भारतीय क्रिकेटपटू बनतात लहान मुलं! व्हिडिओ होतोय प्रचंड व्हायरल