श्रीलंकेविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकांनंतर आता भारतीय संघ मोठ्या विश्रांतीवर गेला आहे. भारतीय खेळाडू आता दीड महिन्याच्या विश्रांतीनंतर मैदानावर उतरतील. दरम्यान भारतीय संघाबाबत एक मोठे अपडेट समोर आले आहे. या वर्षाच्या अखेरीस भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात बॉर्डर-गावसकर ट्रॉफी खेळली जाणार आहे. यावेळी बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये पाच कसोटी सामने खेळवले जाणार आहेत.
भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांसाठी ही मालिका खूप महत्त्वाची आहे, कारण आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद 2023-25 च्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी दोन्ही संघांना ही मालिका जिंकणे आवश्यक आहे. या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाला एक दिवस-रात्र कसोटी सामना खेळायचा आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघ एक सराव सामना खेळणार आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच कसोटी सामन्यांची मालिका 22 नोव्हेंबरपासून पर्थमध्ये सुरू होणार आहे. 1991-92 च्या हंगामानंतर या दोन संघांमध्ये पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळण्याची ही पहिलीच वेळ असेल. 22 ते 26 नोव्हेंबरदरम्यान पहिला कसोटी सामना झाल्यानंतर उभय संघांना एडलेडच्या मैदानावर 6 डिसेंबर ते 10 डिसेंबर दरम्यान दिवस-रात्र कसोटी सामना खेळायचा आहे. तत्पूर्वी भारतीय संघ पंतप्रधान इलेव्हन संघाविरुद्ध दोन दिवसीय सराव सामना खेळणार आहे. हा सामना 30 नोव्हेंबर आणि 1 डिसेंबर रोजी होणार आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने याबाबत माहिती दिली आहे. भारतीय संघाला ऍडलेड येथे होणाऱ्या दिवस-रात्र कसोटी सामन्याची तयारी करण्यासाठी या सराव सामन्याचे वेळापत्रक जोडण्यात आले आहे. यापूर्वी 2020-21 मध्ये असे घडले होते.
ऑस्ट्रेलियात खेळल्या गेलेल्या दोन बॉर्डर-गावसकर ट्रॉफी भारताने जिंकल्या आहेत. 2020-21 मध्ये, ऍडलेडमध्ये एक दिवस-रात्र कसोटी सामना खेळला गेला होता, जिथे भारतीय संघ 36 धावांवर सर्वबाद झाला होता. भारताने हा सामना 8 विकेटने गमावला होता.
भारत आणि ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेचे वेळापत्रक
भारत आणि ऑस्ट्रेलिया पहिली कसोटी- पर्थ कसोटी- 22 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर 2024
भारत आणि ऑस्ट्रेलिया दुसरी कसोटी-ऍडलेड दिवस-रात्र कसोटी- 6 ते 10 नोव्हेंबर 2024
भारत आणि ऑस्ट्रेलिया तिसरी कसोटी- ब्रिस्बेन कसोटी- 14 ते 18 डिसेंबर 2024
भारत आणि ऑस्ट्रेलिया चौथी कसोटी- मेलबर्न कसोटी- 26 ते 30 डिसेंबर 2024
भारत आणि ऑस्ट्रेलिया पाचवी कसोटी- सिडनी कसोटी – 03 ते 07 जानेवारी 2025
महत्त्वाच्या बातम्या-
भाला कशापासून बनतो? भालाफेकीचा इतिहास काय? रंजक माहिती जाणून घ्या
विनेशसाठी धावून आला सचिन तेंडूलकर; गणित समजावत म्हणाला, “तिला रौप्य पदक…”
नीरज चोप्राच्या आईनं केलेल्या वक्तव्यावर कुस्तीपटू बजरंग पुनिया भावूक! म्हणाला…