क्रिकेटच्या मक्का म्हणजेच लाॅर्ड्समध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात रंगत वाढली आहे. चौथ्या दिवसाखेर भारताची अवस्था 4 बाद 58 अशी असून, आता पाचव्या आणि शेवटच्या दिवशी 135 धावांची गरज आहे. इंग्लंडने दुसऱ्या डावात 192 धावांवर गारद होत भारतासमोर 193 धावांचं लक्ष्य ठेवलं आहे.
विशेष म्हणजे, दोन्ही संघांनी पहिल्या डावात बरोबरी साधत 387 धावा फलकावर लावल्या होत्या. अशा परिस्थितीत आता साऱ्या क्रिकेटप्रेमींचं लक्ष याकडे लागलं आहे की ते भारताच्या धावांचा पाठलाग पूर्ण होतो का?
लॉर्ड्सवर 190 पेक्षा अधिक धावांचं लक्ष्य आतापर्यंत सात वेळा पार करण्यात आलं आहे, पण त्यात भारताचं नाव नाही. टीम इंडियाचा लॉर्ड्सवरील सर्वोच्च रन चेस फक्त 136 धावांचा असून, तो संघाने 1986 मध्ये केला होता. त्यानंतर भारताने 2014 आणि 2021 मध्ये येथे विजय मिळवले, पण दोन्ही वेळा त्यांनी लक्ष्याचं रक्षण केलं होतं.
या सामन्यात टीम इंडियाचं नेतृत्व करत असलेला शुभमन गिल आणि त्याची युवा फौज जर हे आव्हान पार करत विजय मिळवते, तर भारत पहिल्यांदाच लॉर्ड्सवर 150+ धावांचा पाठलाग यशस्वीपणे पूर्ण करेल. दक्षिण आफ्रिकेने नुकत्याच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 282 धावांचा पाठलाग करून खिताब उचलला होता – भारतासाठी हीच प्रेरणा ठरू शकते.
लॉर्ड्सवर झालेले टॉप 7 मोठे रन चेस:
वेस्ट इंडिज विरुद्ध इंग्लंड – 344/1 (1984)
इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड – 282/3 (2004)
दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया – 282/5(2025)
इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड – 279/5(2022)
इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड – 218/3 (1965)
इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज – 193/5 (2012)
इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज – 191/8 (2000)
सामन्याचा शेवटचा दिवस अत्यंत थरारक ठरणार हे नक्की. जर भारतीय फलंदाजांनी संयमाने खेळ करत, चूक टाळली, तर लॉर्ड्सवर इतिहास रचण्याची सुवर्णसंधी गमावली जाणार नाही. पण समोर इंग्लंडचा आक्रमक गोलंदाजी आघाडी उभी आहे आणि खेळाची परीक्षा खरी आता सुरू होणार आहे. त्यामुळे संघाला विजय मिळवण्यासाठी मोठी कस लागणार आहे.






