भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने पाच बळी घेत ऑस्ट्रेलियाच्या डावाला खिंडार पाडल्याने ब्रिस्बेन कसोटीत ऑस्ट्रेलियाचा डाव २९४ धावांवर संपुष्टात आला. त्यासह चौथ्या डावात विजयासाठी भारताला ३२८ धावांचे लक्ष्य मिळाले आहे. सिराजने आपल्या आंतरारष्ट्रीय कसोटी कारकिर्दीतील अवघ्या तिसऱ्या कसोटीत भारताच्या गोलंदाजी आक्रमणाचे समर्थपणे नेतृत्व करताना ५ बळी घेण्याची कामगिरी केल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
आता यावर चौथ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर खुद्द सिराजने प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बोलताना सिराजने भारताचा या कसोटी मालिकेसाठीचा प्रभारी कर्णधार अजिंक्य रहाणेचे आभार मानले आहेत.
“रहाणेने दर्शविला विश्वास”
आजच्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर माध्यमांशी बोलताना सिराज म्हणाला, “मी आत्तापर्यंत भारतासाठी जे सामने खेळलो आहे त्याने आणि देशांतर्गत क्रिकेटमधील अनुभवाने मला आत्मविश्वास मिळवण्यासाठी मदत केली. माल नक्कीच जसप्रीत बुमराहची उणीव भासली. मात्र त्याच्या अनुपस्थितीत मला आघाडीवर राहून चांगली कामगिरी करण्याची जबाबदारी होती. ऑस्ट्रेलियन फलंदाजांवर दबाव निर्माण करण्याचा माझा उद्देश होता.”
संघातील युवा खेळाडूंनी दिलेल्या योगदानाबद्दलही त्याने समाधान व्यक्त केले. तो म्हणाला, “युवा खेळाडू शार्दुल ठाकूर, वाॅशिंग्टन सुंदर आणि टी नटराजन यांनी ज्या पद्धतीने प्रदर्शन केले, ते आमच्यासाठी संघ म्हणून अभिमानास्पद होते. युवा खेळाडू मिळालेल्या संधीचा फायदा घेत आहेत. आणि यासाठी मी आमचा कर्णधार रहाणेचे आभार मानेन. त्याने ज्या पद्धतीने माझ्यावर आणि या युवा खेळाडूंवर विश्वास दर्शविला त्यामुळेच आम्हाला आत्मविश्वास आला.”
दरम्यान, भारतीय संघाला ऑस्ट्रेलियन भूमीवर सलग दुसरा कसोटी मालिका विजय मिळवण्यासाठी शेवटच्या दिवशी ३२४ धावांची गरज असून त्यांचे १० फलंदाज बाकी आहेत. मात्र आजही पावसाच्या व्यत्ययामुळे काही षटकांचा खेळ वाया गेला असून उद्याही पाऊस पडण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत जर उद्याही पावसाचा जोर कायम राहिला तर सामना अनिर्णीत अवस्थेत संपेल आणि १-१ अशा बरोबरीसह भारतीय संघ बॉर्डर-गावसकर चषक आपल्याकडे कायम राखण्यात यशस्वी होईल.
महत्वाच्या बातम्या:
टी-20 विश्वचषकापूर्वी हा संघ करणार भारताचा दौरा
ब्रिस्बेन कसोटीत अंपायरचा शार्दुलवर अन्याय? तळातील फलंदाजाला वेगवान बाउंसर टाकल्याने दिली चेतावणी