पाकिस्तान क्रिकेट संघाने आशिया चषक 2023 स्पर्धेतील अभियानाची दमदार सुरुवात केली. पाकिस्तानने पहिल्याच सामन्यात बुधवारी (दि. 30 ऑगस्ट) नेपाळ संघाचा 238 धावांनी फडशा पाडला. या सामन्यात पाकिस्तानचे दोन धुरंधर चमकले. एक म्हणजे कर्णधार बाबर आझम आणि दुसरा म्हणजे अष्टपैलू शादाब खान होय. शादाबने सामन्यात सर्वाधिक 4 विकेट्स घेण्याची कामगिरी केली. पाकिस्तानला पुढचा सामना भारताविरुद्ध खेळायचा आहे. नेपाळचा फडशा पाडल्यानंतर पाकिस्तानचा आत्मविश्वास गगनाला भिडला आहे. अशात या सामन्यापूर्वी शादाब खानने विराट कोहलीविषयी प्रतिक्रिया दिली आहे.
विराटपासून सावध राहण्याची गरज- शादाब खान
सध्या पाकिस्तान हा वनडे क्रिकेटमधील अव्वल क्रमांकाचा संघ आहे, यात कोणतीही शंका नाहीये. पाकिस्तानने मागील काही दिवसांमध्ये शानदार प्रदर्शन केले आहे. मात्र, भारतीय संघही काही कमी नाहीये. भारतीय संघात जागतिक दर्जाच्या फलंदाजांचा भरणा आहे. विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) यांसारखे फलंदाज एकट्याच्या जोरावर सामन्याची दिशा पलटू शकतात. मात्र, सर्वात महत्त्वाचे आहे की, त्यांचे क्रीझवर टिकून राहणे. आता नेपाळविरुद्ध सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या शादाब खान (Shadab Khan) याने भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी विराटविषयी मोठे भाष्य केले आहे. यावेळी त्याने त्याच्याच संघाला विराटपासून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे.
स्टार स्पोर्ट्सशी बोलताना शादाब खान म्हणाला, “विराट कोहलीची सुंदरता ही आहे, की त्याने कोणत्याही स्थितीत कोणत्याही संघाविरुद्ध सामने जिंकले आहेत. त्याने ज्याप्रकारे पाकिस्तानविरुद्ध टी20 विश्वचषक 2022मध्ये प्रदर्शन केले होते, ते अविश्वसनीय होते. मला वाटत नाही, की जगातील कोणताही खेळाडू असे करू शकतो. त्याने ज्याप्रकारे पाकिस्तानच्या हातातून सामना हिसकावला आणि भारताला तो सामना जिंकून दिला, त्याचे कौतुक करावे तेवढे कमी आहे.” अशाप्रकारे शादाबने इशाऱ्यामध्येच मागील सामन्याचा हवाला देत आपल्या संघाला चेतावणी दिली आहे.
शादाब पुढे बोलताना म्हणाला की, “तो निश्चितरीत्या एक जागतिक दर्जाचा खेळाडू आहे. त्याचा सामना करण्यासाठी तुम्हाला खूप योजना कराव्या लागतील. तसेही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये डोक्याने खेळावे लागते. कारण, तुमच्याकडे निश्चितरीत्या त्या स्तरापर्यंत पोहोचण्याचे कौशल्य आहे. सामन्यातील स्थितीनुसार, गोलंदाज आणि फलंदाज एकमेकांच्या मनात काय सुरू आहे, हे कसे हेरतात, त्यावरही सामन्याचा निकाल अवलंबून असतो.”
कधी खेळला जाणार सामना?
भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) संघातील सामना 2 सप्टेंबर रोजी खेळला जाणार आहे. हा सामना श्रीलंकेच्या पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडिअम, पल्लेकेल येथे खेळला जाणार आहे. या सामन्याकडे अवघ्या क्रिकेटविश्वाचे लक्ष लागले आहे. (ind vs pak asia cup 2023 shabad khan says virat kohli can win match from any situation against any team read)
हेही वाचाच-
IPL फायनलमध्ये CSKचा घाम काढणाऱ्या खेळाडूचा मोठा निर्णय, विदेशी संघासोबत केला ‘एवढ्या’ सामन्यांचा करार
पहिल्यांदाच पाकिस्तानविरुद्ध खेळणार ‘हे’ 4 भारतीय, 140 कोटी भारतीय पाहतायेत प्लेइंग इलेव्हनची वाट