ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान अशा 3 संघांना पराभवाचा धक्का दिल्यानंतर आता भारतीय संघापुढे विश्वचषक 2023 स्पर्धेतील चौथ्या सामन्यात बांगलादेशचे आव्हान आहे. सलग 3 विजयांनंतर रोहित शर्मा याच्या नेतृत्वातील भारतीय संघाचा आत्मविश्वास नक्कीच वाढला असेल. तसेच, बांगलादेश संघ 2 पराभवांनंतर भारताविरुद्ध दमदार कामगिरी करण्याचा प्रयत्न करेल. हा सामना गुरुवारी म्हणजेच 19 ऑक्टोबर रोजी खेळला जाणार आहे. यापूर्वी आपण सामन्याविषयीची सर्व माहिती जाणून घेऊयात…
पुण्याची खेळपट्टी
भारत विरुद्ध बांगलादेश (India vs Bangladesh) संघात वनडे विश्वचषक 2023 (ODI World Cup 2023) स्पर्धेतील 17वा सामना पुणे (Pune) येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (Maharashtra Cricket Association) येथे खेळला जाणार आहे. या मैदानाची खेळपट्टी फलंदाजांसाठी स्वर्ग मानली जाते. पुण्याच्या मैदानात जबरदस्त चौकार-षटकारांची बरसात पाहायला मिळते. मात्र, या खेळपट्टीतून गोलंदाजांनाही थोडीफार मदत मिळते. याचा फायदा भारत आणि बांगलादेशचे फिरकीपटू घेऊ शकतात.
मैदानाची आकडेवारी
पुण्याच्या या मैदानावर आतापर्यंत एकूण 7 वनडे सामने खेळले गेले आहेत. यामध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने 4 वेळा विजय मिळवला आहे, तर 3 सामने आव्हानाचा पाठलाग करणारा संघ जिंकला आहे. पहिल्या डावात या मैदानावरील सरासरी धावसंख्या ही 307 राहिली आहे. तसेच, दुसऱ्या डावातील सरासरी धावसंख्या 281 इतकी राहिली आहे. या मैदानावरील सर्वोच्च धावसंख्येचा विचार केला, तर ती 356 राहिली आहे. ही धावसंख्या भारताने इंग्लंडविरुद्ध केली होती.
भारतीय संघ शानदार फॉर्ममध्ये
भारतीय संघ आयसीसी विश्वचषक 2023 स्पर्धेत सध्या शानदार फॉर्ममध्ये आहे. पाकिस्तानविरुद्धच्या अखेरच्या सामन्यात भारतीय संघाने जबरदस्त प्रदर्शन केले होते. गोलंदाजीत जसप्रीत बुमराह आणि कुलदीप यादव यांनी धमाल केली होती. तसेच, मोहम्मद सिराज आणि रवींद्र जडेजा यांनीही आपलं नाणं खणकवलं होतं. फलंदाजीत रोहित शर्मा याची बॅट तळपली होती. त्याने पाकिस्तानच्या गोलंदाजांना चांगलाच चोप दिला होता. श्रेयस अय्यर आणि विराट कोहली यांनीही चांगली फटकेबाजी केली. अशात भारतीय संघ बांगलादेशविरुद्ध कशी कामगिरी करतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (ind vs ban pitch report world cup 2023 maharashtra cricket association stadium pune know details here)
हेही वाचा-
सलग 3 सामने जिंकणाऱ्या न्यूझीलंडला रोखणार का अफगाणी सेना? जाणून घ्या आजच्या सामन्याची माहिती
बिग बॉस विजेता MC Stanने घेतली धोनीची भेट; नेटकरी म्हणाले, ‘हात जोडून विनंती…’