ऑस्ट्रेलिया विरुद्धची चार सामन्यांची कसोटी मालिका जिंकून भारतीय संघाने जगभरात विजयाचा डंका वाजवला आहे. यानंतर भारतीय संघ बलाढ्य इंग्लंड संघाशी भिडणार आहे. फेब्रुवारी महिन्यात ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेने इंग्लंडच्या भारत दौऱ्याचा श्रीगणेशा होणार आहे. तत्पुर्वी बीसीसीआयने चेन्नई येथे होणाऱ्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. आता पहिल्या कसोटीत भारतीय संघ ३ फिरकीपटूंसह मैदानावर उतरणार असल्याची चर्चा चालू आहे.
इंग्लंडने याआधी ज्यावेळी डिसेंबर २०१६ मध्ये भारतीय संघाचा दौरा केला होता, त्यावेळी आर अश्विन आणि रवींद्र जडेजा यांनी इंग्लंडच्या एकूण ९३ बळींपैकी ५४ बळी पटकाविले होते. त्याच बळावर भारताने पाच कसोटी सामन्यांची मालिका ४-० च्या फरकाने आपल्या नावे केली होती. मात्र यावेळी जडेजा अंगठ्याला झालेल्या फ्रॅक्चरमुळे इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील पहिले दोन सामने खेळू शकणार नाही. त्यामुळे भारताकडे यावेळी आर अश्विन, वॉशिंग्टन सुंदर आणि कुलदीप यादव असे तीन पर्याय उपलब्ध आहेत.
भारताने ५ फेब्रुवारीपासून चेन्नईच्या मैदानावर सुरु होणाऱ्या पहिल्या दोन सामन्यांसाठी काहीशा अननुभवी गोलंदाजी फळीची निवड केली आहे. अनुभवी आर अश्विनच्या साथीला वॉशिंग्टन सुंदर (एक कसोटी), कुलदीप यादव (सहा कसोटी) आणि अक्षर पटेल (एकही कसोटी नाही) यांची निवड केली आहे.
त्याचप्रमाणे भारतीय संघ पहिल्या सामन्यात पाच विशेषज्ञ गोलंदाजांसह खेळण्याची आक्रमक रणनिती कायम ठेवण्याची शक्यता आहे. यात वॉशिंग्टन सुंदरसह तीन फिरकीपटू आणि दोन वेगवान गोलंदाज असण्याची शक्यता आहे. ब्रिस्बेन कसोटीत फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्हीतही कमाल करणाऱ्या वॉशिंग्टन सुंदरला यावेळी प्राधान्य दिले जाऊ शकते.
मात्र संघ व्यवस्थापनाने मायदेशात खेळवण्यात येणाऱ्या या मालिकेत कुलदीप यादवला संधी मिळेल, असेही संकेत दिले आहेत. प्रभारी कर्णधार अजिंक्य रहाणे आणि गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण यांनी कुलदीपने नेट्समध्ये कसून सराव केला असल्याचे सांगितले आहे. कुलदीपला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत खेळण्याची संधी मिळाली नव्हती, मात्र इंग्लंडविरुद्ध त्याला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे कर्णधार विराट कोहली नक्की कोणाला संधी देणार, हे पाहणे उत्सुकतेचे असेल.
महत्वाच्या बातम्या:
या खेळाडूवर लागेल १९ कोटीची बोली, आकाश चोप्राने वर्तविला अंदाज






