इंग्लंडचा संघ या महिन्यात मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्याची सुरुवात पाच सामन्यांच्या टी20 मालिकेनं होईल. त्यानंतर पुढील महिन्याच्या सुरुवातीला तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका होणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी ही एकदिवसीय मालिका दोन्ही देशांसाठी खूप महत्त्वाची असेल. या मालिकेसाठी उभय देशांना असा संघ निवडायचा आहे, जो त्यांना चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही घेऊन जाता येईल. या एकदिवसीय मालिकेत खेळणारे बहुतेक खेळाडू चॅम्पियन्स ट्रॉफीचा देखील भाग असू शकतात.
इंग्लंडबद्दल बोलायचं झालं तर, ते भारतातील त्यांचा चार दशकांपासूनचा विजयाचा दुष्काळ दूर करण्याचा प्रयत्न करतील. इंग्लंडनं भारतात एकदिवसीय मालिका जिंकून तब्बल 44 वर्षे झाली आहेत. साहेबांनी डिसेंबर 1984 मध्ये भारतात शेवटची एकदिवसीय मालिका जिंकली होती. त्यावेळी त्यांनी पाच सामन्यांच्या मालिकेत 4-1 असा विजय मिळवला होता. त्यावेळी भारताचे कर्णधार सुनील गावस्कर होते आणि इंग्लंडचे कर्णधार डेव्हिड गॉवर होते.
इंग्लंडचा संघ 1981 मध्ये पहिल्यांदा एकदिवसीय मालिका खेळण्यासाठी भारतात आला होता. तेव्हापासून दोन्ही देशांमध्ये भारतीय मैदानावर आतापर्यंत 10 द्विपक्षीय एकदिवसीय मालिका झाल्या आहेत. 1984 मध्ये भारतात एकमेव एकदिवसीय मालिका जिंकल्यापासून, इंग्लंडनं आठ वेळा भारताचा दौरा केला. यापैकी दोन वेळा मालिका अनिर्णित राहिली, तर भारतानं सहा वेळा मालिका जिंकली आहे.
इंग्लंडनं तीन वर्षांपूर्वी एकदिवसीय मालिकेसाठी शेवटचा भारत दौरा केला होता. भारतानं ती तीन सामन्यांची मालिका 2-1 अशी जिंकली होती. इंग्लंडनं भारतात द्विपक्षीय मालिकांमध्ये भारताविरुद्ध 47 एकदिवसीय सामने खेळले आहेत, त्यापैकी त्यांना फक्त 16 सामने जिंकता आले, तर 31 सामन्यांमध्ये इंग्लिश संघाचा पराभव झाला.
हेही वाचा –
‘विराटमध्ये खूप क्रिकेट शिल्लक…’, हेड कोच अँडी फ्लॉवरची प्रतिक्रिया, कर्णधारपद मिळणार?
“मला जेवणात विष दिलं होतं”, महान टेनिसपटू नोवाक जोकोविचचा खळबळजनक खुलासा!
पुजारा-रहाणे नाही, या खेळाडूचे डिफेंस जगात सर्वोत्तम, माजी गोलंदाजाची मोठी प्रतिक्रिया