आयपीएलच्या चौदाव्या हंगामाची रणधुमाळी ९ एप्रिलपासून सुरू झाली आहे. पहिल्याच आठवड्यापासून चाहत्यांना रंगतदार सामने पाहायला मिळत आहेत. शेवटच्या षटकापर्यंत रंगत असलेले सामने उत्कंठा अधिकच वाढवत आहेत.
गेल्या आठवड्यात कोलकाता नाईट रायडर्स विरूद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात थरारक लढत झाली होती. तसेच राजस्थान रॉयल्स विरुध्द दिल्ली कॅपिटल्सच्या सामनाही श्वास रोखून धरायला लावणारा झाला होता. पॉईंट्स टेबल मध्ये देखील त्यामुळे चांगलीच चुरस निर्माण झाली आहे.
दरम्यान, या सामन्यांदरम्यान एक नवीनच गोष्ट समोर आली आहे. जणूकाही जिंकण्याचा एक नवीन फॉर्म्युला संघांना सापडले असल्याचे आढळून आले आहे. जेव्हा जेव्हा एखाद्या संघाचा कर्णधार रन आउट झाला आहे, तेव्हा तेव्हा त्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. यंदाच्या आयपीएल हंगामातील चार सामन्यात हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे.
यंदाच्या आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगलोरच्या खेळाडूंनी मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माला रन आउट केले होते आणि बंगलोरने हा सामना जिंकला देखील होता. त्यानंतर राजस्थान रॉयल्स विरुध्द दिल्ली कॅपिटल्सच्या सामन्यातही दिल्लीचा कर्णधार रिषभ पंत रन आउट झाला होता. आणि हा सामना देखील दिल्लीने गमावला होता.
अशीच घटना चेन्नई सुपर किंग्ज विरूद्ध पंजाब किंग्जच्या सामन्यातही घडली. पंजाबचा कर्णधार केएल राहुलला चेन्नईचा खेळाडू रवींद्र जडेजाने रन आउट केले. आणि पुन्हा एकदा योगायोग म्हणजे पंजाबला या सामन्यात चेन्नईने पराभूत केले. सनरायझर्स हैद्राबाद विरूद्ध मुंबई इंडियन्स मध्ये खेळवल्या गेलेल्या सामन्यात देखील हाच प्रकार घडला. मुंबईचा खेळाडू हार्दिक पंड्याने हैद्राबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरला रन आउट केले आणि सामना देखील मुंबई इंडियन्सने जिंकला. त्यामुळे चक्क एक-दोन नव्हे, तर चार सामन्यात हा फॉर्म्युला खरा ठरल्याचे दिसून आले आहे. हाच फॉर्म्युला पुढील सामन्यातही यशस्वी ठरणार का, हे पाहणे आता उत्सुकतेचे ठरेल.
महत्वाच्या बातम्या:
पाहता पाहता आयपीएल सुरु होऊन १३ वर्ष झाली! पाहा या १३ वर्षातील खास आकडेवारी
RCBvsKKR Live: फलंदाजांनी ठोकले, गोलंदाजांनी रोखले; बेंगलोरचा कोलकातावर ३८ धावांनी मोठा विजय
व्हिडिओ : मॅक्सवेलचे अर्धशतक होताच कोहली झाला भलताच खुश, उत्साहात केले अभिनंदन