भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टी२० सामन्यात दिमाखदार ६ विकेट्सने विजय मिळवला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ऍरॉन फिंचला दुखापत झाल्याने त्याच्या जागी मॅथ्यू वेडने कर्णधारपद स्विकारले होते. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाकडून वेडने चांगली खेळी केली. त्याने ३२ चेंडूत १० चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ५८ धावांची खेळी केली. परंतु यादरम्यान त्याला केएल राहुल आणि भारतीय कर्णधार विराट कोहली यांच्याकडून अतिशय वाईट पद्धतीने धावबाद व्हावे लागले. आपल्या बाद होण्यामागे त्याने राहुल आणि विराटला नाही, तर आपल्या संघातील एका खेळाडूला जबाबदार धरले आहे.
झाले असे की, डावाच्या आठव्या षटकात अर्धशतक करून फलंदाजी करत असलेल्या वेडचा शॉट सरळ विराटच्या हातात गेला. परंतु तो झेल त्याला पकडता आला नाही. यानंतर वेडला वाटले की, तो बाद झाला आहे आणि तो पव्हेलियनच्या दिशेने निघाला. याचवेळी विराटने स्थिती लक्षात घेत चेंडू थेट यष्टीरक्षक राहुलकडे फेकला. यादरम्यान वेडला समजण्याच्या आधीच राहुलने वेडला बाद केले होते.
Uh-oh 🙆♂️ #AUSvINDpic.twitter.com/axltbEVLjm
— ICC (@ICC) December 6, 2020
तरीही, वेडने आपल्या चुकीसाठी विराट किंवा राहुलला नाही, तर संघसहकारी स्टीव्ह स्मिथला जबाबदार धरले. सामन्यानंतर बोलताना वेडला आपल्या विकेटबाबत विचारले असता, त्याने मजेशीर अंदाजात म्हटले की, स्मिथमुळे मी शतक करण्यापासून चुकलो. तो म्हणाला, “होय, स्मिथमुळे माझे शतक राहून गेले. त्याने मला धावबाद केले.”
आपल्या विकेटवर तो पुढे म्हणाला, “हे विचित्र होते. मी विराटला एकदा गडबडताना पाहिले. परंतु पुन्हा एकदा मी चेंडू पाहिला नाही. मला वाटले कदाचित त्याने झेल पकडला. मी त्यानंतर रिप्लेमध्ये पाहिले. त्यामुळे जेव्हा मी दुसऱ्यांदा चेंडू पाहिला, तर मी पव्हेलियनच्या दिशेने जायला लागलो. त्यानंतर स्मिथने मला म्हटले की त्याने झेल सोडला आहे. परंतु तेव्हापर्यंत खूप उशीर झाला होता. दुर्दैवाने तसेही माझी विकेट गेलीच असती.”
वेडच्या अर्धशतकाच्या मदतीने यजमान संघाने २० षटकात ५ विकेट्स गमावत १९४ धावा ठोकल्या होत्या. हे आव्हान भारतीय संघाने १९.४ षटकात पूर्ण केले. आणि ६ विकेट्सने सामना आपल्या नावावर केला. यासोबतच भारताने मालिका २-०ने आपल्या खिशात घातली.