पहिल्या कसोटीपाठोपाठ दुसऱ्या कसोटीतही विजय मिळवण्यासाठी भारतीय खेळाडूंनी यशस्वी झुंज दिली. बांगलादेशने दुसऱ्या डावात दिलेल्या 145 धावांच्या आव्हानाचा पाटलाग करताना भारताच्या वरच्या फळीतील फलंदाज झटपट तंबूत परतले. त्यानंतर अक्षर पटेल हा चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. मात्र, त्यालाही संघर्ष करावा लागला. असे असले, तरीही सामन्याच्या चौथ्या दिवशी रविवारी (दि. 25 डिसेंबर) श्रेयस अय्यर आणि आर अश्विन या जोडीने भारताचा डाव सावरला आणि 3 विकेट्सने रोमहर्षक विजय मिळवून दिला. यासोबतच भारताने ही मालिका 2-0ने खिशात घातली. हा सामना जिंकला असला, तरीही भारताने दुसऱ्या कसोटीत 2 मोठ्या चुका केल्या, ज्या अय्यर- अश्विनच्या भागीदारीमुळे झाकल्या गेल्या. चला तर चुकांबद्दल जाणून घेऊयात.
भारतापुढे बांगलादेशने विजयासाठी 145 धावांचे आव्हान दिले होते. यावेळी भारताने 74 धावांवर 7 विकेट्स गमावल्या होत्या. यादरम्यान भारताने 2 मोठ्या चुका केल्या होत्या. यातील पहिली चूक फिरकीपटू कुलदीप यादव (Kuldeep Yadav) हा संघातून बाहेर पडणे ही होती. बांगलादेशने फिरकीपटूंच्या जोरावर सामन्यात जोरदार पुनरागमन केले.
1. कुलदीप यादवला सामन्यात खेळवले नाही
भारतीय संघव्यवस्थापनाने दुसऱ्या कसोटीसाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये एक बदल केला होता. तो म्हणजे, फिरकीपटू कुलदीप यादव याला संघात न खेळवण्याचा. हा निर्णय प्रशिक्षक राहुल द्रविड आणि कर्णधार केएल राहुल यांनी घेतला होता. हा निर्णय भारतीय संघाला महागात पडू शकला असता. भारताच्या 17 पैकी 16 विकेट्स या बांगलादेशच्या फिरकीपटूंनी घेतल्या होत्या. भारताच्या 2 फिरकीपटूंनी फक्त 9 विकेट्स घेतल्या होत्या. विशेष म्हणजे, कुलदीपने पहिल्या कसोटीत 8 विकेट्स घेतल्या होत्या. तसेच, त्याला सामनावीर पुरस्कारानेही गौरवण्यात आले होते.
2. भारतीय संघाचे खराब क्षेत्ररक्षण
बांगलादेशने दुसऱ्या डावात 231 धावा चोपल्या. यामध्ये भारतीय क्षेत्ररक्षकांची भूमिका महत्त्वाची होती. विराट कोहली (Virat Kohli) याने एकट्याने 4 झेल सोडले. भारतीय खेळाडूंनी या चुका केल्या नसत्या, तर कदाचित बांगलादेश संघ 200 धावांपर्यंत पोहोचू शकला नसता. दुसऱ्या डावात बांगलादेशकडून लिटन दास आणि जाकिर हसन यांनी अर्धशतक साकारले. त्यामुळे खराब क्षेत्ररक्षण भारताला महागात पडले असते.
असे असले, तरीही बांगलादेशने दिलेल्या 145 धावांचे आव्हान पार करण्यात आर अश्विन (R Ashwin) याने मोलाचा वाटा उचलला. त्याने 62 चेंडूत 42 धावा चोपल्या. यादरम्यान त्याने श्रेयस अय्यर याच्यासोबत अर्धशतकी भागीदारी रचली. अय्यरने नाबाद 29 धावांचे योगदान दिले. यासह भारत बांगलादेशमध्ये एकही कसोटी सामना पराभूत न होण्याचा विक्रम कायम ठेवण्यात यशस्वी झाला. (ind vs ban 2nd test team india not give chance to kuldeep yadav and virat kohli drops catches)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
जिथं कमी तिथं आम्ही! राहुल- रोहितलाही जे जमलं नाही, ते अश्विनने करून दाखवलं; वाचा बातमी
आतल्या गोटातील बातमी! मालिका विजयानंतर कर्णधार राहुल म्हणाला, ‘खोटं बोलणार नाही, ड्रेसिंग रूममध्ये…’