शोएब अख्तर हा क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात वेगवान गोलंदाज आहे. अख्तरनं 2003 मध्ये ताशी 161.3 किमी वेगानं चेंडू टाकला होता, जो क्रिकेटच्या इतिहासातील आतापर्यंतचा सर्वात वेगवान चेंडू आहे. अख्तरच्या रेकॉर्डला 20 वर्षांहून अधिक काळ लोटला, परंतु अजूनही तो कोणी मोडू शकलेला नाही. अख्तर याच्यानंतर त्यांच्यासारखा वेगवान गोलंदाज क्रिकेट जगतात आला नाही. मात्र सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक गोलंदाज हुबेहुब शोएब अख्तरप्रमाणे गोलंदाजी करताना दिसतोय.
विशेष म्हणजे स्वतः शोएब अख्तरनं या गोलंदाजाचा व्हिडिओ आपल्या इंस्टाग्राम स्टोरीद्वारे शेअर केला. अख्तरप्रमाणे गोलंदाजी करणाऱ्या या गोलंदाजाचं नाव इमरान मोहम्मद असून तो ओमानमध्ये क्रिकेट खेळतो. मात्र तो मूळचा पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांताचा आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये इमरान गोलंदाजी करताना शोएब अख्तरप्रमाणेच रनअप घेत असल्याचं दिसून येतं. याशिवाय त्याची ॲक्शनही अख्तरसारखीच आहे. हे फक्त रनअप आणि गोलंदाजी ॲक्शन पर्यंतच मर्यादित नाही, तर इम्रानचं दिसणंही अख्तरसारखेच आहे! तुम्ही त्याच्या गोलंदाजीचा व्हिडिओ येथे पाहू शकता.
He’s more Shoaib Akhtar than Shoaib Akhtar himself… pic.twitter.com/cXKQGgNgbn
— Prashanth S (@ps_it_is) September 19, 2024
शोएब अख्तरसारखी गोलंदाजी करणाऱ्या इम्रान मोहम्मदनं वयाच्या 18व्या वर्षी पाकिस्तान सोडलं होतं. सध्या तो ओमानची राजधानी मस्कतमध्ये राहतो. तेथे तो सीसीटीव्ही कॅमेरे लावून आपला उदरनिर्वाह करत आहे. याशिवाय तो क्रिकेटचा सरावही करत असतो. इम्रान मोहम्मदनं ओमानमध्ये होणाऱ्या स्थानिक क्रिकेट लीगमध्ये भाग घेतला आहे, जेथील हा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय.
हेही वाचा –
VIDEO: क्रिकेट इतिहासातील सर्वात विचित्र रनआऊट, व्हिडिओ पाहूनही विश्वास बसणार नाही!
श्रीलंकेचा जागतिक क्रिकेटमध्ये कमबॅक, पहिल्या कसोटीत न्यूझीलंडला धुतलं!
6 चौकार अन् 7 षटकार…मैदानावर पुन्हा आलं निकोलस पूरनचं वादळ!